Dussehra 2021 :दसऱ्याला तुळशीच्या किंवा बेलाच्या पानांऐवजी आपट्याचीच पाने का देतात? जाणून घ्या कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 12:20 PM2021-10-14T12:20:40+5:302021-10-14T12:21:07+5:30

Vijayadashami 2021 : आपल्या संस्कृतीने त्याग, प्रेम, नम्रता हा संस्कार या कथेतून दिसता़े  आपणही हे वैचारिक सोने लुटण्याचा प्रयत्न करूया.

Dussehra 2021: Why Dussehra is given Aptachi leaves instead of Tulsi or Bella leaves? Find out because ... | Dussehra 2021 :दसऱ्याला तुळशीच्या किंवा बेलाच्या पानांऐवजी आपट्याचीच पाने का देतात? जाणून घ्या कारण... 

Dussehra 2021 :दसऱ्याला तुळशीच्या किंवा बेलाच्या पानांऐवजी आपट्याचीच पाने का देतात? जाणून घ्या कारण... 

Next

दरवर्षी दसऱ्याला आपण सोने म्हणून आपट्याची पाने एकमेकांना देतो, नव्हे तर त्याला सोने लुटणे असे म्हणतो. परंतु वर्षभरात याच आपट्याच्या पानांकडे आपले लक्षसुद्धा जात नाही. मग एरव्ही तुळशीची किंवा बेलाची, आंब्याची पाने पवित्र म्हणून पूजेत वापरली जात असताना दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपट्याची पानेच का देतात, यामागील पौराणिक कथा जाणून घ्या. 

पैठण शहरात देवदत्त नावाच्या एका गृहस्थास कौत्स नावाचा हुशार आणि सद्गुणी मुलगा होता. तो विद्यासंपादनासाठी वरतंतु ऋषींच्या घरी येऊन राहिला होता.  त्या काळात ऋषींच्या म्हणजे गुरुच्या घरी राहूनच विद्या संपादन करण्याचा परिपाठ होता. कौत्स जात्याच हुशार असल्यामुळे तो थोड्याच दिवसात सर्व शास्त्रांमध्ये प्रवीण झाला. गुरुंचा आश्रम सोडताना काय गुरुदक्षिणा द्यावी, या विचारात पडून त्याने शेवटी गुरुंनाच `मी काय गुरुदक्षिणा द्यावी?' असे विचारले. यावर गुरु म्हणाले, 'गुरुदक्षिणा मिळावी, म्हणून मी तुला विद्या शिकवली नाही. शिष्य विद्या उत्तम शिकला की गुरुला गुरुदक्षिणा मिळाली.' पण या उत्तराने कौत्साचे समाधान झाले नाही. तो पुन्हा पुन्हा काय गुरुदक्षिणा देऊ, विचारत राहिला. 

Dussehra 2021 : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जुळून येत आहेत आणखी तीन शुभ मुहूर्त, जाणून घ्या त्यांचे महत्त्व!

शेवटी वरतंतु म्हणाले, 'मी तुला चौदा विद्या शिकवल्या. प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे मला तू चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणून द़े पण त्या अनेकांकडून जमा केलेल्या नकोत. एकाच दात्याकडून आणलेल्या असल्या पाहिजेत.' 

गुरुजींची ही अट पाळणे कौत्सास थोडे कठीण गेले. त्यावेळी सिंहासनावर असलेला रघुराजा म्हणजे प्रभू रामचंद्रांचा पूर्वज, हा उदार आणि विद्वानांची कदर करणारा आहे, हे कौत्साला माहित होते. तो मोठ्या आशेने रघुराजाकडे गेला. त्याने आपली मागणी रघुराजासमोर मांडली. पण त्यावेळी रघुराजाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्याने यज्ञयागात आपली सर्व संपत्ती दान केली होती. राजापासून आपणास काही अर्थलाभ होण्याची शक्यता नाही, हे ध्यानी येताच कौत्स परत जाऊ लागला. 

आपल्या दारी आलेला याचक रिक्तहस्ताने परत जाऊ नये, म्हणून रघुराजाने प्रत्यक्ष इंद्रावर चढाई करून त्याच्याकडून सुवर्णमुद्रा आणाव्यात, अशा निश्चय केला. हे इंद्राला समजताच, इंद्राने अयोध्यानगरीच्या बाहेर असलेल्या आपट्याच्या आणि शमीच्या झाडावर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवला. त्या सर्व सुवर्णमुद्रा घेऊन रघुराजाने कौत्साला दिल्या. कौत्साने त्या मुद्रा आपल्या गुरुंसमोर ठेवून स्वीकारण्याची विनंती केली. गुरुंनी फक्त चौदा कोटी मुद्रा घेतल्या आणि बाकीच्या कौत्सास परत दिल्या. परत मिळालेल्या सुवर्णमुद्रा या आपल्या नव्हेत, म्हणून कौत्साने रघुराजाकडे त्या परत आणल्या. पण रघुराजा म्हणाला, `या माझ्याही नव्हेत, आता त्या तुझ्याच आहेत. मी त्या घेणार नाही.' कौत्साला ते पटले नाही. त्याने ज्या आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली या सुवर्णमुद्रा पूर्वी मिळाल्या होत्या, तिथे त्या नेऊन ठेवल्या आणि लोकांना त्या लुटून न्या असे सांगितले. तो दिवस होता...विजयादशमीचा!

Navratri 2021 : महानवमीच्या दिवशी नवरात्रीत बसवलेल्या घटाचे दिलेल्या विधिवत पद्धतीने करा उत्थापन!

आपल्या पुराणात विजयादशमीसंबंधीच्या विविध स्वरूपाच्या कथा आहेत. ही वरतंतु आणि कौत्स या गुरु-शिष्यांची गोष्ट आपणास काय सांगते? यामध्ये गुरुची ऋण फेडण्याची शिष्याची तळमळ दिसते. आपण शिकवलेल्या ज्ञानाची पैशाच्या हिशोबात किंमत होऊ शकत नाही, हा गुरुंचा तेजस्वी विचार दिसतो. विद्वान पंडितांची चिंता दूर करण्यासाठी राजाची कळकळ दिसते आणि जे आपले नाही, त्याचा स्वीकार करण्यासा राजा रघु, गुरु वरतंतु, शिष्य कौत्स यापैकी कोणीही तयार होत नाहीत, यामागची त्यांची निरिच्छा दिसते. आपल्या संस्कृतीने त्याग, प्रेम, नम्रता हा संस्कार या कथेतून दिसता़े  आपणही हे वैचारिक सोने लुटण्याचा प्रयत्न करूया. दसऱ्याच्या शुभेच्छा!

Web Title: Dussehra 2021: Why Dussehra is given Aptachi leaves instead of Tulsi or Bella leaves? Find out because ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.