Holi 2025: होळीला पुरणपोळी करतो, पण हाच नैवेद्य करायचा हे कधी आणि कसं ठरलं? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:44 IST2025-03-11T10:43:30+5:302025-03-11T10:44:05+5:30
Holi 2025: यंदा १३ मार्च रोजी होळी आहे, त्यानिमित्त पुरणपोळीचा नैवेद्य केला जातोच, पण हे समीकरण कोणी आणि कधी ठरवले ते जाणून घेऊ.

Holi 2025: होळीला पुरणपोळी करतो, पण हाच नैवेद्य करायचा हे कधी आणि कसं ठरलं? वाचा!
यंदा १३ मार्च रोजी होळी(Holi 2025) आहे. त्यादिवशी होलिका दहन करण्याआधी होलिका पूजन करतो आणि नैवेद्यासाठी केलेली पुरण पोळी भक्तिभावे अर्पण करतो. जसा इतर सणांचा नैवेद्य ठरलेला असतो तसाच होळीला पुरण पोळीचा नैवेद्य केला जातो. पण हे समीकरण नक्की जुळलं कसं, कधी आणि केव्हा? त्याबद्दल पौराणिक कथा जाणून घेऊया.
ढुंढा नावाची एक राक्षसीण होती. ती लहान मुलांना ठार मारायची. तेव्हा लोक त्रस्त झाले आणि तिला शिव्या देऊ लागले. परंतु तरीही ती दाद देईना. लोक शिव्या देऊन वरून बोंबा मारू लागले. तरीही ती दाद देईना. मग गावातील सर्व पुरुष सूर्यास्तसमयी एकत्र जमले. त्यांनी आपापल्या घरून पाच पाच गोवऱ्या, पाच पाच लाकडे आणली आणि ती गोल रचून पेटवली. त्याचा प्रचंड विस्तव पेटला. ज्वाला फडकू लागल्या. लोक ढुंढा राक्षसिणीच्या शोधात सर्वत्र बोंबा मारत, शिव्या देत हिंडू लागले. शेकडो लोक एकत्र झाले आहेत, त्यांनी मोठा अग्नी पेटवला आहे, आता त्यांच्यापुढे आपले काही चालणार नाही. ते आपल्याला पकडून जाळामध्ये टाकून ठार मारतील, असे ढुंढा राक्षसिणीला वाटले. ती घाबरली व दूर दूर पळून गेली. त्यामुळे लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
लेखक गजानन खोले 'कुळधर्म कुळाचार' पुस्तकात लिहितात, हा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. अग्निनारायणाने हे कार्य केले. त्यामुळे घराघरातील आयांना, आज्यांना आनंद झाला. शेतातून नुकतेच नवीन गहू आलेले होते. त्याचे पीठ त्यांनी दळून ठेवले होते. नवीन हरभऱ्याची डाळही आलेली होती. त्यांनी पुरण शिजत लावले. त्याच्या पुरणपोळ्या केल्या व त्यावर तूप घातले. भात भाजी घातली आणि केळीच्या पानावर ते पदार्थ वाढून गावकऱ्यांनी पेटवलेल्या अग्नीला नेऊन अर्पण केले. तेव्हा ते पाहताच तेथे जमलेल्या पुरुषांनी अग्निनारायणाला तीन प्रदक्षिणा घातल्या.
ढुंढा राक्षसीण निघून गेली. गावातील मुले सुखरूप राहू लागली. म्हणून दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवून त्यात पुरणपोळी घालण्याचा कुळधर्म सुरू झाला. एरंडाचे किंवा ताड, माड, आंबा असे कुठले तरी झाड ढुंढा राक्षसिणीचे प्रतीक म्हणून ठेवत, त्यावर गोवऱ्या रचून होळी पेटवतात आणि ढुंढा राक्षसीणीच्या नावाने बोंबा मारण्याचा कुलाचार पार पाडतात.