Holi 2025: होलिका प्रदीपन कसे करावे? पाहा, होळी पूजनाचा सोपा विधी, मंत्र, कथा अन् मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 11:18 IST2025-03-12T11:17:07+5:302025-03-12T11:18:15+5:30
Holi 2025: होळीची पूजा कशी करावी? होलिका दहनावेळी नेमके काय करू नये? प्रथा, परंपरा आणि काही मान्यता जाणून घ्या...

Holi 2025: होलिका प्रदीपन कसे करावे? पाहा, होळी पूजनाचा सोपा विधी, मंत्र, कथा अन् मान्यता
Holi 2025: गुरुवार, १३ मार्च २०२५ रोजी होळी आहे. शुक्रवार, १४ मार्च २०२५ रोजी धूलिवंदन आहे. मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी. संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये होळी सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. रंगांचा सण म्हणून होळीची ओळख वेगळी आहे. फाल्गुन पौर्णिमेनंतर वसंतोत्सवाला वा वसंत ऋतूला सुरुवात होते. होळी सण उत्तर भारतामध्ये विशेष उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते. होलिका दहनाचा विधी, होळी पूजनाची पद्धत, काही मंत्र, शुभ मुहूर्त आणि मान्यता जाणून घेऊया...
पौराणिक आख्यायिकेनुसार, दैत्यराज हिरण्यकश्यपू स्वतःलाच देव समजू लागला होता. त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू यांचा परमभक्त होता. प्रल्हाद श्रीविष्णू यांच्याशिवाय अन्य कोणाचेही पूजन, नामस्मरण करत नसे. यामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत क्रोधीत झाले आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत बसण्याचा आदेश दिला. प्रल्हादाची आत्या आणि हिरण्यकशिपूची बहीण होलिका हिला अग्नीपासून अभय होते. होलिकेस आगीत तिचे काहीच नुकसान होणार नाही, असा एक वर प्राप्त होता. मात्र, भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला व होलिका त्या आगीत जळून भस्मसात झाली. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. या घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला, असे सांगितले जाते.
फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीला चंद्रग्रहण
होळीच्या सणाला भूमातेला म्हणजे पृथ्वीला वंदन करावयाचे आणि त्या दिवसानंतर पंधरवड्याने सुरू होणाऱ्या नवसंवत्सराच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आभाळात उंच उज्ज्वल भविष्याची गुढी उभारावयाची अशी परंपरा आहे. यंदाची होळी अनेकार्थाने विशेष ठरणारी असल्याचे सांगितले जात आहे. यंदा फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीला चंद्रग्रहण असणार आहे. परंतु, हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे वेधादि नियम पाळू नयेत, असे सांगितले जात आहे.
होळी पूजन विधी, होलिका प्रदीपन कसे करावे?
होलिका प्रदीपन विधी हा प्रदोष काळानंतर करण्यात येतो. होलिका प्रदीपन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते. गुरुवार, १३ मार्च २०२५ रोजी रात्री ११.२६ ते १२.३० हा काळ होलिका पूजनासाठी शुभ मानला गेला आहे. होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते. होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते. शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते. पूजेनंतर पाण्याने अर्घ्य देण्यात येते. एक कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते. नवीन धान्याचा अंश जसे, गहू, चणे इत्यादींच्या लोंबी यांची आहुती देण्यात येते. होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा पाळून होळी पूजन करावे, असे सांगितले जाते.
अहकूटा भयत्रस्तै: कृता त्वं होलि बालिशै:।
अतस्वां पूजयिष्यामि भूति-भूति प्रदायिनीम।।
वंदितासि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शंकरेण च।
अतस्त्वं पाहि मां देवी! भूति भूतिप्रदा भव।।
हे मंत्र होळी पूजन, होलिका प्रदीपन करताना म्हणावेत.
होळी पूजन होलिका प्रदीपन करताना काय काळजी घ्यावी?
- होलिका दहन नेहमी भद्रे नंतरच करावे.
- चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही.
- सूर्यास्तापूर्वी होलिका दहन करू नये.
- होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो, अशी मान्यता प्रचलित आहे.
होळी पूजा, धूलिवंदन दिवशी जुळून येत असलेले शुभ योग
यंदा २०२५ रोजी होळी सणाला विविध योग जुळून येत आहेत. मीन राशीत बुध, शुक्र, राहु, नेपच्युन ग्रह विराजमान आहेत. मीन ही शुक्राची उच्च रास आहे. मीन राशीत आताच्या घडीला मालव्य राजयोग, लक्ष्मी नारायण योग जुळून आले आहेत. फाल्गुन पौर्णिमा, धुलिवंदनाच्या दिवशी नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मीन राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे मीन राशीत पंचग्रही योग जुळून आलेला आहे. तसेच सूर्याच्या मीन राशीतील प्रवेशानंतर बुधादित्य, शुक्रादित्य राजयोग जुळून येतील. तसेच ग्रहण योगही जुळून येणार आहे. राहु-केतु यांचा समसप्तक योग जुळून येत आहे. तसेच गुरु-चंद्र यांचा गजकेसरी राजयोग जुळून येत आहे. विशेष म्हणजे यंदा होळी सणाला चंद्रग्रहण असणार आहे. कन्या राशीत केतु विराजमान आहे. हे चंद्रग्रहण कन्या राशीत असेल. एकमेकांपासून सातव्या स्थानी असल्यामुळे सूर्य आणि केतु यांचा समसप्तक योग जुळून आला आहे. तसेच चंद्रही कन्या राशीत असल्यामुळे सूर्य-चंद्राचाही समसप्तक योग जुळून आला आहे.