Hanuman Chalisa: इच्छापूर्तीसाठी आणि कामांना गती मिळण्यासाठी सलग ११ दिवस म्हणा हनुमान चालीसा; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 13:42 IST2024-04-13T13:41:53+5:302024-04-13T13:42:15+5:30
Hanuman Chalisa : हनुमान चालीसा हे एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे हे आपण जाणतोच, इच्छापूर्तीसाठी त्याचा उपयोग कधी आणि कसा करायचा त्याबद्दल नीट जाणून घ्या!

Hanuman Chalisa: इच्छापूर्तीसाठी आणि कामांना गती मिळण्यासाठी सलग ११ दिवस म्हणा हनुमान चालीसा; पण...
पवनसुत हनुमान हे प्रभू श्रीरामांचे निस्सीम भक्त! ते चिरंजीवी आहेत. एवढेच नाही तर ज्या रामभक्तांवर काही संकट येईल त्या संकटाच्या निवारणासाठी ते स्वतः धावून येतील हे त्यांनी श्रीरामांना वचनच दिले आहे. यासाठी संत तुलसी दास यांनी हनुमान चालिसाचे स्तोत्र लिहिले आहे. जेणेकरून आपल्याला संकटाचा सामना करावाच लागू नये आणि करावा लागला तर हनुमान उपासना कामी येऊन त्या संकटाचे निवारण होईल हा त्या स्तोत्र रचनेमागचा हेतू आहे.
या स्तोत्राचा लाभ कसा करून घेता येईल?
हनुमान चालीसा ही केवळ मारुती रायाची उपासना नाही, तर हे इच्छापूर्ती स्तोत्र आहे. जर तुम्ही देखील इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र म्हणण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी पुढील नियमांचे पालन करा.
१) सदर उपक्रम मंगळवारपासून सुरू करा.
२) आपली इच्छा मनोमन हनुमंताला सांगावी. दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होत नाही. स्वउत्कर्षाच्या हेतूने इच्छा प्रगट करावी.
३) हा उपक्रम ब्रह्ममुहूर्तावर पार पाडायचा असतो. म्हणून पहाटे ४ ते ६ दरम्यान उठून स्नान करून स्वच्छ जागा निवडावी.
४) हनुमंताची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून त्याला फुलं वाहावीत आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.
५) शांत चित्ताने हनुमान चालीसा स्तोत्रपठण सुरु करावे.
६) इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र सलग ११ दिवस ११ वेळा म्हणावे.
७) स्तोत्र म्हणताना तुलसीदास ऐवजी स्वतःचे नाव घ्यावे.
८) अकराव्या दिवशी ११ वेळा हनुमान चालीसा म्हणून झाल्यावर 'बजरंग बाण' हे स्तोत्र म्हणावे. कारण त्या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिला आहे.
लक्षात ठेवा देवाकडे मागताना शक्यतो भौतिक सुखात न अडकता आध्यात्मिक सुख मागण्याचा प्रयत्न करा. ते सुख चिरंतन टिकणारे आहे. तसेच दुसऱ्यांचे अहित चिंतू नका. हनुमंत तुमच्यावर रोष धरतील असे वागू नका. कालच्यापेक्षा आज आणि आजपेक्षा उद्या आपले व्यक्तिमत्त्व कसे सुधारेल यासाठी प्रयत्न करा आणि हा उपाय तुमच्याही मित्रपरिवारात गरजूंना जरूर सुचवा. सदर उपासना मनोभावे केली असता निश्चित स्वरूपात लाभ होतो, असा भक्तांचा आजवरचा अनुभव आहे!
(ज्योतिष तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार सदर माहिती उपासनेहेतु सांगितली आहे, याची नोंद घ्यावी)