गुरुप्रतिपदा: त्रैलोक्याचा राजा, दत्त संप्रदायातील युगपुरुष; श्रीनृसिंह सरस्वतींचे अवतारकार्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 13:35 IST2025-02-12T13:34:57+5:302025-02-12T13:35:17+5:30
Guru Pratipada 2025: दत्तगुरुंचे द्वितीयावतार श्रीनृसिंह सरस्वती महाराजांनी गुरुप्रतिपदेला अवतारकार्याची सांगता केली. जाणून घ्या...

गुरुप्रतिपदा: त्रैलोक्याचा राजा, दत्त संप्रदायातील युगपुरुष; श्रीनृसिंह सरस्वतींचे अवतारकार्य
Guru Pratipada 2025: यंदा २०२५ मध्ये गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा आहे. याच दिवशी श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दळीवनात अवतार गुप्त ठेवला. प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्रीनृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने "श्रीगुरुप्रतिपदा" असे संबोधले जाते. द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले. श्रीगुरुप्रतिदा पुण्यपावन तिथीला अनन्य साधारण महत्त्व आहे. श्रीगुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्य-तिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते. गुरुप्रतिपदा निमित्ताने श्रीनृसिंह सरस्वती महाराजांचे अलौकिक अवतारकार्य अगदी थोडक्यात पाहुया...
नृसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती यांना दत्तात्रयाचे दुसरे अवतार आणि श्रीवल्लभांचे उत्तरावतार मानतात. माघ कृष्ण प्रतिपदेला त्यांनी आपले अवतार कार्य संपवले. म्हणूनच या तिथीला गुरुप्रतिपदा असे म्हटले जाते. गुरुप्रतिदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो. भगवान श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराजांनी, कुरवपूरच्या कृष्णानदीत आत्मार्पण करायला निघालेल्या एका स्त्रीला, पुढील जन्मी उत्तम पुत्र होण्यासाठी शनिप्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले होते. तीच पुढच्या जन्मी अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी जन्माला आली. पुढे त्याच गावातील माधव विप्राशी या अंबा नामक स्त्रीचा विवाह झाला. पूर्वावतारात दिलेल्या आशीर्वादानुसार, भगवान श्रीदत्तप्रभूंनी श्री नरहरी रूपाने तिच्या पोटी, शके १३०० अर्थात् इ.स. १३७८ मध्ये पौष शुद्ध द्वितीयेला मध्यान्ही कलियुगातील आपला दुसरा अवतार घेतला. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लाखो लीलांपैकी काही अद्भुत लीला श्रीगुरुचरित्रात वर्णन केलेल्या असून, श्रीदत्तसंप्रदायात या ग्रंथराजाला वेदतुल्य मानून याची उपासना केली जाते.
मौंजीबंधन होईपर्यंत फक्त ॐ एवढाच उच्चार
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली ८-१० वर्षे कारंज्याला राहिले. तेथे त्यांनी अलौकिक बाललीला केल्या. मौंजीबंधन होईपर्यंत ते फक्त ॐ एवढाच उच्चार करीत असत. त्यांच्या आई-वडिलांना वाटले की, बालक मुके आहे की काय? पण त्यांनी मुंजीच्या भिक्षावळीत चारही वेदांचे पठण करून मौन सोडले. त्यानंतर ते एक वर्ष ज्ञानी लोकांना वेदादी शास्त्रे शिकवत होते. नंतर काशी येथे जाऊन त्यांनी श्रीमत् कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली व पुढील तीस वर्षे उत्तरेत व उर्वरित भारतात जगदोद्धारार्थ भ्रमण करून पुन्हा कारंज्याला आले.
