पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने आपण पापमुक्त होतो का? कृष्णाने युधिष्ठिराला दिलेले उत्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 03:03 PM2024-04-05T15:03:47+5:302024-04-05T15:04:25+5:30

Papmochani Ekadashi 2024: आज पापमोचनी एकादशी, आज ज्यांनी उपास केला नाही, त्यांनी निदान विष्णूंची उपासना करून व्रतपूर्ती करावी आणि या व्रताचे महत्त्व वाचावे. 

Does fasting on Sin Mochani Ekadashi really free us from sin? Read Krishna's reply to Yudhishthira! | पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने आपण पापमुक्त होतो का? कृष्णाने युधिष्ठिराला दिलेले उत्तर वाचा!

पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने आपण पापमुक्त होतो का? कृष्णाने युधिष्ठिराला दिलेले उत्तर वाचा!

पापमोचनी एकादशीचे माहात्म्य आपल्याला ऐकायला मिळते ते थेट श्रीकृष्णाच्या मुखातून! युधिष्ठीराचा आणि श्रीकृष्णाचा संवाद जाणून घेणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. सदर कथा वाचून आणि 'ओम नमो भगवते वासुदेवाय' हा जप १०८ वेळा वाचून आपणही पापमुक्त व्हा आणि या दिवसाचे महत्त्व श्रीकृष्णाकडून जाणून घ्या!

युधिष्ठिराने विचारले, ‘हे कृष्णा, फाल्गुन वद्य पक्षातील एकादशीचे नाव काय, पूजाविधी कोणता व त्यापासून काय फळ मिळते ? कृपा करुन मला सर्व सांग.’
श्रीकृष्ण म्हणाले, ‘मी तुला पापमोचनी एकादशीचे व्रत सांगतो ते ऐक. हे व्रत पूर्वी चक्रवर्ती मांधाता राजाला त्याने विचारल्यावरुन लोमश ऋषींनी सांगितले होते.
मांधात्याने विचारले, ‘हे भगवन्, फाल्गुन वद्य एकादशीचे नाव काय, पूजाविधी कसा आहे व त्याचे फल काय ? लोकांच्या कल्याणाकरिता विचारत आहे, कृपा करुन सांग.’
लोमश ऋषी म्हणाले, ‘या एकादशीचे नाव पापमोचनी आहे. ही एकादशी पिशाचत्वाचा नाश करणारी म्हणून प्रसिध्द आहे. राजा, त्या एकादशीची कथा सांगतो ती ऐक. ही कथा सर्व इच्छा पूर्ण करणारी, सर्व सिध्दी देणारी, कल्याण करणारी, धर्म वाढवणारी, पापनाश करणारी, व आश्चर्यकारक आहे. 

पूर्वी एकदा कुबेराच्या चैत्ररथ नावाच्या क्रीडा-उद्यानात किन्नरांसह गंधर्वकन्या क्रीडा करीत होत्या. इंद्राच्या पुढाकाराने स्वर्गातील सर्व देवही तेथे क्रीडा करीत होते. अप्सरांचे समुदाय त्या क्रीडावनात नेहमीच असत. वसंतऋतू जवळ आल्याने ते वन फुलांनी भरुन गेले होते. या चैत्ररथ वनाइतके सुंदर दुसरे कोणतेच वन नाही. तेथे पुष्कळ मुनी तपश्चर्या करीत होते. तेथे इंद्र देवांसह क्रीडा करीत होता. त्या वनातच मेधावी नावाचा श्रेष्ठ मुनी होता. मंजुघोषा नावाची अप्सरा या मुनी मेधावीला मोहीत करण्याचा प्रयत्न करु लागली. त्याचे मन जाणून घ्यायला ती त्याच्या आश्रमाकडे गेली, पण शापाच्या भीतीने आश्रमापासून एक कोस अंतरावर थांबली. तेथे थांबूनच ती सतारीच्या साथीने पंचमस्वर आळवून मधुर गीत गाऊ लागली. मंजुघोषेने चंदनाची उटी लावली होती, फुलांचे हार घातले होते व ती गात होती. तिला पाहून पूर्वीचे शंकराबरोबरच्या वैराचे स्मरण करुन मदन तिच्या शरीरात शिरला. मदनाच्या मनात त्या शिवभक्त मुनीला जिंकण्याची इच्छा होती. त्या मदनाने जणू मंजुघोषेच्या भिवयांचे धनुष्य सज्ज केले. तिला आकृष्ट केले. 

