Happy Life: दुःख कोणालाही चुकले नाही, सुखाचा मार्ग निवडणे तुमच्या हातात आहे; सांगताहेत गौर गोपाल दास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 14:40 IST2023-03-08T14:36:24+5:302023-03-08T14:40:59+5:30
Happy Life: 'जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधून पाहे' बारकाईने निरीक्षण केले तर समर्थांचे हे म्हणणे आपल्याला पटेल, त्याला जोड या विवेचनाची!

Happy Life: दुःख कोणालाही चुकले नाही, सुखाचा मार्ग निवडणे तुमच्या हातात आहे; सांगताहेत गौर गोपाल दास!
''तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो'' हे गाणे तुम्ही ऐकले असेल. गाण्यात वर्णन केल्याप्रमाणे काही व्यक्ती आपल्याला सदैव हसताना दिसतात. याचा अर्थ त्या फक्त आनंदी असतात असे आहे का? तर नाही! म्हणूनच गीतकार विचारतात, क्या गम है जिसको छुपा रहे हो? अर्थात दुःख त्या व्यक्तीलाही आहे, त्या व्यक्तीने आनंदी राहण्याचा पर्याय निवडला आहे. जो आपल्या सर्वांकडे उपलब्ध असूनही आपण निवडत नाही, याबद्दल गौर गोपाल दास सांगतात, 'प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे, पण तुम्ही दुःखावर लक्ष केंद्रित करता की सुखावर, यावर तुमचे भवितव्य अवलंबून असते.
गौर गोपाल दास यांनी साधू संतांच्या बाबतीत म्हटले, की संसारी माणसालाच दुःख असते असे नाही, तर सन्यस्त माणसालाही दुःख आहेच. कारण जोवर आपण देहाने या जगात आहोत, तोवर राग, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्विकार चिकटलेले असणारच. तसेच जगण्यासाठी, पोटापाण्यासाठी पैसा लागणारच, शारीरिक व्याधी होणारच, थंडी, ऊन, वारा, पाऊस यांचा जाच होणारच. मात्र या सगळ्या गोष्टी घडूनही आपण त्यातून स्वतःसाठी जर आनंद शोधायचा ठरवले तरच आनंदी राहू शकतो. साधू संतदेखील तेच करतात. ते आनंदी राहण्याचा पर्याय निवडतात.
सद्यस्थितीत नैराश्याने ग्रासलेले लोक परदेशातच नाही तर भारतातही मोठ्या प्रमाणात आहेत. याचे कारण शोधायचे झाले तर लोक स्वमग्न होत आहेत. आपल्या विषयात अडकून राहिलो कि आपल्याला आपले प्रश्न मोठे वाटतात आणि आपण त्याचाच विचार करत बसतो. दर दिवशी नवीन आव्हाने, नवीन प्रश्न समोर येणारच आहेत, मात्र प्रश्नांनी समस्यांनी खचून न जाता आपण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधला तर आपणही आनंदी होऊ शकतो.
म्हणजेच काय तर राग, दुःख, त्रास आपोआप येऊन आपल्याला चिकटणार आहेच, पण त्यातून आनंद आपल्याला जाणीवपूर्वक निवडावा लागेल. साधू संत तेच करतात, आपणही त्यांचे अनुकरण करू !