गुरुप्रतिपदा: गुरुचरित्र पठण शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा, पूर्ण पुण्य मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 14:00 IST2025-02-12T13:54:20+5:302025-02-12T14:00:19+5:30

Guru Pratipada 2025: गुरुवारी आलेल्या गुरुप्रतिपदेला अवघ्या १० मिनिटांत पूर्ण पठण होणारे अत्यंत प्रभावी स्तोत्र म्हणा अन् दत्तुगुरुंचे शुभाशिर्वाद प्राप्त करून घ्या, असे सांगितले जाते.

guru pratipada 2025 recite the most impactful bavanshloki gurucharitra which may complete in 10 minutes and get timeless complete virtue | गुरुप्रतिपदा: गुरुचरित्र पठण शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा, पूर्ण पुण्य मिळवा!

गुरुप्रतिपदा: गुरुचरित्र पठण शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा, पूर्ण पुण्य मिळवा!

Guru Pratipada 2025: यंदा २०२५ मध्ये गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा आहे. याच दिवशी श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दळीवनात अवतार गुप्त ठेवला. प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्रीनृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने "श्रीगुरुप्रतिपदा" असे संबोधले जाते. द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले. श्रीगुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्य-तिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते. या दिवशी दत्तगुरूंचे पूजन, नामस्मरण, मंत्र जप करणे शुभ मानले जाते. श्रीनृसिंह सरस्वती महाराज गुरुचरित्राचे कर्ते मानले जातात. श्रीनृसिंह सरस्वती महाराजांचे स्मरण म्हणून संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करता आले नाही, तरी १० मिनिटांत होणारे आणि तितकेच पुण्य मिळणारे हे प्रभावी स्तोत्र अवश्य म्हणावे, असे सांगितले जाते. 

श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. गुरू म्हणजे केवळ मास्तर नव्हे, गुरू म्हणजे केवळ शिकविणारा नव्हे. ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते, आपल्यापाशी असलेली ज्ञानसमृद्धी शिष्यापर्यंत पोहोचवावी अशी ज्याला तळमळ असते. शिष्याने आपल्याही पुढे जावे अशी इच्छा जो मनोमन बाळगतो तो खरा गुरू. दत्त संप्रदायात गुरुचरित्रण पारायणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात. अपार पुण्य लाभते. दत्तगुरुंची विशेष कृपा होते, अशी मान्यता आहे. अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे पारायण केले जाते. श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. 

अत्यंत प्रभावी बावनश्लोकी गुरुचरित्र स्तोत्र

दत्त संप्रदायात गुरुचरित्रण पारायणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात. अपार पुण्य लाभते. दत्तगुरुंची विशेष कृपा होते, अशी मान्यता आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही इच्छा असली, तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे, त्यासाठी तेवढा वेळ देणे, शक्य होतेच असे नाही. गुरुचरित्राचे पारायण करावे, अशी मनापासून इच्छा असते, परंतु, अनेक गोष्टींमुळे, व्यवधानांमुळे शक्य होत नाही. पण निराश होण्याची आवश्यकता नाही. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे बावनश्लोकी गुरुचरित्र. हे अतिशय प्रभावी स्तोत्र असून, अवघ्या १० ते १५ मिनिटांत म्हणून पूर्ण होऊ शकते. एकदा सवय झाली की, यापेक्षाही कमी वेळ लागू शकतो. 

किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठण करावे

श्रीदत्त साहित्यात बावनश्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे. संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार यात दिलेले आहे. बावन श्लोकांत संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे. हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे. परम दत्तभक्तांनी याचे नित्यपठण करावे. किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठण करावे. बावनश्लोकी गुरुचरित्राच्या पठणाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ मिळून त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचे जाणवेल. कल्याण होईल, असे आशिर्वचन देण्यात आले आहे. 

बावनश्लोकी गुरुचरित्र स्तोत्र

श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रैयगुरुवे नमः ॥

अथ ध्यानम्

दिगंबरं भस्मसुगंधलेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदांच ।
पद्मासन्स्थं रविसोमनेत्रं दत्तात्रयं ध्यानमभिष्ट सिद्धिदम् ॥ १ ॥

काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखम् ।
चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ २ ॥

कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनंदनः ।
द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभः ॥ ३ ॥

ॐ नमोजी विघ्नहरा ।
 
गजानना गिरिजाकुमरा । जयजयाजी लंबोदरा । शकदंता शूर्पकर्णा ॥ १ ॥
 
त्रिमूर्तिराजा गुरु तूंचि माझा । कृष्णातिरी वास करुनी ओजा ॥
सद्भक्त तेथे करिती आनंदा । त्या देव स्वर्गी बघती विनोदा ॥ २ ॥
 
जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक भवार्णंवातुनी ।
संदेह होता माझे मनीं । आजि तुवां कुडें केलें ॥३॥

ऐशी शिष्याची विनंती । ऐकूनि सिद्ध काय बोलती ।
साधु साधु तुझी भक्ति । प्रीती पावो श्रीगुरुचरणीं ॥४॥

भक्तजन रक्षणार्थ । अवतरला श्रीगुरुनाथ ।
सगरपुत्रा कारणें भगीरथें । गंगा आणिली भूमंडळीं ॥५॥

तीर्थें असती अपार परी । समस्त सांडूनि प्रीति करी ।
कैसा पावला श्रीदत्तात्री । श्रीपादश्रीवल्लभ ॥६॥

ज्यावरीं असे श्रीगुरुची प्रीति । तीर्थमहिमा ऐकावया चित्तीं ।
वांछा होतसे त्या ज्ञानज्योती । कृपामूर्ति गुरुराया ॥७॥

गोकर्णक्षेत्रीं श्रीपादयती । राहिले तीन वर्षें गुप्ती ।
तेथूनि गुरु गिरिपुरा येती । लोकानुग्रहाकारणें ॥८॥

श्रीपाद कुरवपुरीं असता । पुढें वर्तली कैसी कथा ।
विस्तारुनि सांग आतां । कृपामूर्ति दातारा ॥९॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी ।
अनंतरुपें परियेसी । विश्वव्यापक परमात्मा ॥१०॥

सिद्ध म्हणे ऐक वत्सा । अवतार झाला श्रीपाद हर्षा ।
पूर्व वृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्त्रियेची ॥११॥

श्रीगुरु म्हणती जननीसी । आम्हां ऐसा निरोप देसी ।
अनित्य शरीर तूं जाणसी । काय भंरवसा जीवित्वाचा ॥१२॥

श्रीगुरुचरित्र कथामृत । सेवितां वांछा अधिक होत ।
शमन करणार समर्थ । तूंचि एक कृपासिंधु ॥१३॥

ऐकूनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण ।
श्रीगुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता झाला विस्तारें ॥१४॥

ऐक शिष्या शिरोमणी । धन्य धन्य तुझी वाणी ।
तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली परियेसी ॥१५॥

विनवी शिष्य नामांकित । सिद्ध योगियातें पुसत ।
सांग स्वामी वृत्तांत । श्रीगुरुचरित्र विस्तारें ॥१६॥

ऐक शिष्या नामकरनी । श्रीगुरुभक्त शिखामणी ।
तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली निर्धारें ॥१७॥

ध्यान लागलें श्रीगुरुचरणीं । तृप्ति नोहे अंतःकरणीं ।
कथामृत संजीवनी । आणिक निरोपाची दातारा ॥१८॥

अज्ञान तिमिर रजनींत । निजलो होतो मदोन्मत्त ।
श्री गुरुचरित्र वचनामृत । प्राशन केलें दातारा ॥१९॥

स्वामी निरोपिलें आम्हांसी । श्रीगुरु आले गाणगापुरासी ।
गौप्यरुपें अमरपुरासी । औदुंबरीं असती जाण ॥२०॥

सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी कारणिका ।
उपदेशी ज्ञान विवेका । तये प्रेंत जननीसी ॥२१॥

तुझा चरणसंपर्क होता । झालें ज्ञान मज आतां ।
परमार्थीं मन ऐकतां । झालें तुझें प्रसादें ॥२२॥

लोटांगणें श्रीगुरुसी । जाऊनि राजा भक्तीसीं ।
नमस्कारी विनयेसी । एकभावें करुनियां ॥२३॥

शिष्यवचन परिसुनी । सांगता झाला सिद्धमुनी ।
ऐक भक्ता नामकरणी । श्रीगुरुचरित्र अभिनव ॥२४॥

सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरुची अगम्य लीला ।
सांगतां न सरे बहुकाळा । साधारण मी सांगतसे ॥२५॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । नको भ्रमू रे युक्तीसी ।
वेदांत न कळे ब्रह्मायासी । अनंत वेद असती जाण ॥२६॥

चतुर्वेद विस्तारेंसी । श्रीगुरु सांगती विप्रासी ।
पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावी दातारा ॥२७॥

नामधारक म्हणे सिद्धासी । पुढील कथा सांगा आम्हांसी ।
उल्हास होतो माझे मानसीं । श्रीगुरुचरित्र अति गोड ॥२८॥