मेधावी मुनीला पाहून मंजुघोषा कामपीडित झाली. मेधावी ऋषी अगदी तरुण होता. त्याचे पांढरेशुभ्र यज्ञोपवीत व हातातील दंड यामुळे तो दुसर्‍या मदनाप्रमाणे शोभत होता. अशा त्या मुनीश्रेष्ठाला पाहून मदनाला वश झालेली ती मंजुघोषा मंदमधुर स्वरात गाऊ लागली; नृत्य करु लागली. त्यामुळे तिच्या हातातील कंकणांचा मधुर ध्वनी होऊ लागला. त्यातच पायांतील पैजणांचा व कमरेवरील मेखलांचा सुंदर आवाज मिसळ्त होता. प्रेमभाव व्यक्त करीत ती गात होती. तिला पाहून तो श्रेष्ठ मुनी तिच्या मदनाने मोहीत झाला. मदनाच्या तडाख्यात सापडलेल्या त्या मुनीजवळ मंजुघोषा गेली आणि तिने आपल्या नेत्रकटाक्षांनी आणि हावभावांनी त्याला मोहून टाकले. तिने आपली वीणा खाली ठेवली आणि त्या श्रेष्ठ मुनीला आलिंगन दिले. वार्‍याच्या वेगाने व्याकुळ होऊन कापणारी वेल ज्याप्रमाणे वृक्षाला वेढून बसते, त्याप्रमाणे त्या ऋषीला मंजुघोषेने दृढ आलिंगन दिले. तो मेधावी मुनीसुध्दा मंजुघोषेबरोबर क्रीडा करु लागला. त्या सुंदर वन-उद्यानात तिचा सुंदर देह पाहून तो ऋषी शिवतत्त्व विसरला आणि कामतत्त्वाच्या आहारी गेला. मंजुघोषेबरोबर क्रीडा करताना त्या कामुकाला आता रात्र आहे की दिवस हेही समजेनासे झाले. अशाप्रकारे त्या उभयतांचा बराच काळ गेला. या काळात त्या मुनीने स्नान-संध्या वगैरे नित्य कर्मेही केली नाहीत. नंतर मंजुघोषा स्वर्गलोकाला जायची तयारी करु लागली.

ती जाण्याच्या इच्छेने आपल्याबरोबर क्रीडा करणार्‍या त्या श्रेष्ठ मुनीला म्हणाली, ‘हे ब्राह्मणा, आता मला माझ्या घरी परतण्याची आज्ञा द्यावी.’
मुनी मेधावी म्हणाला,‘हे सुंदर स्त्रिये, आता संध्याकाळीच तू माझ्याकडे आलीस, आता प्रभातकाळ होईपर्यंत तरी मजजवळ राहा.’ मुनीचे हे बोलणे ऐकून ती घाबरली. ‘हे राजा, मुनी शाप देईल या भीतीने ती त्याच्याबरोबर पुन: क्रीडा करीत राहिली. बराच काळ गेल्यावर ती मुनीला पुन: म्हणाली, ‘आता मला घरी गेले पाहिजे. तरी अनुज्ञा द्यावी.’

मेधावी मुनी म्हणाला, ‘आता कुठे प्रात:काल व्हायला सुरुवात झाली आहे. माझे ऐक. माझी स्नान-संध्या होईपर्यंत तरी येथेच राहा.’ मुनीचे हे बोलणे ऐकून तिला आश्चर्य वाटले व भीतीने तिला वेढले. किंचित स्मितहास्य करुन मंजुघोषा त्याला म्हणाली, ‘हे श्रेष्ठ विप्रा, तू माझ्यावर कृपा केलीस, तेव्हापासून काळ लोटला, याचा जरा विचार कर.’

