Holi 2025: होळीच्या सायंकाळी घरात का केले जाते अग्निहोत्र? जाणून घ्या लाभ आणि विधी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 12:34 IST2025-03-12T12:33:49+5:302025-03-12T12:34:58+5:30
Holika Dahan 2025: होळीच्या दिवशी संध्याकाळी घरात अग्निहोत्र आणि रात्री आपल्या वसाहतीत होलिका दहन करा; कशासाठी ते जाणून घ्या!

Holi 2025: होळीच्या सायंकाळी घरात का केले जाते अग्निहोत्र? जाणून घ्या लाभ आणि विधी!
१३ मार्च रोजी होळी (Holi 2025) आहे. त्या रात्री होळी रचून तिचे दहन (Holika Dahan 2025) केली जाते. तत्पूर्वी तिची पूजादेखील केली जाते. अग्नीची ताकद लक्षात घेता आपल्यातल्या दुष्ट प्रवृत्ती, विचार, सवयी नष्ट व्हाव्यात म्हणून होळीला नारळ अर्पण करून मनातील विकारांची आहुती दिली जाते. ही पूजा वर्षातून एकदा सार्वजनिक स्वरुपात केलि जाते तर त्याचेच छोटे स्वरूप अग्निहोत्र दर महिन्याला घरात पूजन केले जाते. होळीनिमित्त आपणही घरात अग्निहोत्र केले पाहिजे असे शास्त्र सांगते, त्याबद्दल जाणून घेऊ.
आपल्या धर्मात अग्नीला मोठे स्थान आहे. ऋग्वेदकाळात यज्ञकर्म हे अतिशय महत्त्वाचे कर्म मानले जाई. त्या व्यतिरिक्त आजही आपल्याकडे विविध तऱ्हेच्या पूजा विधींमध्ये अग्निपूजा होमाच्या रूपात केली जाते. मुंज, विवाहातील होम यांसह अग्निहोत्रापर्यंत प्रत्येक धार्मिक समारंभात अग्नीची पूजा केली जाते. जिथे जिथे वेदाभ्यासाचे वर्ग चालतात, जिथे धार्मिक अनुष्ठान असते, मठ असतात, अशा ठिकाणी आजही वन्ही व्रत अगत्याने केले जाते. सर्वसामान्यपणे लोकांना आज हे व्रत आणि व्रताची संकल्पना माहीत नाही. परंतु अग्निपूजेचे अगणित फायदे लक्षात घेतले, तर आपणही या व्रताचा आरंभ नक्कीच करू शकू.
यज्ञ हा वातावरण शुद्धीसाठी असतो. विश्वशांतीसाठी शुद्ध वातावरणाची गरज असते. ती यज्ञाने साध्य होते. अस्वच्छ वातावरणात रोगाणूंची मोठ्या प्रमाणात वाढ होते. मूलत: रोगट वातावरणामुळे, शुद्ध हवेच्या कमतरतेमुळे, खेळत्या वायूचा संचार होत नसल्यामुळे, बाहेरून दूषित हवा आल्याने वा दूषित वातावरणाशी वा तसे वातावरण निर्माण करणाऱ्या रुग्णाशी संपर्क आल्याने होते. या रोगाणूंच्या संपर्कामुळे माणसांना विशेषत: लहान मुले, अशक्त वा नाजूक प्रकृतीची मुले यांना लवकर बाधा होते. यज्ञामुळे जी वातावरणनिर्मिती होते, ती वरील गोष्टींशी प्रामुख्याने संबंधित आहे.
ज्यांना मोठे यज्ञ शक्य नाहीत आणि आताच्या काळात ते अशक्य ठरत आहेत, त्यांनी नित्य यज्ञ घरातच करावा असे वेदात सांगितले आहे. अग्नीमध्ये सकाळ संध्याकाळ आहूति द्याव्यात असे अथर्ववेदात सांगितले आहे. या नित्य यज्ञालाच अग्निहोत्र असे म्हणतात.
ज्याला वैदिक धर्माचं मूळ म्हटले जाते अशा ४ वेदांपैकी ऋग्वेदातील हा सर्वात पहिला श्लोक! एवढं वेदांमध्ये अग्नीला, अग्निपूजेला महत्त्व दिले गेले आहे. अग्निहोत्र म्हणजे काय, तर सोप्या भाषेत अग्नी मध्ये हवन, यज्ञ. अग्नी/सूर्य देवाला दिलेली आहुती म्हणजेच अग्निहोत्र. अग्निहोत्र नेहमी सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी केले जाते. अग्निहोत्र करताना अग्निकुंड, शेण्या, तूप, तांदूळ, तुपाची आहुती द्यायला पळी वापरल्या जातात.
घरातील मोजक्या दूषित वातावरणाला अग्निहोत्राने दूर सारता येते. स्वच्छ व शुद्ध वातावरणाचा परिणाम रोगाणूंचा नाश करण्यात तर होतोच, पण मन:शांति प्राप्त करून देण्यातही होतो. अग्निहोत्राचे जे मंगल परिणाम विशेषत: वातावरणात होतात, त्यामुळे जीवजंतूंची वाढ कमी झाल्याचे विज्ञानानेही म्हटले आहे.