गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 15:26 IST2025-07-01T15:19:39+5:302025-07-01T15:26:20+5:30
Guru Purnima 2025 Guru Charitra Parayan Rules: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुचरित्र पारायण करण्याची अनेकांची इच्छा असते. पारायण सप्ताह कधीपासून सुरू करावा? नेमके कोणते नियम पाळणे आवश्यक आहे? जाणून घ्या...

गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
Guru Purnima 2025 Guru Charitra Parayan Rules: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ दत्तसंप्रदाय, गुरुपरंपरेत गुरुचरित्र या ग्रंथाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. १४व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अद्भूत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला, असे सांगितले जाते. चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली आषाढ पौर्णिमा येते. आषाढ पौर्णिमा हीच गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भारतीय परंपरेत गुरुचे स्थान अगदी वरचे आहे. त्यामुळे या दिवशी गुरुपूजन करून गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक जण गुरुचरित्राचे विशेष पारायण करण्याचा संकल्प करतात. गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह करायचा असेल, तर कधीपासून सुरू करावा? गुरुपौर्णिमा कधी आहे? कसे पारायण करावे? महत्त्वाचे नियम, पारायण पद्धती आणि काही मान्यता जाणून घेऊया...
आषाढी एकादशी झाल्यानंतर १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा आहे. ०९ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री ०१ वाजून ३६ मिनिटांनी आषाढ पौर्णिमा प्रारंभ होणार असून, १० जुलै २०२५ रोजी उत्तर रात्रौ ०२ वाजून ०६ मिनिटांनी आषाढ पौर्णिमा समाप्त होणार आहे. गुरुवारी गुरुपौर्णिमा येत असल्याने या दिवसाचे महत्त्व अनेकपटींनी वाढलेले आहे. गुरुचरित्राचे सप्ताह पद्धतीने पारायण करायचे असल्यास गुरुपौर्णिमेला संपूर्ण पारायणाची सांगता व्हावी, अशा प्रकारे नियोजन करणे आवश्यक आहे. शुक्रवार, ०४ जुलै २०२५ रोजी गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करावी लागेल. ०४ जुलै ते १० जुलै या सात दिवसांत गुरुचरित्र सप्ताह पूर्ण होऊ शकेल. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. तसेच दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे, असे म्हटले जाते.
गुरुचरित्राचे स्वरुप आणि महत्त्व
हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्रीगुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरुपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. याशिवाय व्रत वैकल्येही सांगितली आहेत. यात्रांची वर्णने केली आहेत. आचारधर्म शिकवला आहे. मूल्यांची रुजवण केली आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे, याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे.
गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी कशी तयारी करावी?
गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी काही तयारी करणे आवश्यक आहे. दत्तगुरुंची मूर्ती किंवा मूर्ती नसेल, तर तसबीर घ्यावी. दत्तगुरु आणि स्वामींची प्रतिमा असेल, तरीही चालेल. ज्या दिवशी पारायण सुरू करणार असाल, त्या दिवशी एका चौरंगावर स्वच्छ वस्त्रे घालावे आणि त्यावर दत्तगुरुंची स्थापना करावी. गुरुचरित्र पारायण सप्ताह करण्याचा संकल्प करावा. तसेच गुरुचरित्र पारायण सप्ताह का करण्यात येत आहे, हेही दत्तगुरुंना सांगावे. संपूर्ण सात दिवस पारायण निर्विघ्न पद्धतीने पार पडावे, यासाठी दत्तगुरुंना साकडे घालावे. दत्तगुरुंची पूजा करण्यापूर्वी प्रथमेश असलेल्या गणपतीचे आवाहन करावे आणि पूजन करावे. यानंतर दररोज सप्ताह सुरू असताना गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी दत्तगुरुंची विशेष पूजा करावी. षोडषोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी. दररोज अभिषेक करावा. पिवळी फुले, पिवळ्या रंगाचा समावेश असलेली मिठाई आवर्जून अर्पण करावी. गुरुचरित्र पारायण सप्ताह पूर्ण झाला की, पिवळ्या रंगांच्या वस्तू, दत्तगुरुंशी संबंधित वस्तूंचे निश्चितपणे दान करावे.
गुरुचरित्र पारायण करण्याचे काही महत्त्वाचे नियम
- गुरुचरित्र पारायण काळात शक्य असेल, तर गोमातेला अन्नदान करावे.
- गुरुचरित्र वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा. श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी.
- गुरुचरित्राचे वाचन पहाटे ०३ ते सायंकाळी ०४ या दरम्यान करावे. दुपारी १२ ते १२.३० ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने या काळात पारायण वाचन बंद ठेवावे.
- गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतः च्या कुटुंबात सुतक आले तर अशा वेळेस गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे, अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे.
- गुरुचरित्र सप्ताह कालावधीत रोज सकाळी व सायंकाळी गुरुचरित्राच्या पोथीस धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. शक्य झाल्यास तिन्हीसांजेला श्रीविष्णू सहस्रनामाचे पठण करावे.
- वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे.
- वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे.
- वाचनासाठी ठरविक वेळ, ठरविक दिशा व ठरविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये.
- श्री दत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांचे आवाहन करावे.
- पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी.
- देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्त गुरु फेरी मारतात, अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे.
- वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे.
- पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करावी.
- वाचन शुचिर्भूत होऊन सोवळ्यानेच करावे.
- वाचनाच्या काळात मध्येच असनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये.
- वाचनात यांत्रिकपणा नको. मनोभावे वाचन करावे.
- शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे, इप्सित फळ आपोआप मिळते, असा गुरुभक्तांचा अनुभव आहे.
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा ॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