पुढें कथा कवणेपरी । झाली असे गुरुचरित्रीं । 
निरुपावें विस्तारीं । द्धमुनी कृपासिंधू ॥२९॥

श्रीगुरुचरित्र सुधारस । तुम्हीं पाजिला आम्हांस ।
परि तृप्त नव्हे गा मानस । तृषा आणिक होतसे ॥३०॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका ।
योगेश्वर कारणिका । सांगे स्त्रियांचे स्वधर्म ॥३१॥

पतिव्रतेच्या रीती । सांगे देवांसी बृहस्पती ।
सहगमनाची फलश्रुती । येणें परी निरुपिली ॥३२॥

श्रीगुरु आले मठासी । पुढें कथा वर्तली कैसी ।
विस्तारुनि आम्हांसी । निरुपावें स्वामिया ॥३३॥

श्रीगुरु म्हणती दंपतीसी । ऐका पाराशरऋषि ।
तया काश्मीररायासी । रुद्राक्षमहिमा निरुपिला ॥३४॥

पुढें कथा कैसी वर्तली । विस्तारुनि सांगा वहिली ।
मति असे माझी वेधिली । श्रीगुरुचरित्र ऐकावया ॥३५॥

गाणगापुरीं असतां श्रीगुरु । महिमा झाला अपरंपारु ।
सांगतां न ये विस्तारु । तावन्मात्र सांगतसे ॥३६॥

ऐसा श्रीगुरु दातारु । भक्तजनां कल्पतरु ।
सांगतां झाला आचारु । कृपा करुनि विप्रांसी ॥३७॥

आत झालों मी तृषेचा । घोट भरवीं गा अमृताचा ।
चरित्रभाग सांगें श्रीगुरुचा । माझें मन निववीं वेगीं ॥३८॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका ।
साठ वर्षें वांझ देखा । पुत्रकन्या प्रसवली ॥३९॥

सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तलें आणिक ऐका ।
वृक्ष झाला काष्ट सुका । विचित्र कथा परियेसा ॥४०॥

जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक या भवार्णवांतुनी ।
नाना धर्म विस्तारुनि । श्रीगुरुचरित्र निरुपिलें ॥४१॥

मागें कथा निरुपिलें । सायंदेव शिष्य भले ।
श्रीगुरुंनीं त्यासी निरुपिलें । कलत्रपुत्र आणि म्हणती ॥४२॥

श्रीगुरु म्हणती द्विजांसी । या अनंत व्रतासी ।
सांगेन ऐका तुम्हांसी । पूर्वीं बहुतीं आराधिलें ॥४३॥

श्रीगुरु माझा मल्लिकार्जुन । पर्वत म्हणजे श्रीगुरुभवन ।
आपण नये आतां येथून । सोडूनि चरण श्रीगुरुचे ॥४४॥

तूं भेटलासी मज तारक । दैन्य गेले सकळहि दुःख ।
सर्वाभीष्ट लाधलें सुख । श्रीगुरुचरित्र ऐकतां ॥४५॥

गाणगापुरीं असतां श्रीगुरु । ख्याति झाली अपारु ।
लोक येती थोरथोरु । भक्त बहुत झाले असती ॥४६॥

सांगेन ऐका कथा विचित्र । जेणें होय पतित पवित्र ।
ऐसें हें श्रीगुरुचरित्र । तत्त्परतेसी परियेसा ॥४७॥

श्रीगुरु नित्य संगमासी । जात होते अनुष्ठानासी ।
मार्गांत शूद्र परियेसी । शेतीं आपुल्या उभा असे ॥४८॥

त्रिमूर्तींचा अवतार । वेषधारी झाला नर ।
राहिलें प्रीतीं गाणगापुर । कवण क्षेत्र म्हणूनियां ॥४९॥

तेणें मागितला वर । राज्यपद धुरंधर ।
प्रसन्न झाला त्यासी गुरुवर । दिधला वर परियेसा ॥५०॥

राजभेटी घेउनी । श्रीपाद आले गाणगाभुवनीं ।
योजना करिती आपुले मनीं । गौप्य रहावें म्हणूनियां ॥५१॥

म्हणे सरस्वती गंगाधर । श्रोतयां करी नमस्कार ।
कथा ऐका मनोहर । सकळाभीष्ट साधेल ॥५२॥

॥ इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे द्विपंचाशत् श्लोकात्मकं गुरुचरित्रं संपूर्णम् ॥

॥ दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
 

Web Title: guru pratipada 2025 recite the most impactful bavanshloki gurucharitra which may complete in 10 minutes and get timeless complete virtue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.