शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:52 IST2025-08-19T17:48:00+5:302025-08-19T17:52:22+5:30
Gurupushyamrut Yoga August 2025: श्रावण महिना संपत असताना जुळून आलेला गुरुपुष्यामृत योग अतिशय शुभ, पुण्य फलदायी, लाभदायी मानला गेला आहे. जाणून घ्या...

शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
Gurupushyamrut Yoga August 2025: चातुर्मासातील श्रावण महिन्याची अवघ्या काही दिवसांतच सांगता होत आहे. श्रावणातील शेवटची व्रते आचरली जाणार आहेत. तत्पूर्वी, चातुर्मासात दुसऱ्यांदा गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. जुलै महिन्यात गुरुपुष्यामृत योग जुळून आला होता. आता ऑगस्ट महिन्यातही गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. गुरुपुष्यामृत योग वारंवार जुळून येत नाही. त्यामुळे चातुर्मासात दुसऱ्यांदा गुरुपुष्यामृत योग जुळून येणे दुर्मिळ आणि अतिशय शुभ मानले गेले आहे.
गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. गुरुपुष्यामृत योगात श्रावण महिन्याची सुरुवात झाली होती. आता श्रावण महिन्याची सांगता होतानाही गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. ही बाबत अतिशय दुर्लभ अन् पुण्य फलदायी मानली जात आहे. गुरुवार, २१ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. गुरुपुष्यामृतयोग सकाळी ०६ वाजून २३ मिनिटांपासून ते उत्तररात्रौ १२ वाजून ०८ मिनिटांपर्यंत असणार आहे. याच दिवशी श्रावणातील शेवटच्या गुरुवारी मासिक शिवरात्रीचे व्रत आहे.
अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ
अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे, असे मानले जाते. गुरुपुष्यामृतयोग वारंवार येत नाही. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, त्या दिवशी गुरुपुष्यामृतयोग असतो. गुरुवारी धार्मिक कार्ये करणे उत्तम मानले गेले आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. जाणकारांच्या मते, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा, असेही म्हणतात.
गुरुपुष्यामृत योगावर लक्ष्मी पूजनाचे अनन्य साधारण महत्त्व
गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते, असे सांगितले जाते. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र-तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे. आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगदिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे, असे केल्यास मोठे यश प्राप्त होते, असे सांगितले जाते. अन्य कोणत्याही कामांसाठी हा योग शुभ असला, तरी या दिवशी विवाह करत नाहीत. कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे.
गुरुपुष्यामृत योगात नेमके काय करावे?
- गुरुपुष्यामृत योगात सोने, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करा. त्यानंतर देवघरात ठेवा.
- गुरुपुष्यामृत योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. या वेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशांमध्ये चांगल्याप्रकारे गुंतवणूक करु शकता.
- गुरुपुष्य योगामध्ये नवीन वाहन खरेदी करू शकतो. या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते. किंवा मग नवीन घराचे बांधकाम करू शकतो.
- गुरुपुष्यामृत योगात व्यवसाय, व्यापार यासंबंधीत महत्त्वाची कामे करता येऊ शकतात. अडकले पैसे परत मिळवण्याच्या योजनेवर काम करता येऊ शकते.
- पैशांशी संबंधित काही समस्या असतील, तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी.
- गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी स्त्रोताचे पठण करावे. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते, असे म्हटले जाते.