स्वामी समर्थांची नियमित सेवा करता? ‘या’ ३ गोष्टी लक्षात ठेवा, स्वामी पूजेचे शुभफल मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 11:48 AM2024-07-10T11:48:31+5:302024-07-10T11:51:58+5:30

Shree Swami Samarth Maharaj Seva: स्वामी सेवा करताना नेमक्या कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात? जाणून घ्या...

do you regularly done shree swami samarth maharaj seva then must remember these 3 things and get blessings of swami maharaj | स्वामी समर्थांची नियमित सेवा करता? ‘या’ ३ गोष्टी लक्षात ठेवा, स्वामी पूजेचे शुभफल मिळेल!

स्वामी समर्थांची नियमित सेवा करता? ‘या’ ३ गोष्टी लक्षात ठेवा, स्वामी पूजेचे शुभफल मिळेल!

Shree Swami Samarth Maharaj Seva: श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो. अशक्यही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे. स्वामींवरील श्रद्धा, स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यांमुळे कोट्यवधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा, उपासना, नामस्मरण, पूजन करत असतात. अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत. परंतु, स्वामींची नियमित सेवा करत असाल, तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभफल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

अनेकदा आपण नियमित सेवा, उपासना, नामस्मरण करत असलो, तरी त्याचे फल मिळते की नाही, याबाबत मनात शंका निर्माण होते. गोष्टी सकारात्मक घडत नाही, असे वाटू लागते. अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की, नकारात्मकता निर्माण होऊ लागते. मात्र, असे घडत असेल, तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा, असा सल्ला दिला जातो. आपण जे करतो, ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे, असे सांगितले जाते. तसेच आपल्याकडून काही चूक होत नाही, याबाबत चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी, असे म्हटले जाते. 

नेमके काय करावे?

- स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरु ठेवावी. स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी. धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल, तर तिन्ही सांजेला, दिवेलागणीची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी. 

- एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकवू नये. त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा. देवासमोर दिवा लावावा. स्वामींना दिवा अर्पण करावा. त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी. शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे. अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी चालू शकेल.

- यानंतर स्वामींची मानसपूजा करावी. तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे. याचे २१ अध्याय आहेत. दररोज ३ अध्यायाचे पठण केले, तरी सात दिवसांत एक पारायण पूर्ण होऊ शकेल. पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी. 

- यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा. तसेच किमान एक माळ ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचा जप करावा. एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम. परंतु, यथाशक्ती जप, नामस्मरण करावे. शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी. 

- शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी. खंड पडू नये. काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमायाचना करावी. तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरु करावी. 

- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा. ही सेवा करताना निःशंक मनाने करावी. कोणताही किंतु मनात ठेवू नये.
 

Web Title: do you regularly done shree swami samarth maharaj seva then must remember these 3 things and get blessings of swami maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.