२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 15:58 IST2025-08-17T15:55:10+5:302025-08-17T15:58:10+5:30
Last Fourth Shravan Somwar August 2025: २०२५ मधील शेवटचा श्रावणी सोमवार आहे. महादेव शिवशंकरांची अपार कृपा लाभावी, यासाठी काही मंत्रांचा जप अतिशय उपयुक्त ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.

२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
Last Fourth Shravan Somwar August 2025: ॐ मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे। अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नम: ॐ॥ श्रावण महिन्याची आता सांगता होत आहे. १८ ऑगस्ट २०२५ रोजी शेवटचा चौथा श्रावणी सोमवार आहे. संपूर्ण श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो. श्रावण महिन्यात शिवपूजन किंवा शिव उपासना करणे जमले नसल्यास श्रावणात शिवाची आराधना करून शिवकृपा प्राप्त करण्याची सुवर्ण संधी चुकवू नका, असे म्हटले जात आहे. या शेवटच्या चौथ्या श्रावणी सोमवारी दोन राजयोग जुळून येत आहेत. शिवपूजन कसे करावे? कोणती शिवामूठ वाहावी? जाणून घेऊया...
शिवशंकराची उपासना, आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याचे पाहायला मिळते. श्रीविष्णूंच्या अनुपस्थितीत जगाचा कार्यभार महादेवांकडे असतो, अशी मान्यता आहे. म्हणूनच महादेवांचे आवाहन करून त्यांची करुणा भाकण्यासाठी रुद्राभिषेक, पूजा-अर्चा केली जाते, असे सांगितले जाते. या चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूठ म्हणून जव वाहण्याची परंपरा आहे. सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. या चौथ्या श्रावणी सोमवारी गजकेसरी आणि गजलक्ष्मी असे दोन राजयोग जुळून येत आहेत.
केवळ एक बिल्वपत्र अर्पण करा, संपूर्ण पूजेचे पुण्य मिळवा
देशभरातील लाखो शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात. जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो. शक्य असल्यास निराहार उपवास करावा. आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. जर शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करावी. शिवाची प्रतिमा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर केवळ शिवशंकरांचा 'ॐ नमः शिवाय' हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो. शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहिले, तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
चौथ्या श्रावणी सोमवारी शिव पूजन करण्याची सोपी पद्धत
श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी सोडावा. मात्र, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर, 'ॐ नमः शिवायै' या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. या दिवशी एकभुक्त राहावे. षोडशोपचारी पूजन शक्य नसेल, तर पंचोपचार पूजा करावी. आपापले कुळधर्म, कुळाचार या प्रमाणे करावे.
चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूठ म्हणून जव अर्पण करावे
चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून जव वाहावे. लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात. श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहिली जाते. शिवामूठ वाहताना 'नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने। शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।' असा मंत्र म्हणावा. मंत्रोच्चार करणे शक्य नसल्यास, शिवा शिवा महादेवा... माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, अशी प्रार्थना करावी. शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो.
चौथ्या श्रावण सोमवारी म्हणा प्रभावी शिवमंत्र
चौथ्या श्रावण सोमवारी सकाळी किंवा तिन्हीसांजेला दिवेलागणीवेळी महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदायी ठरू शकते, असे म्हटले जाते. 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