Vikram Samvat 2080: हिंदू नववर्षाचा राजा असेल बुध, तर मंत्री असेल शुक्र! जाणून घ्या, देशासह जगावर कसा राहील प्रभाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 20:13 IST2023-03-20T20:11:22+5:302023-03-20T20:13:27+5:30
Shalivahana Shaka 1945 : यावर्षी 22 मार्चपासून हिंदू नववर्ष 'विक्रम संवत 2080' अथवा शालिवाहन शके 1945 ला प्रारंभ होत आहे. जाणून घेऊयात या नव्या वर्षातील काही महत्वाच्या गोष्टींसंदर्भात...

Vikram Samvat 2080: हिंदू नववर्षाचा राजा असेल बुध, तर मंत्री असेल शुक्र! जाणून घ्या, देशासह जगावर कसा राहील प्रभाव
दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवताच्या/शालिवाहन शकाच्या नववर्षास प्रारंभ होतो आणि हिंदूनववर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली, असे म्हटले जाते. यामुळेच दरवर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात होते. यावर्षी 22 मार्चपासून हिंदू नववर्ष 'विक्रम संवत 2080' अथवा शालिवाहन शके 1945 ला प्रारंभ होत आहे. जाणून घेऊयात या नव्या वर्षातील काही महत्वाच्या गोष्टींसंदर्भात...
ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, विक्रम संवत 2080 हे 'पिंगल' म्हणून ओळखले जाईल. या वर्षात बुध राजा तर शुक्र मंत्र्याच्या भूमिकेत असेल. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, यावर्षी राजा आणि मंत्री दोघे मिळून हिंदू नववर्ष चांगले आणि शुभ बनवतील. तसेच, काही प्रकरणांमध्ये समस्याही दिसू शकतात.
संवताचा राजा बुध -
या संवतचा राजा बुध असल्याने व्यापारी वर्गाची व्यवसायात प्रगती होईल. त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. नवीन व्यवसायत भरभराट होईल. कारागीर, लेखक आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तीना फायदा होईल. मात्र, बुधाच्या प्रभावामुळे लोकांमध्ये उत्साह आणि राग दोन्ही दिसेल. लोकांच्या मनाबरोबरच निसर्गावरही याचा परिणाम जाणवू शकतो. अतिवृष्टी आणि चक्रीवादळ यांसारखी परिस्थितीही निर्माण होऊ शकते. तसेच प्राण्यांना इजा पोहोचू शकते.
संवताचे मंत्री शुक्र -
या संवताचा मंत्रिस्थानी शुक्र राहणार आहे. यामुळे महिलांचा प्रभाव वाढेल. फॅशन, फिल्म इंडस्ट्री, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित लोकांना अधिक फायदा होईल. त्यांच्या कार्यशैलीत सुधारणा होईल. रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. आपल्याला नक्कीच भाग्याची साथ मिळेल. मात्र, या वर्षात भौतिक सुखसोयींसंदर्भात वाद होऊ शकतात. जन आणि धनाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आजारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण राहील.
हिंदू नववर्षात ग्रहांची स्थिती -
हिंदू नववर्ष विक्रम संवत 2080 अथवा शालिवाहन शक 1945 चा प्रारंभ ग्रहांच्या चालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या वर्षी सूर्य, बुध आणि गुरू मीन राशीत असतील. शनि कुंभ राशीत आणि मंगळ मिथुन राशीत असेल. तर शुक्र आणि राहू मेष राशीत आणि केतू तूळ राशीत असेल.