Holi 2022 : काशीच्या हरिश्चंद्र स्मशान घाटावर खेळली जाते चितेच्या राखेची होळी; आगळ्या वेगळ्या परंपरेबद्दल अधिक वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 13:17 IST2022-03-15T13:17:20+5:302022-03-15T13:17:43+5:30
Holi 2022 : आपण सगळे जण राखेतून जन्माला आलो आणि राखेतच आपला शेवट होणार आहे, याची जाणीव देणारी ही प्रथा पारंपरिक पद्धतीने पाळली जाते.

Holi 2022 : काशीच्या हरिश्चंद्र स्मशान घाटावर खेळली जाते चितेच्या राखेची होळी; आगळ्या वेगळ्या परंपरेबद्दल अधिक वाचा!
भारतात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र काही खास ठिकाणांची होळी जगप्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ, मथुरा, वृंदावन, बरसाणे, ज्याला कृष्ण नगरी म्हणतात. तेथील होळी पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. या शहरांमध्ये होळीचा सण होळीच्या प्राचीन काळापासून खेळला जात आहे. काशी हे देखील अशाच शहरांपैकी एक आहे, जिथे होळीनिमित्त रंगांची मुक्त उधळण बघायला मिळते. या दिवशी शिवभक्त भोलेनाथसोबत होळी खेळतात, पण ही होळी खूप वेगळी असते. कशी ते पाहू.
चितेच्या राखेची होळी :
काशीच्या स्मशानभूमीत रंगभरी एकादशीच्या दिवशी खेळली जाणारी होळी बाकी ठिकाणच्या होळीपेक्षा खूप वेगळी असते. कारण इथे रंगांनी नव्हे तर चक्क स्मशानातील चितेच्या राखेने होळी खेळली जाते. मोक्षदायिनी काशी शहरातील स्मशानभूमी हरिश्चंद्र घाट येथे चोवीस तास चिता धगधगत असते. इथे चितेची आग कधीच थंड होत नाही असे म्हणतात. काशी क्षेत्री आपला शेवट व्हावा या इच्छेने अनेक भाविक वृद्धावस्थेत काशी क्षेत्री येऊन राहतात. मृत्यू आपल्या हाती नाही, परंतु मृत्यूचा सोहळा जिवंत पणी अनुभवण्यासाठी तिथल्या स्मशानभूमीत रंगभरी एकादशीच्या दिवशी चितेच्या राखेने होळी खेळली जाते. आपण सगळे जण राखेतून जन्माला आलो आणि राखेतच आपला शेवट होणार आहे, याची जाणीव देणारी ही प्रथा पारंपरिक पद्धतीने पाळली जाते.
३५० वर्षांची परंपरा :
या वर्षीही १४ मार्चला रंगभरी एकादशीच्या दिवशी वाराणसीतील स्मशानभूमीत रंगांसह चितेच्या राखेची होळी खेळण्यात आली. या वेळी डमरू, घंटा, घरियाल, मृदंग अशा भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या वाद्यांमधून निघणारे संगीत वातावरण निर्मिती करते. नेहमीप्रमाणे या वर्षीही हा सोहळा संपन्न झाला. ही परंपरा अलीकडची नाही तर तब्ब्ल ३५० वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते.
स्मशानातील होळी खेळण्यामागची कथा :
यामागची कथा अशी आहे की, लग्नानंतर माता पार्वती शिवशंकराबरोबर काशीला पोहोचली. त्यांच्या आगमनाप्रीत्यर्थ शिवगणांनी स्मशानातील राख उधळून होळी साजरी केली. भगवान शंकरासकट सगळे शिवगण स्मशान वासी असल्याने त्यांनी धुळवडीसारखी स्मशानातील राखेने होळी खेळली. भूत, प्रेत, पिशाच आणि अघोरीं शक्तीही सामील झाल्या.तेव्हापासून सुरु झालेली परंपरा आजतागायत सुरू आहे. आजही ही परंपरा येथे सुरू असून हरिश्चंद्र घाटावर महाशमशन नाथांच्या आरतीने सुरुवात होते. येथील डोम राजाच्या कुटुंबाने याचे आयोजन केले आहे.