Holika Dahan 2025: यंदा होलिका दहनासाठी मिळणार फक्त काही क्षणांचा अवधी; जाणून घ्या तिथी, वार आणि मुहूर्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 18:04 IST2025-02-03T18:03:55+5:302025-02-03T18:04:13+5:30
Holika Dahan Story in Marathi: दरवर्षी शोलेमधल्या गब्बर सिंगसारखा आपल्यालाही प्रश्न पडतो 'कब है होली?' जाणून घ्या उत्तर आणि शुभ मुहूर्त!

Holika Dahan 2025: यंदा होलिका दहनासाठी मिळणार फक्त काही क्षणांचा अवधी; जाणून घ्या तिथी, वार आणि मुहूर्त!
Holika Dahan Story in Marathi: फाल्गुन पौर्णिमा होळी या सणासाठी ओळखली जाते. त्यादिवशी होलिका दहन करण्यामागे प्रचलित पौराणिक कारण आहे, तसेच हा रंगांचा उत्सव असल्याने पौर्णिमा ते पंचमी हा सण पाच दिवस साजरा केला जातो. मथुरा-वृंदावन येथे या सणाचे महत्त्व अधिक असल्यामुळे तिथे चक्क चाळीस दिवस होळीचा उत्सव साजरा केला जातो. मात्र, आपण हा सण कधी साजरा करणार त्याची विस्तृत माहिती घेऊया.
होळी हा रंगांचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केले जाते आणि त्यानंतर धुळवड आणि पंचमीपर्यंत रंगांची होळी खेळली जाते. पुरणाच्या पोळीवर साजूक तूप घालून ताव मारला जातो. हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो. यंदा तो कधी आणि कसा साजरा करायचा आहे ते पाहू!
होलिका दहन कधी होणार?
पंचांगानुसार या वर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा (Falgun Purnima 2025) १३ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.२५ वाजता सुरू होत आहे आणि १४ मार्च २०२५ रोजी दुपारी १२.२३मिनिटांनी संपत आहे. उदय तिथीनुसार १३ मार्चला होलिका दहन (Holika Dahan Muhurat 2025) होणार आहे. १३ मार्च रोजी रात्री ११.२६ ते १२.३० पर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल. म्हणजेच या वर्षी रात्री उशिरा होलिका दहनासाठी फक्त दीड तासाचा अवधी मिळणार आहे, तोही रात्री उशिरा!
होलिका राक्षसीण असूनही तिला मातेचा दर्जा आणि पूजनही; पण का? वाचा गर्भितार्थ!
होळी कधी असते? (Holi 2025)
१३ मार्च रोजी रात्री उशिरा होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी १४ मार्च रोजी धुळवड खेळली जाते. धरतीशी, आपल्या मातृभूमीशी आपले नाते अतूट राहावे म्हणून चक्क धुळीने होळी खेळली जाते. त्यानंतर विविध रंगांनी रंगपंचमी साजरी केली जाते. तसेच होळीपासून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाण्याने भिजवून शरीराला आणि मनाला तजेला दिला जातो. अर्थात यात पाण्याचा अपव्यय आणि केमिकल रंगांनी युक्त होळी खेळणे अभिप्रेत नाही.
होळी का साजरी केली जाते?
होलिका दहन आणि होळीचा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. यानुसार, प्राचीन काळी असुर राजा हिरण्यकश्यपुचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा निस्सीम भक्त होता. हिरण्यकश्यपुला ही गोष्ट आवडली नाही. मग त्याने आपल्या मुलाला सांगितले, विष्णूंचे नाव घेणे बंद कर. पण प्रल्हादाला हरिनामाची गोडी लागल्यामुळे तो नाम:स्मरण थांबवू शकला नाही. आपल्या समोर आपलाच मुलगा आपल्या शत्रूचे नाम घेतो, भक्ती करतो पाहून हिरण्यकश्यपुला राग अनावर झाला आणि त्याने प्रल्हादला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी देवाने त्याचे रक्षण केले आणि प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही. तेव्हा राजा हिरण्यकश्यपुने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मारण्यासाठी अग्नीत जाळण्यास सांगितले. होलिकाला ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की अग्नी तिला जाळू शकत नाही. अशा स्थितीत होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या ढिगाऱ्यावर बसली. तिला मिळालेल्या वरदानाचा उपयोग तिने अयोग्य कारणासाठी केला, त्यामुळे तिला मिळालेले वरदान तिच्यासाठी शाप ठरले. भगवान विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि होलिका जळून राख झाली. तेव्हापासून होलिका दहन हा सण अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.