Guru Purnima 2025: गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥, यंदा गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा गुरुवारी आल्याने या दिवसाचे महत्त्व आणि महात्म्य वाढल्याचे म्हटले जात आहे. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती. आपल्याकडे गुरु म्हणून दत्त गुरु, स्वामी समर्थ, गजानन महाराज, गगनगिरी महाराज, शंकर महाराज, गोंदवलेकर महाराज, साईबाबा अशा दैवी गुरूंची उपासना नित्यनेमाने केली जाते. प्रत्यक्ष दत्तगुरुंचे अवतार असणारे स्वामी समर्थ महाराज अनेकांचे गुरू आहेत. स्वामींनी अनेक दैवी शिष्य घडवले.
स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य चरित्राला एखाद्या हिऱ्याप्रमाणे अनेक दिव्य पैलू आहेत. त्यातील अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजेच तेजस्वी शिष्यपरंपरा. स्वामी समर्थांचे कोट्यवधी भक्तगण आहेत. तसेच त्यांचा शिष्यपरिवारही मोठा आहे. या आदर्श शिष्यवर्गाची संख्या सहज पंचवीसच्या घरात जाईल. यामध्ये बीडकर महाराज, शंकर महाराज आणि काळबोवा (पुणे), नृसिंह सरस्वती (आळंदी), सीताराम महाराज (मंगळवेढे), साईबाबा (शिर्डी), देवमामलेदार (नाशिक), रांगोळी महाराज (मालवण), श्रीकृष्ण सरस्वती (कोल्हापूर), स्वामीसुत (मुंबई), बाळप्पा महाराज (अक्कलकोट), ब्रह्मनिष्ठ वामनबुवा (बडोदे), धोंडिबा पलुस्कर (पलुस) आणि गजानन महाराज (शेगांव) आदी अनेक नावे अगदी सहजपणे सांगता येतील. या शिष्यवृंदांची चरित्रेही साधकांना सदैव स्फूर्ती देत राहतात, असे सांगितले जाते. कोणताही विधी न करता, स्वशिष्याचा सर्वोद्धार व्हावा अशा नुसत्या संकल्पानेच त्याला कृतार्थ करणे, जीवन्मुक्त करणे या दीक्षाप्रकाराला संकल्प दीक्षा असे म्हणतात. यातून स्वामी समर्थ महाराजांनी अनेकांचे मार्गदर्शन केले असे म्हटले जाते. गजानन महाराज आणि साईबाबा हे स्वामी समर्थांचे शिष्य असल्याचा उल्लेख स्वामी समर्थांशी निगडीत काही ग्रंथांत आल्याचे आढळून येते.
'गण गण गणात बोते'चा सिद्धमंत्र देणारे गजानन महाराज
संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजीचा. मानवी जीवनात संकट आल्यावर ईश्वरावाचून कोणीही तारणहार नाही, हे ईश्वरीतत्त्व जाणण्यासाठी शास्त्रात कर्म, भक्ती, योग हे तीन मार्ग सांगितले आहेत. गजानन महाराज त्रिकालज्ञ होते. भूत, भविष्य आणि वर्तमान याविषयी ते अगोदरच जाणून असायचे. गजानन महाराजांनी अनेक रंजले गांजलेल्यांना मार्गदर्शन केले व सन्मार्ग दाखविला. गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच होते. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. गजानन महाराज शेगावला येण्यापूर्वी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात होते व तिथे त्यांनी आपले बालपण घालविले, असा उल्लेख तुकाराम रामचंद्र नागलकर यांनी लिहिलेल्या एका पोथीत आढळून येतो. भाद्रपद शुद्ध पंचमी, ०८ सप्टेंबर १९१० रोजी गजानन महाराज शेगावी समाधीस्त झाले.
अवतारकार्यात हजारो भाविकांचा उद्धार
अक्कलकोट स्वामीनी गजानन महाराजांना सांगितले की, तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नियतीने कितीही वार केले तरी आत कुठेही जखम होत नाही. शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा, तिथे श्रीरामाचे दर्शन घे आणि मग पुढे जा. स्वामींचा आदेश घेऊन महाराजानी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले. तिथे उबंरठव्यावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या. हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला त्याला वाटले की ही भुताटकी आहे काय? पण प्रत्यक्ष श्रीराम मंदिरात भुतावळींना श्रीरामांच्या आज्ञेशिवाय प्रवेश नाही. मग असे भलते काय होत आहे, असे मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभूंसमोर हात जोडले. तेवढ्यात श्रीराम चरणी वाहिलेली फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली. ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि ते दृश्य पाहून मनोमन विचार केला ही कोणी साधारण व्यक्ती नाही आणि त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले. आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ गजानन महाराजांनी शेगांवमध्ये व्यतीत केला. अवतारकार्यात महाराजांची हजारो भाविकांचा उद्धार केल्याचे सांगितले जाते.
शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ महाराज
शंकर महाराज अवतारी पुरुष होते. शंकर महाराजांची मंदिरे, मठ अनेक ठिकाणी आहेत. शंकर महाराज यांना मानणारा, त्यांची भक्ती करणारा वर्गही मोठा आहे. श्री सद्गुरू शंकर महाराज यांचे नामस्मरण, उपासना करणारे भाविक देश-विदेशात असल्याचे सांगितले जाते. कठीण काळात शंकर महाराज पाठीशी उभे राहिल्याचे अनुभव अनेक जण सांगतात. शंकर महाराजांचा आवडता नंबर होता १३. कारण विचारले असता ते म्हणत " सबकुछ तेरा, कुछ नाही मेरा" महाराज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावानी प्रसिद्ध आहेत. श्री शंकर महाराजांचा पारमार्थिक उपदेशही अगदी साधा असे. शंकर महाराज हे श्री दत्तगुरुंचा तिसरा अवतार मानले गेलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांना गुरु मानत असत. शंकर महाराज हे स्वामींना ‘मालक’ असे संबोधत असत, असेही सांगितले जाते.
श्री स्वामी समर्थ यांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा
लहानपणी शंकर महाराज फार खोडकर आणि खट्याळ होते. एक दिवस एका हरिणाच्या पिल्लाचा पाठलाग करत ते एका अरण्यात पोहोचले. त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकराचे जीर्ण देऊळ दिसले. ते हरणाचे पिल्लू त्या देवळात आश्रयाला लपले. त्या पिल्लाला बाण मारणार एवढ्यात शंकर महाराजांसमोर एक दिगंबर साधू आले. त्याने त्या हरणाच्या पिल्लाला उचलून आपल्या कुशीत घेतले आणि महाराजांना म्हणाले की, कशाला मारतोस रे याला, काय बिघडवले याने तुझे. काही वेळाने त्या दिगंबर साधूने महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. ही त्यांची प्रथम स्पर्शशिक्षा. शंकर महाराज त्या स्पर्शाने अगदी भारावून गेले. तो दिगंबर साधू म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराज, असे म्हणतात. योगीराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसवून सद्गुरुचा महिमा सांगत असत. ते जेव्हा म्हणून अक्कलकोटला येत. तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने साश्रुमनाने श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत. तासनतास वटवृक्षाच्या छायेत रहात. संपूर्ण रात्रभर जागरण करीत व रात्रौ गुरूशिष्यांच्या भेटी होत. श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरू आहेत. त्यांच्या स्थानावर आम्ही येऊन सुखावतो. अक्कलकोटला जमलेल्या आपल्या भक्तांना शंकर महाराज सांगत माझे गुरू श्री स्वामी समर्थ यांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे.
शिर्डीचे साईबाबा एक दिव्य सत्पुरुष
साईबाबा शेगावच्या गजानन महाराजांना आपले गुरुबंधू मानीत असत. गजानन महाराज समाधिस्त झाले, त्या दिवशी साईबाबांनी स्वतः त्या उपस्थित भक्तांना सांगितले की, आज सुबह मेरा भाई जाता रहा, माझा जीव चालला, मोठा जीव चालला, असे म्हणत तीव्र शोक व्यक्त केला होता. यासंदर्भातील काही दाखले उपलब्ध आहेत. संत साईबाबा योगारूढ पुरूष असून निराकार परमेश्वराचे साकार रूप होते. साईबाबा समाजाचे उत्कृष्ट शिक्षक होते. आईच्या मायेने ते उपदेश करीत. त्यांचा भक्त वाईट मार्गाला लागला तर त्याला ते सन्मार्गाला लावीत. छोट्या छोट्या प्रसंगातून ते अध्यात्माचे महान तत्वज्ञान सांगत. कधी कधी गोष्टी सांगूनही ते लोकांना उपदेश करीत. परमार्थात गुरूवर नितांत श्रद्धा पाहिजे. श्रद्धा नसेल तर परमार्थ सफल होत नाही. श्रद्धा असेल तरच ज्ञान मिळते. कोणतीही गोष्ट झटपट मिळत नाही; त्यासाठी धैर्य धारण करावे लागते. प्रत्येक गोष्टीकरिता तपश्चर्या करावी लागते. योग्य वेळेची वाट पहावी लागते. साईबाबांचे त्यांच्या भक्तांवर फार प्रेम होते. १९१८ सालच्या विजयादशमीला या भक्तवत्सल महापुरुष समाधीस्त झाले. आजही हजारो भाविक शिर्डीला आवर्जून साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जातात. त्यांच्या चरणी नतमस्तक होतात. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत विशेष उत्सव असतो. साईबाबा उत्सव तीन दिवस चालतो.
।। श्री स्वामी समर्थ ।।
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