Falgun Maas Amalaki Ekadashi 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: मराठी वर्षातील शेवटचा फाल्गुन मास सुरू आहे. फाल्गुन मासात अनेक सण, व्रते साजरी केली जातात. फाल्गुन शुद्ध एकादशीला आमलकी एकादशीचे व्रत केले जाते. या एकादशीला रंगभरनी एकादशी, आवळा एकादशी अशी विविध नावांनी संबोधले जाते. याला कारणही तसेच विशेष आहे. एकादशी तिथी श्रीविष्णूंना समर्पित आहे. फाल्गुन आमलकी एकदाशीचा शुभ मुहूर्त, व्रत पूजनाचा सोपा विधी काही मान्यता अन् महात्म्य जाणून घेऊया...
प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. मराठी वर्षात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. शरद ऋतू संपून वसंत ऋतूचा आरंभ होळीपासून होतो. ऋतूचक्र आणि निसर्गचक्र या काळात बदलते. शांत वातावरणात दाहकतेकडे जाणार असते. या वातावरणीय बदलाची आपल्या शरीराला सवय व्हावी, यासाठी आपल्याकडील व्रत, परंपरा, पूजन महत्त्वाचे आहेत.
फाल्गुन आमलकी एकादशीचे महत्त्व
फाल्गुन मास हा वसंताचा आणि सोबतच उन्हाळ्याचा. चैत्रपालवी आलेली येते, सृष्टी आपले रूप पालटत असते. आमलकी एकादशी ही तिथी आवळा एकादशी म्हणूनही ओळखली जाते. आवळा हा विष्णू देवाला अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते. आवळा झाडाच्या पूजनामुळे गोदानाचे पुण्य मिळत, अशी मान्यता आहे. तसेच आवळ्याचे औषधी गुणधर्म आणि उपयोगिता अनन्य साधारण आहे. मधुमेह, हृदयाचे आजार, पचनक्रिया, वजन कमी करणे, हाडे मजबूत करणे, डोळ्यांसाठी गुणकारी, संसर्गापासून संरक्षण करणे, असे काही उपयोग आवळ्याचे सांगितले जातात. तसेच आवळ्याच्या वृक्षात भगवान विष्णूंचे वास्तव्य असते. या वृक्षाच्या प्रत्येक अंशात भगवंताचे वास्तव्य असते. या दिवशी आवळ्याचा वापर आणि आवळ्याच्या वृक्षाची यथासांग पूजा केली असता, भगवान विष्णू प्रसन्न होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
फाल्गुन शुद्ध आमलकी एकादशी: सोमवार, १० मार्च २०२५
फाल्गुन शुद्ध आमलकी एकादशी प्रारंभ: रविवार, सकाळी ०७ वाजून ४५ मिनिटे.
फाल्गुन शुद्ध आमलकी एकादशी समाप्ती: सोमवार, सकाळी ०७ वाजून ४४ मिनिटे.
भारतीय पंचांग पद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे फाल्गुन शुद्ध आमलकी एकादशीचे व्रतपूजन, सोमवार, १० मार्च २०२५ रोजी करावे, असे सांगितले जाते. पुराणांमध्ये या आमलकी एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीपूर्वी ही एकादशी येत असल्यामुळे याला रंगभरनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, आमलकी एकादशीचे व्रत करू शकत नाही, त्यांनी आवळ्याचे सेवन केले पाहिजे. तसेच या एकादशीला भगवान विष्णूचे पूजन केल्याने लाभ होतो, अशी मान्यता आहे.
आमलकी एकादशी व्रताचरणाची सोपी पद्धत
आमलकी एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा यानुसार पूजन करावे. षोडषोपचार पूजा शक्य नसेल, तर पंचोपचार पूजा करावी. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा पाळून एकादशी व्रताचरण करावे.
आमलकी एकादशी व्रताची सांगता
एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.
आवळ्याच्या झाडाचे पूजन
पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णूंनी आवळ्याच्या झाडाची निर्मिती केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन करण्यास सांगितले जाते. आवळ्याच्या झाडाजवळचा परिसर स्वच्छ करून घ्यावा. या झाडाखाली कलशाची स्थापना करावी. भगवान विष्णूचे नामस्मरण करून पूजन करावे. कलशाला धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. तसेच आवळ्याचे सेवन करावे.