नरसोबाची वाडी, गाणगापूर येथे प्रदीर्घ वास्तव्य
उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर ते दक्षिणेस प्रथम कारंजे येथे आले. माता-पित्यांना भेटले. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर, अमरापूर या गावी राहिले. अमरापूर हे गांव कृष्णा-पंचगंगा संगमावर आहे. तेथे नरसिंह सरस्वती बारा वर्षे राहिले. त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळेच या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर गाणगापुरी ते चौवीस वर्षे राहिले. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून अवतारकार्य संपवले होते. नृसिंह सरस्वती महाराजांनी कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य केले. आपल्या 'विमल पादुका ' स्थापन करून वाडीला गमन केले होते. अश्विन कृष्ण द्वादशी, श्रीगुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या 'मनोहर पादुका' स्थापन करून गाणगापुरकडे प्रयाण केले. या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून, निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत, याची माहिती कोणालाच नाही. विमल पादुका सोडून बाकी अन्य दोन पादुकांच्या नावांचे संदर्भ श्रीगुरुचरित्रात पाहायला मिळतात. औदुंबर येथे नृसिंहसरस्वती महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत. पण या नावाचा उल्लेख श्रीगुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल, दोष नसणाऱ्या पादुका.
नृसिंह सरस्वतींचे जीवनकार्य पथप्रदर्शक प्रखर ज्योतीसारखे कल्याणकारक ठरले
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी त्याकाळात लोप पावत चाललेल्या वेदविहित धर्माची पुनर्स्थापना केली. लोकांमध्ये भक्तिमार्गाचा प्रसार केला. ते स्वत: अत्यंत कडक आचरण करीत. नृसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली. त्यांच्या निवासामुळे औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्तसांप्रदायिकांची तीर्थक्षेत्रे बनली. ज्या काळात महाराष्ट्राची वाटचाल घनांधकारातून सुरू होती, त्या काळात नृसिंह सरस्वतींचे जीवनकार्य पथप्रदर्शक प्रखर ज्योतीसारखे कल्याणकारक ठरले. महाराष्ट्रभूमीला भक्तीचा, मुक्तीचा मार्ग दाखविणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात ‘युगपुरुष’ म्हणून चिरंतन राहील.
श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन योगमार्गाने अदृश्य
भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे स्मर्तृगामी व स्मरणमात्रे संतुष्ट होणारे परमदयाळू व भक्तवत्सल आहेत. प्रेमभराने व निर्मळ अंत:करणाने त्यांना घातलेली साद त्यांच्यापर्यंत पोचतेच पोचते, असा लाखो भक्तांचा आजवरचा रोकडा अनुभव आहे. अंदाजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी, गाणगापुरात 'निर्गुण पादुका' स्थापून ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन योगमार्गाने मल्लिकार्जुनाच्या लिंगात अदृश्य झाले. त्यांनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही. श्रींचा जो अपार्थिव, दिव्य-पावन श्रीविग्रह अशाप्रकारे स्थूलरूप धारण करून कार्यरत होता, तोच आजही गुप्तरूपाने व पादुका रूपाने अखंडपणे भक्तांचे सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण करीत आहे व पुढेही करीत राहीलच. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी ही श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी आहे. तेथे ते निरंतर राहून भक्तकल्याण करीत असतात. त्यांचेच प्रत्यक्ष अधिष्ठान आमच्या श्रीक्षेत्र दत्तधाम येथेही आहे. वाडी-गाणगापूर प्रमाणे आम्ही दत्तधाम येथेही निरंतर वास्तव्य करू, असा प्रेमळ आशीर्वाद त्यांनी स्वत: दिला आहे.
या अखिल ब्रह्मांडांचे नायक असणाऱ्या, भक्तांचे भवभय वारण करणाऱ्या, कृष्णातीरी नित्य नांदणाऱ्या, त्रिभुवनात ज्यांच्या कीर्तीचा डंका सदैव वाजत असतो, त्या परमदयाळू परमकनवाळू महाराजाधिराज श्रीमत् भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीचरणी गुरुप्रतिपदा दिनी प्रेमभराने साष्टांग दंडवत घालून त्यांचेच परमपावन नाम घेत त्यांना कृपाप्रसादाची प्रार्थना करूया !!!
।। अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।।