Hanuman Puja: 'सिंदूर' केवळ शृंगार नाही तर विश्वासाचे प्रतीक; हनुमंतालाही त्याचे लेपन करण्याचे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 13:15 IST2025-05-07T13:14:07+5:302025-05-07T13:15:50+5:30

Hanuman Puja: भारतीय संस्कृतीत सिंदूरचे खूप महत्त्व आहे, 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर तर या शब्दाचे महत्त्व जास्तच वाढले आहे, पण हनुमंतांनी ते लावण्याचे कारण काय?

Hanuman Puja: The practice of applying vermilion all over Hanuman's body started because of 'this' reason! | Hanuman Puja: 'सिंदूर' केवळ शृंगार नाही तर विश्वासाचे प्रतीक; हनुमंतालाही त्याचे लेपन करण्याचे कारण...

Hanuman Puja: 'सिंदूर' केवळ शृंगार नाही तर विश्वासाचे प्रतीक; हनुमंतालाही त्याचे लेपन करण्याचे कारण...

सिंदूर हे केवळ शृंगाराचे नाही तर अतूट विश्वासाचे प्रतीक आहे. ६ जुलै २०२५ रोजी रात्री भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' (Opration Sindoor) यशस्वी करून 'सिंदूर' या शब्दाचे पावित्र्य अधिकच वाढवले आहे. अलीकडे पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीयांनी आपले प्राण गमावले. घरातील कर्ता पुरुष वेचून वेचून मारला आणि स्त्रीयांचे सौभाग्य हिरावून घेतले. या सिंदूरचा बदला भारताने सिंदूरने घेतला. त्यामुळे हे नाव समर्पक ठरले आणि त्यामुळे भारतीय सैनिक आपल्या रक्षणार्थ कटिबद्ध आहेत हा विश्वास दृढ झाला. 

आपल्या संकटमोचक हनुमानाने देखील याच अतूट विश्वासाने आपल्या सर्वांगाला सिंदूर लेपन केले आणि तेव्हापासून हनुमान पूजेत सिंदूर अनिवार्य झाले आणि ते हनुमंताला लावण्याची प्रथा सुरू झाली. पण त्यामागे काय कारण होते तेही जाणून घेऊ. 

'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!

हनुमंताला उडीद, तेल, शेंदुर, रुईच्या पान-फुलांचा हार आवडतो. या सर्व गोष्टी आयुर्वेदिक दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. बलवर्धक, शक्तीवर्धक आहेत. हनुमंताने व्यायाम करून शरीर कमावले. त्या शरीराला पोषक घटक वरील गोष्टींतून मिळतात, म्हणून आजही त्यांच्या दर्शनाला जाताना आपण घरातून काळे उडीद घातलेले तीळाचे तेल घेऊन जातो व मंदिरातून रुईच्या पानाफुलांचा हार विकत घेऊन देवाला वाहतो. तरीदेखील एक प्रश्न अनुत्तरित राहतो, तो म्हणजे हनुमंताला शेंदूर का वाहिला जातो? तोही केवळ गंधापुरता नाही, तर सर्वांगाला का? यामागे एक पौराणिक कथा आहे. 

एकदा सीता माई साजश्रुंगार करत होती. त्याचवेळेस हनुमंत तिथे पोहोचले. मातेला नमस्कार केला आणि तिचे सात्विक रूप निहाळत होते. सगळा श्रुंगार झाल्यावर सीता माईने आपल्या भांगेमध्ये शेंदूराची लकीर ओढली. ती पाहता, हनुमंताने कुतुहलाने विचारले, `माते, हा सुद्धा तुमच्या श्रुंगाराचा एक भाग आहे का?' त्यावर हसून सीता माई म्हणाली, `हनुमंता, बाकीचे अलंकार नसले तरी चालतील, परंतु हा सर्वात महत्त्वाचा सौभाग्य अलंकार आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी भांगात शेंदूराची रेघ ओढतात.' 

यावर हनुमंत म्हणाले, `पतीला दीर्घायुष्य, म्हणजे प्रभू श्रीरामांना दीर्घायुष्य! पती म्हणजे पालन करणारा. याअर्थी ते माझेही, नव्हे तर या साऱ्या विश्वाचे पती आहेत. मग तुमच्यासारखेच प्रत्येकाने भांगात शेंदूर लावले पाहिजे आणि लावायचेच आहे, तर केवळ एक रेघ का? माझ्या रामरायाचे नाव अजरामर व्हावे, त्याचे अस्तित्त्व कायम राहावे, म्हणून मी शेंदूराची पूर्ण वाटीच अंगाला चोपडून घेतो.'

हनुमंतांनी नुसते म्हटले नाही, तर क्षणार्धात सर्वांगाल सिंदुरलेपन करून घेतले. त्याची ती वेडी रामभक्ती आणि अलोट रामप्रेम पाहून सीता माईला आणि रामरायाला भरून आले. तेव्हापासून हनुमंताला शेंदूर अर्पण करायची प्रथाच सुरू झाली, ती आजतागायत सुरू आहे. 

सीयावररामचंद्रकी जय! पवनसुत हनुमान की जय!

Web Title: Hanuman Puja: The practice of applying vermilion all over Hanuman's body started because of 'this' reason!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.