पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 09:59 IST2025-07-25T09:56:51+5:302025-07-25T09:59:27+5:30

First Shravan Shaniwar 2025 Vrat Puja Vidhi: श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन करण्याची प्रथा आहे. यंदा किती श्रावण शनिवार? व्रचाचरण कसे करावे? जाणून घ्या...

first shravan shaniwar 2025 know about date ashwattha maruti vrat puja vidhi vrat katha and significance of ashwattha maruti pujan in marathi | पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य

पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य

First Shravan Shaniwar 2025 Vrat Puja Vidhi: २५ जुलै २०२५ पासून चातुर्मासातील अनन्य साधारण महत्त्व असलेला श्रावण मास सुरू झाला आहे. श्रावण महिन्यात हजारो घरांमध्ये जिवतीचा कागद लावून श्रावणातील व्रतांचे आचरण केले जाते. श्रावणातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. शिवाच्या पूजनासाठी श्रावण सर्वोत्तम मानला गेला असला, तरी प्रत्येक दिवशी येणाऱ्या व्रताचे महात्म्य वेगळे आणि विशेष आहे. यंदा २०२५ मधील श्रावणात पाच शनिवार असून, पहिला श्रावणी शनिवार, २६ जुलै २०२५ रोजी आहे. या दिवशी अश्वत्थमारुती पूजन केले जाते. हे व्रत कसे करावे? व्रतकथा, व्रत महत्त्व आणि व्रताच्या काही मान्यता जाणून घेऊया...

श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे, असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसे नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजा काही ठिकाणी केल्या जातात. 

अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन?

शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतीरायाला तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते. षोडषोपचार पूजन करावे. हनुमंताला आवडणारा नैवेद्य दाखवावा. धूप, दीप अर्पण करून आरती करावी. प्रसाद ग्रहण करावा. पिंपळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करणे शक्य नसल्यास हनुमंतांचे घरच्या घरी पूजन, नामस्मरण करावे, असे म्हटले जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो, असा समज आहे. वेदकाळापूर्वीच्या सिंधुसंस्कृतीत अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते. तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला. पुढे ऋग्वेदकाळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वत्थापासून बनविली जाई. उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले.

श्रावण शनिवारची (मारुतीची) कहाणी

या पूजनाची एक कथा पद्यपुराणात आढळते. एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णूभक्त ब्राह्मणाची सत्त्वपरीक्षा घेण्याचे ठरविले. त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले. परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले. ते थंडीचे दिवस होते. थंडीपासून स्वत:चे रक्षण व्हावे, या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत असे. एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली. तत्क्षणी तिथे विष्णू प्रकटले. तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे, मलाच जखमा झाल्या आहेत, असे विष्णूंनी सांगितले.

अश्वत्थ वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात

विष्णूंचे कथन ऐकून धनंजय अतिशय दुःखी झाला. तत्क्षणी त्याच कुऱ्हाडीने स्वत:ची मान मोडून प्रायश्चित्त घेण्याचे धनंजयने ठरविले. त्याची भक्ती पाहून विष्णू प्रसन्न झाले. धनंजयांला रोज अश्वत्थाची पूजा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तिपूर्वक पूजा करू लागला. पुढे कुबेराने त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले. प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये वृक्षांमध्ये जो अश्वत्थ तो मी होय, असे म्हटले आहे. काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी महिला वटवृक्षाप्रमाणेच अश्वत्थ वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात. दुष्ट शक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो, असे सांगितले जाते.

यंदा २०२५ मध्ये ५ श्रावणी शनिवार

- पहिला श्रावणी शनिवार: २६ जुलै २०२५

- दुसरा श्रावणी शनिवार: ०२ ऑगस्ट २०२५

- तिसरा श्रावणी शनिवार: ०९ ऑगस्ट २०२५ (श्रावण पौर्णिमा रक्षाबंधन)

- चौथा श्रावणी शनिवार: १६ ऑगस्ट २०२५ (गोपाळकाला)

- पाचवा श्रावणी शनिवार: २३ ऑगस्ट २०२५ (श्रावण अमावास्या)

 

Web Title: first shravan shaniwar 2025 know about date ashwattha maruti vrat puja vidhi vrat katha and significance of ashwattha maruti pujan in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.