गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 10:59 IST2025-07-23T10:59:15+5:302025-07-23T10:59:54+5:30

Gurupushyamrut Yoga July 2025: गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व काय? या दिवशी नेमके काय करावे? गुरु पुष्य योगावर लक्ष्मी पूजनाचे महत्त्व, मान्यता जाणून घ्या...

gurupushyamrut yoga july 2025 what is guru pushya amrit yoga should do lakshmi devi and kuldevi pujan for immense prosperity and timeless blessings | गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी

गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी

Gurupushyamrut Yoga July 2025: संपूर्ण वर्षात असे काही योग येतात, जे अतिशय शुभ, पुण्य फलदायी ठरतात. मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असलेला चातुर्मास सुरू आहे. चातुर्मासातील पहिला गुरुपुष्यामृत योग जुलै महिन्यात जुळून आलेला आहे. उत्तरेतील पंचांगानुसार, श्रावण महिना सुरू झाला असला, तरी महाराष्ट्रात शुक्रवार, २५ जुलै २०२५ रोजी श्रावणारंभ होणार आहे. अनेकार्थाने श्रावण महिना महत्त्वाचा मानला गेला आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? या योगावर नेमके काय करावे? जाणून घेऊया...

अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे, असे मानले जाते. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. चातुर्मासातील पहिली दीप अमावास्या गुरुवार, २४ जुलै २०२५ रोजी आहे. गुरुपुष्यामृत योगात श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजून ४३ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृतयोग आहे. दीप अमावास्या, श्रावण महिन्याची सुरुवात आणि गुरुपुष्यामृताचा अत्यंत शुभ मानला गेलेला योग यामुळे या दिवसांचे महत्त्व दुपटीने वाढल्याचे म्हटले जात आहे. 

लक्ष्मी पूजनाला अनन्य साधारण महत्त्व

गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते, असे सांगितले जाते. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र-तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे.

पुष्य नक्षत्राचे महात्म्य

गुरुपुष्यामृतयोग वारंवार येत नाही. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, त्या दिवशी गुरुपुष्यामृतयोग असतो. गुरुवारी धार्मिक कार्ये करणे उत्तम मानले गेले आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. जाणकारांच्या मते, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा, असेही म्हणतात.

दरम्यान, आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगदिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे, असे केल्यास मोठे यश प्राप्त होते, असे सांगितले जाते. अन्य कोणत्याही कामांसाठी हा योग शुभ असला, तरी या दिवशी विवाह करत नाहीत. कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे.

गुरु पुष्य योगात काय करावे

- गुरुपुष्यामृत योगात सोने, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करा. त्यानंतर देवघरात ठेवा.

- गुरुपुष्यामृत योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. या वेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशांमध्ये चांगल्याप्रकारे गुंतवणूक करु शकता.

- गुरुपुष्य योगामध्ये नवीन वाहन खरेदी करू शकतो. या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते. किंवा मग नवीन घराचे बांधकाम करू शकतो.

- गुरुपुष्यामृत योगात व्यवसाय, व्यापार यासंबंधीत महत्त्वाची कामे करता येऊ शकतात. अडकले पैसे परत मिळवण्याच्या योजनेवर काम करता येऊ शकते.

- पैशांशी संबंधित काही समस्या असतील, तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. 

- गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी स्त्रोताचे पठण करावे. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते, असे म्हटले जाते.

Web Title: gurupushyamrut yoga july 2025 what is guru pushya amrit yoga should do lakshmi devi and kuldevi pujan for immense prosperity and timeless blessings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.