'Every' moment 'should be a' festival '!' Sadguru's thoughts are conveyed, senior commentator Pralhad Wamanrao Pai! | 'प्रत्येक 'क्षण' हा 'सण' झाला पाहिजे!' सद्गुरुंचे विचार पोहोचवत आहेत, ज्येष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै!

'प्रत्येक 'क्षण' हा 'सण' झाला पाहिजे!' सद्गुरुंचे विचार पोहोचवत आहेत, ज्येष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै!

ठळक मुद्देआपल्या मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर त्याचे मोठे फायदे होतील.आजचे सगळे ताणतणाव हे स्वकेंद्री झाल्यामुळे आहेत, ते सर्वकेंद्री झाले, तर आपोआप दूर होतील.मनाला मोठे केल्याशिवाय तुम्ही मोठे होणार नाही, हा निसर्गाचा नियम आहे.

ज्योत्स्ना गाडगीळ 

'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार', असे सद्गुरु वामनराव पै यांनी सांगितले आहे. परंतु, कोरोना महामारीत कोणी आत्मविश्वास गमावला आहे, तर कोणी रोजगार! अशा वेळी, फिनिक्स पक्षासारखी पुन्हा कशी उभारी घेता येईल, याबाबत 'देव, भक्ती आणि मी' या युट्यूबवर आयोजित केलेल्या चर्चासत्रात  मार्गदर्शन केले, ज्येष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै यांनी! या चर्चासत्रात, अभिनेत्री अश्विनी कासार यांनी जनतेच्या मनातले प्रश्न मांडून समाधानकारक उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या चर्चेचा गोषवारा.

देव म्हणजे काय, मी म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय हे आधी समजून घेतले पाहिजे. देव ही केवळ मूर्ती नाही, तर ते चैतन्य शक्ती आहे. ती बाह्य जगतात आणि आपल्या आत वास करते. तोच ईश्वर आहे. मी म्हणजे व्यक्तिमत्त्व आहे, तर ईश्वर हे आत्मतत्त्व आहे आणि जो या ईश्वराशी विभक्त नाही, तो भक्त आहे.  या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी भक्ती हे माध्यम आहे. ती साधना आहे. भक्ती करता करता व्यक्तीमत्वाच्या माध्यमातून आत्मतत्वाशी एकरूप होणे, यालाच आध्यात्म म्हणतात आणि हा प्रवास करण्यासाठी जे करावे लागते, त्याला उपासना किंवा  भक्ती म्हणतात. 

हेही वाचा : खरा गुरु कसा ओळखावा- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

आपल्या शरीराशी, निसर्गाशी अनुरूप जीवन जगणे याला भक्ती म्हणतात. देव शरीररूपाने, मनाच्या रूपाने आपल्या आतच नांदत आहे. म्हणून आधी देहाची उपासना करा. शरीराची काळजी घ्या. व्यसने, दैनंदिन जीवनशैली यामुळे देहाची हेळसांड करता कामा नये. शरीराची उपासना ही ईश्वराची उपासना आह़े. 

दुसरे म्हणजे, मनाची उपासना केली पाहिजे. मनाची म्हणजेच विचारांची जोपासना. सतत चांगले विचार करणे, ही मनाची उपासना. आणि जे चैतन्य निसर्ग, पर्यावरण रूपाने आपल्या सभोवताली भरून राहिला आहे, त्याची जोपसना करणे, ही निसर्ग उपासना. यातच भगवंत सामावलेला आहे. यापलीकडे देव नाही. 

सद्गुरू सांगतात, आनंद वाटण्यासाठी आपला जन्म आहे. आनंद वाटता वाटता आनंद लुटायचा. आपल्याकडच्या आनंदाचा अनुभव घेणे म्हणजे अध्यात्म. दुसऱ्याबद्दल दोन शब्द चांगले बोलल्यावर, त्याला होणारा आनंद पाहून तुम्हालाही आनंद होईल. आनंद मिळवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत,  तो छोट्या गोष्टीतून आनंद मिळवता येतो. 

