Gudi Padwa 2026: गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी यंदा गुढीपाडवा आहे. परंतु, याच दिवशी अमावास्या असल्याने गुढीपाडवा नेमका कधी साजरा करावा, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. भारतीय पंचांग पद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ०६ वाजून ४५ मिनिटांनी सूर्योदय होणार आहे. तर सकाळी ०६ वाजून ५३ मिनिटांपर्यंत अमावास्या असणार आहे. सकाळी अमावास्या संपली की प्रतिपदा लागणार आहे. त्यामुळे १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा साजरा करावा, असे सांगितले जात आहे. प्रत्येक वर्षी संवत्सर बदलत असते. यंदाच्या संवत्सराचे नाव आणि गुढी पाडव्याच्या काही मान्यता जाणून घेऊया...
या वर्षी दि. १९ मार्च २०२६ रोजी गुरुवारी गुढीपाडवा आहे. या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय असल्याने अमावास्या समाप्तीनंतर म्हणजे सकाळी ०६ वाजून ५३ मिनिटांनंतर गुढी उभी करावी. गुढीपाडव्यानिमित्त केले जाणारे पंचांगस्थ गणपती पूजनही सकाळी अमावास्या संपल्यानंतर करावे. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारे श्रीराम नवरात्र आणि वासंतिक नवरात्रारंभही अमावास्या समाप्तीनंतर करावा. चैत्र शुद्ध प्रतिपदा क्षय तिथी असली तरी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने हा दिवस शुभच आहे. यापूर्वी १९ मार्च २००७, ०६ एप्रिल २००८ आणि २८ मार्च २०१७ रोजी अमावास्या सांगता झाल्यावर गुढीपूजन करण्यात आलेले होते.
यंदाच्या संवत्सराचे नाव काय?
सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. अत्यंत उत्साहपूर्ण असे वातावरण या दिवशी असते. हिंदू नववर्ष प्रत्येक वर्षी नवे संवत्सर नाम घेऊन येते. १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा असून, यंदा श्रीशालिवाहन शके १९४८ प्रारंभ होत आहे. यंदा पराभव नावाचे संवत्सर सुरू होणार आहे. संवत्सर हा एक वर्षाचा किंवा बारा महिन्यांचा कालावधी असतो. चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे ३५४ दिवसांचा असतो. यास 'चांद्र वर्ष' असेही म्हटले जाते. गुढी पाडवा या दिवशी एक शक संवत्सर संपून दुसरे सुरू होते.
संवत्सर म्हणजे कालचक्र, कालमापन पद्धती
संवत्सर म्हणजे एक कालचक्र असून, ही एक कालमापन पद्धती आहे. शालिवाहन शकाखेरीज अन्य अनेक संवत्सरे आहेत. ६० वर्षांत सूर्याभोवती गुरूच्या ५ आणि शनीच्या २ प्रदक्षिणा पूर्ण होतात आणि दोघांच्या आकाशातील स्थितीची पुनरावृत्ती होते. गुरूच्या प्रदक्षिणेचा १/१२ काळ म्हणजे एक संवत्सर होय. गुरूला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास सुमारे १२ वर्षे लागतात. म्हणजे १ संवत्सर होय. ८६ संवत्सरांमध्ये ८५ वर्षे पूर्ण होतात. काही फरकांमुळे एका वर्षाचा लोप होतो. संवत्सर हा महाकालाचा एक भाग मानला जातो.
श्रीराम नवरात्रोत्सव
भगवान विष्णूंनी सातवा रामवतार चैत्र शुद्ध नवमीला घेतला. याच दिवशी राम नवमी साजरी केली जाते. श्रीराम वनवासात असताना त्यांची भेट सुग्रीवाशी होते. वानरराज बालीच्या अत्याचाराचे सर्वकथन सुग्रीव श्रीरामांसमोर करतात. अखेर बालीचा वध करण्याचा निर्णय श्रीराम घेतात. बालीचा वध करून श्रीरामांनी दक्षिणेतील प्रजेला अत्याचारापासून मुक्त केले. प्रजाजनांनी विजयाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला. त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा सुरू झाली, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
चैत्र वासंतिक नवरात्रोत्सव
संपूर्ण मराठी वर्षात चार नवरात्र साजरी केली जातात. यातील पहिले नवरात्र चैत्र महिन्यात साजरे केले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथे नवरात्र मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाते. नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस देवी व्रत, पूजन आणि भजन केले जाते. पहिल्या दिवशी दैवी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंध माता, सहाव्या दिवशी कात्यायणी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी तर नवव्या दिवशी सिद्धिदात्री अशा देवींच्या नऊ स्वरुपाचे पूजन केले जाते.
गुढीपाडवा आणि आरोग्य
गुढी पाडवा, चैत्र महिना हा हिंदू धर्म, संस्कृती आणि नववर्ष म्हणून साजरा केला जात असला, तरी त्याचे आरोग्याच्या दृष्टिनेही तितकेच महत्त्व आहे. आंध्र प्रदेशात या दिवशी विशेष प्रकारचा प्रसाद वाटला जातो. या प्रसादाच्या सेवनाने मानवी शरीर निरोगी राहण्यास मदत होते. तसेच त्वचारोग निवारण्याची क्षमता त्यात असते, असे म्हटले जाते. आंबा सेवन केल्याने मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. तसेच कडुनिंबाच्या चटणी शरीरासाठी पाचक मानली जाते. उन्हाची काहिली सहन करण्यासाठी शरीर सज्ज व्हावे म्हणून अनेक विशेष आहार घेतला जातो.
Web Summary : Gudi Padwa in 2026 falls on March 19th, commencing the new Samvatsara. The day marks the start of Chaitra Navratri. This year's Samvatsara is named 'Parabhav'. The day signifies new beginnings and is celebrated with traditional customs and delicious food with health benefits.
Web Summary : 2026 में गुड़ी पड़वा 19 मार्च को है, जो नए संवत्सर की शुरुआत है। यह दिन चैत्र नवरात्रि की शुरुआत का प्रतीक है। इस वर्ष के संवत्सर का नाम 'पराभव' है। यह दिन नई शुरुआत का प्रतीक है और इसे पारंपरिक रीति-रिवाजों और स्वादिष्ट भोजन के साथ मनाया जाता है, जिसके स्वास्थ्य लाभ भी हैं।