Gudi Padwa 2025: गुढी पाडव्याला कडूलिंब आणि गुळाचा प्रसाद खाण्याचे आहेत अनेक फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 12:31 IST2025-03-29T12:31:05+5:302025-03-29T12:31:24+5:30
Gudi Padwa 2025: कितीही नावडत असला तरी नवंवर्षाच्या दिवशी गुढीचा कडू-गोड प्रसाद नक्की खा!

Gudi Padwa 2025: गुढी पाडव्याला कडूलिंब आणि गुळाचा प्रसाद खाण्याचे आहेत अनेक फायदे!
गुढी उभारून झाली, की प्रसाद म्हणून धने गूळ आणि कडुलिंबाचा पाला दिला जातो. धने गूळ खाऊन संपतीलही, परंतु कडुलिंबाचा पाला चघळताना तोंडाची पार दशा होते. तरीसुद्धा कडुलिंबाला गुढीच्या बरोबरीने मान दिला जातो. नववर्षाच्या गोड दिवशी अशी कडू सुरुवात करण्यामागे नक्की काय प्रथा असेल, हे जाणून घेऊया.
या सणात कडुलिंबाचे महत्त्व काही वेगळेच आहे. हा वृक्ष सदाहरित आणि सदापर्णी आहे. याची पाने, फुले, खोड हे सर्व घटक औषधाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. अनेक दुर्धर व्याधी नाहीशा करण्याचे गुण कडुलिंबात आहेत.
Gudhi padwa 2025: गुढीला बांधलेला कडूलिंबाचा पाला फेकू नका; त्याचा 'असा' करा वापर!
उन्हाळ्यात शरीरातली उष्णता वाढते. अनेक त्वचारोग डोके वर काढतात. यावर कडुलिंब उपयोगी आहे आणि म्हणूनच पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने टाकून तापवलेल्या पाण्याने स्नान करावे, असे आयुर्वेदात आवर्जून सांगितले आहे. कडुलिंब रक्तशुद्धी करतो आणि म्हणूनच कडुलिंबाची पाने, फुले, ओवा, मीठ, हिंग यांची एकत्र चटणी करून खावी किंवा कडुलिंबाची पाने, धने, गूळ यांची गोळी करून खावी असे सुश्रुताने 'चरकसंहितेत' सांगितले आहे. कडुलिंबाचे इतरही अनेक उपयोग आहेत.
गायीला याची पाने खाऊ घातली, तर तिला भरपूर दूध येते. या झाडाच्या सरपणावर शिजवलेले अन्न खाल्ले, तर सर्पविष बाधत नाही. बाळंतिणीने कडुलिंबाच्या पानांचा रस प्राशन केला, तर बाळंतरोग होत नाही. कडुलिंबाची पाने नियमितपणे खाऊन त्यावर दूध प्यायल्यास रक्तशुद्धी होते, कामवासना कमी होते. म्हणून तपश्चर्या करणारे ऋषी मुनी कडुलिंबाची पाने किंवा त्याचा रस तपश्चर्येच्या काळात नियमितपणे प्राशन करत असत.
हा बहुगुणी वृक्ष घराभोवती, मंदिराच्या आवारात, धर्मशाळेत, रस्त्याच्या कडेला लावावा, असे आमच्या शास्त्रकारांनी आवर्जून सांगितले आहे. या वृक्षाचे मनुष्याकडून संवर्धन व्हावे म्हणून याला ब्रह्मदेवाचे किंवा जगन्नाथाचे प्रतीक मानले जाते. काली आणि दुर्गा यांना कडुलिंबाचा वृक्ष अतिशय प्रिय आहे.
हा वृक्ष तोडणे म्हणजे मनुष्यहत्येचे पातक करण्याइतके अमंगल मानतात. संस्कृतात `परिभद्र' नावाने विख्यात असलेला हा बहुगुणी वृक्ष पिशाच्चबाधेपासून मुक्ती देतो, अशी खेड्यापाड्यात श्रद्धा आहे.
चवीने कडवट असला, तरी हा वृक्ष बहुगुणी आहे आणि म्हणूनच नववर्षाच्या स्वागताला आरोग्यदायी कडुलिंबाला पूर्वसुरींनी सहभागी करून आपली दूरदृष्टी दाखवली आहे.
Gudhi Padwa 2025: केवळ गुढीवरच नाही तर घराच्या प्रवेशद्वारावरही रेखाटा स्वस्तिक; वाचा फायदे!