Gudi Padwa 2025: गुढीपाडव्याला 'युगादि' विशेषण का लावले जाते? या सणाची शास्त्रशुद्ध पद्धत जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 14:19 IST2025-03-26T14:06:39+5:302025-03-26T14:19:01+5:30

Gudi Padwa 2025 Information in Marathi: यंदा ३० मार्च २०२५ रोजी गुढी पाडवा आहे, त्यानिमित्त या आनंददायी सणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया. 

Gudi Padwa 2025: Why is Gudi Padwa called 'Yugadi'? Learn the scientific method of this festival! | Gudi Padwa 2025: गुढीपाडव्याला 'युगादि' विशेषण का लावले जाते? या सणाची शास्त्रशुद्ध पद्धत जाणून घ्या!

Gudi Padwa 2025: गुढीपाडव्याला 'युगादि' विशेषण का लावले जाते? या सणाची शास्त्रशुद्ध पद्धत जाणून घ्या!

>>मृदुला विजय हब्बु

हिंदु वर्षातला पहिला महिना म्हणजे चैत्र. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. वसंतऋतुचा प्रारंभ याच महिन्यापासून होतो. झाडाझुडपांना पालवी फुटून सगळीकडे हिरवे हिरवे झालेले असते. सुखकारक हवा, कोकिळेचे मधूर गायन यांनी सर्वांची मने उल्हसित झालेली असतात. या महिन्यातील चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सर्व सणांचा आरंभ होतो. यंदा ३० मार्च २०२५ रोजी गुढीपाडवा (Gudi Padwa 2025) आहे. 

नव्या वर्षांतला पहिला दिवस पहिला सण म्हणजे युगादि म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी शालिवाहनशकाचे नवे वर्ष सुरू होते. साडेतीन मुहूर्तातील एक पुर्ण मुहूर्त म्हणजे युगादि पाडवा. नव्या गोष्टींचा आरंभ म्हणजे पाडवा. पाडव्याच्या दिवशी नवीन कामांना सुरुवात करणे आध्यात्मिकरित्या शुभ मानले जाते. पाडव्याच्या दिवशी सुरु केलेली कामे यशस्वी होतात असे मानले जाते.

असे मानले जाते की जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस युगादि पाडव्याचा होता आणि त्याच वेळी सत्ययुगाची सुरुवात झाली. त्यामुळे या पाडव्याला आध्यात्मिक महत्व आहे.

राम ज्या दिवशी आपला वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले त्यावेळी प्रजेने त्यांचे गुढ्या, तोरणे आणि ध्वज उभारून स्वागत केले तो दिवस युगादि पाडव्याचा होता असे मानले जाते.

गुढीपाडवा कसा साजरा करावा? 

या दिवशी उषःकाली लवकर उठून तुळशी वृंदावनापुढे दिवा लावून प्रार्थना करावी. अंघोळ करून देवळात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे. नंतर आपल्या घरातील आई-वडिलांना, पतिला, मोठ्यांना नमस्कार करून आशिर्वाद घ्यावा. घर फुलांनी-तोरणांनी शृंगारावे. दारापुढे सुबक रांगोळी काढावी. त्यावर हळद कुंकू वाहावे. (पांढरी रांगोळी नुसतिच सोडु नये.) नंतर सोवळ्याची अंघोळ करून पुरुषांनी देवाची विशेष पूजा पंचामृत अभिषेकासह करावी. शालीग्रामाची पुजा पुरुषांनीच करावयाची असते. स्त्रियांनी लक्ष्मीदेवीला हळदीकुंकू फुल वाहून नवरात्रीत नित्य ओटी भरावी. शक्य तेवढे पक्वान्न करून देवाला समर्पण करावे. नंतर घरातल्या मंडळींसह  भोजन करावे.

गुढीपाडवा 2025: सुंदर गुढीपुढे काढण्यासाठी पाहा रांगोळी डिझाइन, नववर्षाचे स्वागत करा रंगीबेरंगी...

स्वयंपाकात यादिवशी पुरणपोळ्या करण्याची पद्धत आहे. तसेच गुढीला प्रामुख्याने कडुलिंब+गुळ देवाच्या नैवेद्यासाठी जरुर ठेवावा. प्रसाद सर्वांनी नंतर आनंदाने स्विकारावा.

