दक्षिणेकडील मंदिरांप्रमाणे आपल्याकडील मंदिरांचे पावित्र्य जपायचे असेल तर मूर्तीस्पर्श टाळायला हवा; शास्त्र सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 01:57 PM2021-11-09T13:57:47+5:302021-11-09T13:59:03+5:30

मंदिरातील मूर्तीला एकदा स्नान घालून किंवा पुसून अलंकारादिकांनी सजवल्यावर पुन्हा त्या मूर्तीला दिवसभर उपचारांखेरीज अन्यवेळी कोणीही स्पर्श न करणे हेच योग्य ठरते.

If we want to preserve the sanctity of our temples like the temples in the south, we should avoid touching idols; The scripture says ... | दक्षिणेकडील मंदिरांप्रमाणे आपल्याकडील मंदिरांचे पावित्र्य जपायचे असेल तर मूर्तीस्पर्श टाळायला हवा; शास्त्र सांगते...

दक्षिणेकडील मंदिरांप्रमाणे आपल्याकडील मंदिरांचे पावित्र्य जपायचे असेल तर मूर्तीस्पर्श टाळायला हवा; शास्त्र सांगते...

googlenewsNext

हिंदू धर्म व त्याचे पंथोपपंथ यामध्ये कुठेही देवमूर्तीस्पर्शन हा विधी दिलेला नाही. 'दर्शनमात्रे मनकामना पूर्ती', 'साधकांचा मायबाप', दरूशने हरी ताप' इ. प्राकृत वचनातदेखील देवाचे दर्शन हेच ग्राह्य आहे. स्पर्शनाचा मात्र सर्वचदृष्ट्या निषेध आहे. कारण एकाच मूर्तीला सतत सर्वांनी हस्तस्पर्श किंवा मस्तकस्पर्श होऊन मूर्तीची झीज होऊन मूर्तीची हानी होऊ शकते. शिवाय सततच्या हस्तस्पर्शाने मूर्तीची बैठक ढीली होऊ शकते. 

मनुष्याने घडवलेल्या पाषाण मूर्ती मानवी हस्तस्पर्शानी लवकर झिजतातच पण वाळूपासून बनलेल्या (ज्यांना स्वयंभू म्हणतात) अशा मूर्तीदेखील काही शतकांनी झिजतात. शालग्रामशिलेतून घडवलेल्या मूर्ती व बाणलिंगाची झीज कमी असली तरी त्यांना सातत्याने हस्तस्पर्श होत गेल्यास कालांतराने त्याच्यावरही परिणाम होतो. तसेच देवमुर्ती स्पर्श करण्यात शुचिर्भूतपणाचा अभाव असल्यास तोही समर्थनीय ठरत नाही.

देवमूर्तीस हस्तस्पर्श करण्याचा दुराग्रह बाळगणे म्हणजे निखळ परमार्थतत्त्वापासून भरकटत जाण्यासारखे आहे. पण या अज्ञानमुलक श्रद्ध्येस इलाज नाही. आधुनिक काळात दूरदर्शन संचापासून दूर राहून त्याचा आनंद घ्यावा असे सांगितले तर लगेच पटते. पण स्पर्श करून देवदर्शनाची प्रथा असणाऱ्या मंदिरात दुरूनच दर्शन घेण्याची प्रथा मनाला भावत नाही. कारण आजपर्यंत शास्त्रार्थ सांगून तशी हाकाटी प्रकर्षाने कुणीही केलेली नाही. ज्यांनी देवस्पर्शनाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा धिक्कार करण्यात आला. 'श्रद्धेला तडा जातो' या नावाखाली काही मूर्तींना आवर्जून स्पर्श करण्याची अयोग्य प्रथा अद्यापही चालू आहे. 

मंदिरातील मूर्तीला एकदा स्नान घालून किंवा पुसून अलंकारादिकांनी सजवल्यावर पुन्हा त्या मूर्तीला दिवसभर उपचारांखेरीज अन्यवेळी कोणीही स्पर्श न करणे हेच योग्य ठरते. ज्या मंदिरातील गर्भागारात विद्युत्प्रकाशाऐवजी केवळ तेलतुपाचे नंदादीप असतात व ज्यांचे दर्शन पुरेशा अंतरावरून घेतले जाते.  त्या मूर्तीतील तेज विशेषत्वाने भावल्यामुळे त्या देवेतेविषयी श्रद्धाभाव अधिकाधिक दृढ होत जातो. दक्षिण भारतातील बहुसंख्य देवस्थानांमध्ये उपरोक्त पद्धतीने दर्शन घेण्याची प्रथा आहे. या प्रथेप्रमाणे समाजातील सर्व स्तरातील लोकांनी मंदिरातील मूर्तीस दर्शन घेण्याचा आग्रह न धरणे अत्यंत अगत्याचे ठरते. 

Web Title: If we want to preserve the sanctity of our temples like the temples in the south, we should avoid touching idols; The scripture says ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.