गुरुप्रतिपदा: निर्गुण पादुका महात्म्य वाचा; नृसिंह सरस्वतींना बेसन लाडवांचा नैवेद्य दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:57 IST2025-02-12T12:54:23+5:302025-02-12T12:57:59+5:30

Guru Pratipada 2025: गुरुवारी येत असलेल्या गुरुप्रतिपदेला आवर्जून नृसिंह सरस्वती महाराजांना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते.

guru pratipada 2025 know about gangapur mandir nirgun paduka timeless significance and offer besan laddu to shree nrusimha saraswati maharaj | गुरुप्रतिपदा: निर्गुण पादुका महात्म्य वाचा; नृसिंह सरस्वतींना बेसन लाडवांचा नैवेद्य दाखवा

गुरुप्रतिपदा: निर्गुण पादुका महात्म्य वाचा; नृसिंह सरस्वतींना बेसन लाडवांचा नैवेद्य दाखवा

Guru Pratipada 2025: यंदा २०२५ मध्ये गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा आहे. याच दिवशी श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दळीवनात अवतार गुप्त ठेवला. ३०० वर्षांनी स्वामी समर्थ अवतार प्रकट केला. त्यानिमित्त श्रीक्षेत्र गाणगापूर व निर्गुण पादुका यांचे महात्म्य आणि श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य का दाखवला जातो, याबाबत जाणून घेऊया...

दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदी मधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त जाहल्या नंतर सर्व भक्तांना या पादुका स्थळी "श्री नृसिंहसरस्वती" महाराजांनी दर्शन दिले. गाणगापूर तेथील पादुकांना ‘निर्गुण पादुका’ अशी संज्ञा आहे. येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात कुठलाही पाणी स्पर्श नाही. या पादुका चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पंचोपाचारांसाठी ताम्हणांत ‘उदक’ सोडतात.

श्रीक्षेत्र गाणगापूर हे ‘दत्तभक्तांचे पंढरपूर’

श्रीक्षेत्र गाणगापूर हे ‘दत्तभक्तांचे पंढरपूर’ मानले जाते. येथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात. या जागृत स्थानात सर्व तऱ्हेचे पावित्र्य सांभाळावे लागते. भगवान श्रीदत्तात्रेयांचे द्वितीयावतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल २३ वर्षे वास्तव्यास होते. या वास्तव्यात या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या. ‘निर्गुण पादुका’च्या द्वारा इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे. श्री क्षेत्र गाणगापूरला जेथे निर्गुण मठ आहे, त्याच स्थानी श्री नृसिंह सरस्वती  निवासास होते, असे म्हटले जाते. तेथे श्रींच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत. त्याच खाली एक तळघर आहे. त्या गुफेत स्वामी महाराज दररोज ध्यानासाठी बसत. आता ती गुफा बंद केलेली आहे. पण पूर्वीचे पुरोहित सांगत की, त्या  ठिकाणी भगवान श्री नृसिंह स्वामी महाराजांनी  स्वहस्ते श्री नृसिंह यंत्राची स्थापना केलेली होती. तसे उल्लेख जुन्या नोंदीत सापडतात. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र, स्वामींनी श्रीशैल्य गमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजाही करीत असत. पुढे महाराजांच्याच आज्ञेने ती गुफा चिणून बंद करण्यात आली.

पिशाच्च विमोचनाचे तर हे महातीर्थच

श्रीनृसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्तभक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे. इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. पिशाच्च विमोचनाचे तर हे महातीर्थच आहे. श्रद्धाळू भाविकाला आजही इथे साक्षात दत्तदर्शन घडते. तसे दर्शन झालेले सत्पुरुष विद्यमान काळीही वास्तव्य करुन श्रीदत्तप्रभूंच्या कृपेने जगाला सन्मार्ग दाखवीत आहेत. श्रीनिर्गुण पादुका मंदिर (अथवा श्रीगुरूंचा मठ) हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी आहे. श्रीनृसिंह सरस्वतींची अनुष्ठान भूमी भीमा-अमरजा संगमावर असून हे स्थान गाणगापूरच्या नैऋत्येस साधारण ३ किमी अंतरावर आहे. श्रीगुरू ज्या अश्वस्थ वृक्षाखाली अनुष्ठान करीत तेथेच आताचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. 

सगुण स्वरुपातील निर्गुण पादुकांचे कालातीत महत्त्व

श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे ज्या वेळेस श्रीशैल यात्रेस निघाले त्या वेळी सर्व भक्तांच्या, शिष्यांच्या आग्रहावरून, हार्दिक प्रार्थनेवरून त्यांनी आपल्या ‘निर्गुण पादुका’ इथे ठेवल्या. या पादुकांना सगुण आकार असूनही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात. त्याचे कारण असे की आपण आपल्या मनातील संकल्प ज्या वेळेस या ठिकाणी सांगतो त्या वेळेस श्रीदत्तप्रभू आपले काम अप्रत्यक्षरीत्या या पादुकांद्वारा करतात. दर्शन सगुण असले तरी कार्य करणारी परमेश्वरी शक्ती ही निर्गुण, निराकार असते. म्हणून या पादुकांना ‘निर्गुण पादुका’ म्हणतात. भक्तकल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुकांच्या सामर्थ्याने आजपर्यंत लाखो भक्तांची दैन्य-दु:खे व अटळ संकटे निवारण झालेली आहेत.

श्री नृसिंह सरस्वतींना बेसन लाडवांचा नैवेद्य दाखवा

गुरु प्रतिपदेला गाणगापूर सोडताना भक्तांनी श्रीगुरू महाराजांना सोबत बेसनाचे लाडू दिले. महाराज तर गाणगापूर मठातच गुप्त राहणार होते. पण भक्तांचा भाव पाहून त्यांनी प्रेमाचे लाडू बरोबर घेतले. महाराजांसोबत गाणगापूर सोडताना साखरे सायंदेव, दोघं नंदी कविश्वर व सिद्ध होते. कुरवपूरचा पुर्वाश्रमीचा भक्त रविदास म्हणजे बिदरच्या बादशहाला महाराजांनी परस्पर श्रीशैल्य येथे यायला सांगितले होते. येथेच महाराजांनी बादशहाला व साखरे सायंदेवांना श्रीशैल्य येथून कुरवपूर येथे जाऊन मंदिर निर्माण करण्यासाठी आदेशित केले. आज जे कुरवपूर मंदिर व ओवरी आपण पाहतोय ती या दोघांनीच बांधून घेतली आहे. गुरुप्रतिपदा दिवसाचे महात्म्य जाणून घेत अवतार परंपरा म्हणून आपल्या देवघरात महाराजांची किंवा दत्तगुरूंची पूजा करून बेसन लाडू नैवेद्य दाखवावा. तो छोट्या बंद डब्यात अहोरात्र देवघरात ठेवावा. दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून ग्रहण करावा, असे सांगितले जाते. 
 

Web Title: guru pratipada 2025 know about gangapur mandir nirgun paduka timeless significance and offer besan laddu to shree nrusimha saraswati maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.