येणाऱ्या वर्षामधे आपल्याला येणारी सुखदुःखे आनंदाने अनुभवण्याची योग्यता कडुलिंब+गुळाच्या सेवनाने साध्य होते. हे बनवायची पद्धत- कडुलिंबाची फूलं, कडुलिंबाची पाला, मिरी, मीठ, हिंग, जिरे, ओवा, चिंच आणि गुळ सर्व मिसळून बारिक मिश्रण करावे. ते तोंडामध्ये टाकताना "शतायुर्वज देहाय सर्वसंपत्करायच सर्वारिष्टविनाशाय निंबकदळ भक्षणम्" असे म्हणावे. असे सेवन  केल्याने अंगातील रोगांचा नाश होतो असे मानतात. शिवाय गोड कडू (सुखदुःख) वर्षभर येतातच तेव्हा ते भोगता येणे हाच कडुलिंब गुळ सेवन करण्यामागचा उद्देश आहे.

सकाळी देवपूजेच्या नंतर नवीन  पंचांगाचे ही पूजन करावे. संपूर्ण वर्षामधे येणारी कार्ये, सणवार समजून घेण्यासाठी संध्याकाळी पंचाग श्रवण करावे. मुख्यत्वे पाऊस, पीक, पाणी, ग्रहण याविषयी माहिती समजते. 

गुढी कशी उभारावी

महाराष्ट्रात या सणासुदीला गुढीपाडवा असे म्हणतात. यास इंद्रध्वजारोहण असेही नावं आहे. सामान्यपणे माणसाच्या उंचीएवढी काठी घेऊन टोकावर तांब्या उपडा घालून त्यावर एक खण, फूलं, आंब्याची पाने, साखरेची माळ, कडुलिंबाचा पाला वगैरे घालून सजवून घराच्या पुढील भागी सर्वांना दिसेल असे उभे करुन पूजा करतात. देवाला विशेष अलंकार घालून दीपोत्सव करतात. सूर्योदयापूर्वी गुढी उभारून सूर्यास्ताच्या आत गुढी उतरवावी असा शास्त्रसंकेत आहे. 

युगादि चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून एक महिना देवाची नित्य पूजा करणाऱ्यांच्या घरी सोवळ्याने एक कळशी पाणी तसेच देवाच्या नैवेद्यासाठी एक वाटी साखर देऊन यावे. महिना झाल्यानंतर त्या ब्राह्मणांना जेवावयास बोलावून जेवण देऊन तांब्याची कळशी तसेच एक चांदीची वाटी दान करावी. यास उदक कुंभदान म्हणतात.
संप्रदायांप्रमाणे थोडा फरक असला तरी संपूर्ण देशात युगादि उत्साहाने साजरी केली जाते.

यादिवशी जेवणात साधारणपणे खालील पदार्थ बनवतात:

वरण भात, खीर पुरी श्रीखंड, बासुंदी, पुरणपोळी, चित्रान्न, चटणी, भाजी, कोशिंबीर, उसळ, ताक, दही इत्यादी. या नैवेद्याचे एक ताट देवाला आणि एक ताट गुढीला वाढले जाते. गुढीला दाखवलेल्या नैवेद्याच्या ताटाचे अन्न गरजूला दान दिले जाते. 

प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे.चैत्र महिन्यात काढले जाणारे चैत्रांगण ही एक विशेष रांगोळी आहे. देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशी जवळ रांगोळी काढली जाते. साधारणता रांगोळीमध्ये स्वस्तिक, गोपद्म, शंख, चक्र, गदा, कमळाचे फुल, बिल्वपत्र, लक्ष्मीची पाऊले, सुर्य देवेतेचे प्रतिक, श्री, कासव इ. मांगल्यसुचक व पवित्र रांगोळ्या काढल्या जातात.

असा हा सण सर्वांनी उत्साहाने, आनंदाने, जल्लोषाने साजरा करावा. 

Web Title: Gudi Padwa 2025: Why is Gudi Padwa called 'Yugadi'? Learn the scientific method of this festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.