स्वप्नांना सांगू नका अडचणी मोठ्या आहेत, अडचणींना सांगा स्वप्नं मोठी आहेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 03:01 PM2021-10-18T15:01:17+5:302021-10-18T15:01:47+5:30

मेहनती लोक अपयशाची कारणे न देता, अपयशाची कारणे शोधतात, त्यावर काम करतात आणि यशाचा मार्ग मोकळा करतात. अशा लोकांची राष्ट्रविकासासाठी गरज असते.

Don't tell dreams that problems are big, tell problems Dreams are big! | स्वप्नांना सांगू नका अडचणी मोठ्या आहेत, अडचणींना सांगा स्वप्नं मोठी आहेत!

स्वप्नांना सांगू नका अडचणी मोठ्या आहेत, अडचणींना सांगा स्वप्नं मोठी आहेत!

Next

'कारणे द्या' या प्रश्नाचे शालेय वयात उत्तर दिले, की गपकन ५-६ गुणांची कमाई होत असे. तेव्हापासून, कठीण प्रश्न सोडून देत, सोप्या प्रश्नांसाठी कारणे देत राहण्याची मनुष्याला नकळत सवयच लागली. प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा आपल्या एका भाषणात म्हणाले होते, `लोखंडाला कोणीही तोडू शकत नाही, मात्र त्याला गंज लागला, तर तो निकामी होतो. म्हणून अपयश आले, तर वाईट वाटून हार पत्करण्यापेक्षा अपयशाची कारणे शोधा, त्यावर मात करा आणि भविष्याकडे यशस्वी वाटचाल करा.'

आपल्या सभोवती असे अनेक लोक असतात, ज्यांना स्वत:च्या प्रश्नांची उत्तरे माहित असतात, परंतु ती त्यांना शोधायची नसतात. ते आळस करतात आणि नशीबाला दोष देत राहतात. दुसऱ्यांचे सगळे कसे चांगले, आपले कसे वाईट, हा विचार करण्यात आयुष्यातला बराच वेळ वाया घालवतात. लोकांमुळे आपली प्रगती कशी अडली, आपले नुकसान कसे झाले, आपण अपयशी कसे झालो, याबाबत लोकांना दोष देत राहतात. अशा लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण स्वत:च्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही! 

याउलट मेहनती लोक अपयशाची कारणे न देता, अपयशाची कारणे शोधतात, त्यावर काम करतात आणि यशाचा मार्ग मोकळा करतात. अशा लोकांची राष्ट्रविकासासाठी गरज असते. हाच धागा धरून संत तुकाराम महाराज म्हणतात, 

ढालतलवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजा कैसा झुंजो।
पोटी पडदाळे सिले टोप ओझे, हें तो झाले दुजे मरणमूळ।
बैसविले मला येणे अश्वावरी, धावू पळू तरी कैसा आता।
असोनि उपाय म्हणे हे अपाय, म्हणे हाय हाय काय करू।
तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, मूर्ख नेणे वर्म संतचरण।।

ज्याला कर्तव्य करायचेच नसते, तो काहीही कारणे पुढे करून कर्तव्य करायचे टाळतो. या टाळाटाळीची काही उदाहरणे महाराजांनी येथे दिली आहेत. एक रडतराव युद्धाचा प्रसंग आल्यावर काय म्हणतो पहा, त्याला लढण्यासाठी ढाल-तलवार दिली, घोड्यावर बसवले, डोक्याला टोप, अंगात चिलखत वगैरे संरक्षणात्मक पोशाख दिला, युद्धासाठी या सर्वांची मदत झाली असती, पण या शिपाई काय म्हणतो,  अहो, माझे हात ढालीने, तलवारीने गुंतून पडले आहेत. मी लढाई कशी करणार? या चिलखताची, या टोपाची केवढी अडचण झाली आहे? मला यानेच मरण येईल, मला याचेच ओझे झाले आहे. मला घोड्यावर बसविले आहे, माझ्यावर शत्रू धावून आले, तर मी पळून कसा जाऊ? म्हणजे लढायची गोष्ट दूरच! पळायचे कसे याचीच चिंता! 

हे उदाहरण देऊन तुकाराम महाराज म्हणतात, ज्या गोष्टी परमेश्वर प्राप्तीला साधन रूप आहेत, त्याच अडचणीच्या आहेत, असे मानणारे लोक या जगात पुष्कळ आहेत. तोंडाने नाम घेणे त्यांना अडचणीचे वाटते. हातांनी टाळ वाजविणे अडचणीचे वाटते. आपला देह हाच परमार्थाला सहाय्यभूत आहे, पण ते त्यांना कळत नाही. अशा लोकांना काय म्हणावे? स्वत:ला हे हीनदीन समजतात. खरोखर सर्वतोपरी हे ब्रह्मरूपच आहेत, पण त्यांना हे कळत नाही. 

प्रपंच आणि परमार्थ यांचा ताळमेळ साधा आणि आयुष्याला सुंदर वळण देऊन ते सत्कारणी लावा!

Web Title: Don't tell dreams that problems are big, tell problems Dreams are big!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.