हेही वाचा : संन्याशाच्या झोळीत हात घाला, श्रीमंत व्हाल!

पैसा मिळवण्याची गोष्ट आहे, तर सुख, आनंद देण्याची गोष्ट आहे. जीवन आनंदात जगायचे आहे, हा विचार मनाशी पक्का करायचा. जे चांगले काम करत आहेत, त्यांचे कौतुक करा, आभार माना, अभिनंदन करा. या कृतीमुळे दुसऱ्याला समाधान मिळेल  आणि त्याचा आनंद तुमच्याकडेही परावर्तित होईल.

आनंद वाटण्यासाठी कोणत्या सणाची वाट का बघायची? दसऱ्याला आपण सोने वाटतो, म्हणजे सुख वाटतो. त्यासाठी आपट्याची पाने हवीत असे नाही, कारण आपल्याला निसर्ग संवर्धन करायचे आहे. तसेच, केवळ दसऱ्यालाच शुभेच्छा द्यायच्या असेही नाही. सद्गुरू वामनराव पै म्हणतात, `प्रत्येक क्षण हा सण झाला पाहिजे.' म्हणजेच प्रत्येक क्षणात सुखी, समाधानी, आनंदी राहिले पाहिजे. तो दुसऱ्यांसाठी वापरला पाहिजे. निसर्गाची जपणूक आपणच केली पाहिजे. 'क्षणाक्षणाला शुभचिंतन करणे, हे जीवनविद्येचे सार आहे.' म्हणून प्रार्थना आहे,

'हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे....'

आपल्या मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर त्याचे मोठे फायदे होतील. आजचे सगळे ताणतणाव हे स्वकेंद्री झाल्यामुळे आहेत, ते सर्वकेंद्री झाले, तर आपोआप दूर होतील. मनाला मोठे केल्याशिवाय तुम्ही मोठे होणार नाही, हा निसर्गाचा नियम आहे. मन जेवढे व्यापक होईल, तेवढे तुम्ही ईश्वराच्या जवळ जाता. सर्वांचा विचार करायचा म्हणजे, सर्वांना मदत करायला जाण्याची गरज नाही, परंतु त्यांचे चांगले व्हावे, हा सर्वव्यापी विचार आपल्याला सर्वांसाठी रोजच करता येईल. 

कोव्हिड काळात अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. परंतु, ही स्थिती काही कायमस्वरूपी राहणार नाही. परिस्थितीत बदल नक्कीच होतील. मात्र, पुन्हा एकदा जेव्हा हातात काम येईल, तेव्हा मात्र कर्तव्यात कुचराई करू नका. 

आपल्या कामाने केवळ आपला विकास, हे ध्येय न ठेवता राष्ट्रविकास हा उद्देश ठेवला पाहिजे. त्यामुळे आपणच इतरांची, निसर्गाची हानी कधीच करणार नाही. विशेषतः तरुणांनी चार गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत, 

>> कामात झोकून द्या - मनापासून, कर्तव्यभावनेने काम करायचं. त्यातून सर्वांना आनंद मिळाला पाहिजे, हा विचार असला पाहिजे. 
>> कौशल्य - कामाचा रतीब टाकू नका. मन लावून, जबाबदारीने काम करा. 
>> सहानुभूती - आपल्या बरोबर काम करणाऱ्यांबद्दल प्रेम आणि सहानुभूती असली पाहिजे. कृतज्ञ भाव असले पाहिजे.  
>> शुभचिंतन - माझे भले होत आहे, तसे इतरांचेही होवो, ही भावना असायला हवी. 

या चार गोष्टी केल्या, तर तुमची भरभराट नक्कीच होईल.  जगायचेच आहे, तर फक्त स्वत:साठी जगू नका, सर्वांसाठी जगा. सकाळी उठून सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करा आणि त्यांचे शुभचिंतन करा. या छोट्याशा कृतीने आयुष्यात फरक पडेल. 

 

Web Title: 'Every' moment 'should be a' festival '!' Sadguru's thoughts are conveyed, senior commentator Pralhad Wamanrao Pai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.