तिचे हे बोलणे ऐकून तो श्रेष्ठ मुनी चकित होऊन विस्फारलेल्या नेत्रांनी मनात कालगणना करु लागला. त्याने ध्यान केले तेव्हा त्याला समजले की आपला बराचसा काळ हिच्याबरोबर क्रीडा करण्यात गेली. तो फार संतापला. त्याच्या डोळ्यांतून जणू ठिणग्या पडू लागल्या. आपल्या तपाचा नाश हिनेच केला असे त्याला वाटले. ती त्याला काळरुपी भासू लागली. आपण कष्टाने मिळवलेले तप हिनेच नष्ट केले, अशा विचाराने त्याला राग आला आणि त्याचे ओठ थरथर कापू लागले, इंद्रिये व्याकुळ झाली. तो मंजुघोषेला म्हणाला, ‘हे पापिणी, दुराचारिणी, कुलटे, तुला पापच प्रिय आहे !’ असे म्हणून त्याने तिला शाप दिला. ‘तू पिशाच्ची हो’ त्याच्या शापामुळे निस्तेज झालेली मंजुघोषा विनयाने नम्र होऊन उभी राहिली.
मुनीच्या कृपाप्रसादाची इच्छा करुन ती सुनयना मुनीला म्हणाली, ‘हे श्रेष्ठ मुने, माझ्यावर कृपा कर आणि या शापातून माझी मुक्तता कर. सज्जनांच्या सात पावले चालले तरी मैत्री जडते, मग हे ऋषिश्रेष्ठा, तुझ्यासंगतीत तर बराच काळ गेला आहे. स्वामी, या कारणासाठी तरी माझ्यावर कृपा-प्रसाद करा.’

मुनी म्हणाला, ‘हे कल्याणी, शापातून सुटका होण्यासाठी मी काय सांगतो ते ऐक. आता पापमोचनी नावाची सर्व पापांचा क्षय करणारी एकादशी येईल. हे सुंदरी, तू त्या कल्याणकारी एकादशीचे व्रत कर. म्हणजे तुझे पिशाच्चत्व नाहीस होईल.’ तिला असे सांगून तो मेधावी ऋषी आपल्या पित्याच्या आश्रमाकडे परत आला.
तो आलेला पाहून च्यवन ऋषी त्याला म्हणाले, ‘बाळा, तू हे काय केलेस ? तुझे सर्व पुण्य नष्ट होऊन गेले ना ?
मेधावी म्हणाला, ‘बाबा, मी अप्सरेसह रमलो, हे मी मोठेच पाप केले. या पापाचा क्षय कोणते प्रायश्चित्त केल्याने होईल, ते मला सांगा.’

च्यवन ऋषी म्हणाला, ‘पापमोचनी नावाची एकादशी आहे. तिचे व्रत केल्यास पापांच्या राशीही नष्ट होतात.’ पित्याचे हे बोलणे ऐकून मेधावीने पापमोचनी एकादशीचे व्रत केले, त्यामुळे त्याचे पाप नष्ट झाले आणि तो पुण्यवान झाला. अप्सरा मंजुघोषेनेही पापमोचनी एकादशीचे व्रत केले. त्यामुळे तिची पिशाच्चयोनीतून मुक्तता झाली. आणि पुन: ती तिच्या रुपाची अप्सरा होऊन स्वर्गात गेली.

लोमश ऋषी म्हणाले, ‘राजा, पापमोचनी एकादशीचे व्रत इतके  प्रभावशाली आहे. जे मानव हे व्रत करतील, त्यांचे जे काही पाप असेल, ते सर्व नष्ट होईल. जो हे माहात्म्य वाचेल किंवा ऐकेल त्यालाही हजार गाई दान केल्याचे पुण्य मिळेल. आजवर कळत नकळत झालेले अपराध माफ होतील, म्हणून हे व्रत सर्वांनी केले पाहिजे.  अगदीच शक्य नसेल तर निदान विष्णू नाम घेऊन पुनीत व्हावे!

॥ श्रीकृष्णार्प]]णमस्तु ॥

Web Title: Does fasting on Sin Mochani Ekadashi really free us from sin? Read Krishna's reply to Yudhishthira!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.