वाढदिवसाच्या दिवशी आपण जीवेत 'शरद:' शतम् असे का म्हणतो माहितीय? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 16:51 IST2022-12-12T16:49:58+5:302022-12-12T16:51:47+5:30
ज्येष्ठ व्यक्तींना शुभेच्छा देताना आपण 'जीवेत शरद: शतम्' म्हणतो, त्यात 'शरद' कोणाला उद्देशून म्हटले जाते, याचे अथर्व वेदात वर्णन केले आहे.

वाढदिवसाच्या दिवशी आपण जीवेत 'शरद:' शतम् असे का म्हणतो माहितीय? जाणून घ्या!
शरद हा शब्द साधारणपणे सहा ऋतूंपैकी एक ऋतू आहे. वर्षा ऋतू संपल्यावर होणारी शरदाची सुरुवात अतिशय आल्हाददायक असते. धरित्री सुजलाम सुफलाम झालेली असते. म्हणून चांदणे पहावे तर तेही शरदातले असे म्हटले जाते. असा हा ऋतुराज सर्वांना हवाहवासा वाटतो. म्हणून अभिष्टचिंतन करताना संबंधित व्यक्तीच्या आयुष्यात शंभर वर्षे शरद फुललेला राहो असे म्हटले जाते.
वरील मंत्रांवरून असे दिसून येते की, वैदिक काळात शंभर वर्षे वय हे उत्तम आयुरारोग्यासाठी प्रमाण मानले जात होते. म्हणूनच वयाची शंभरी गाठावी अशी सदिच्छा दिली जाते. तीही परिपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्याची. शंभर वर्षांचे आयुष्य परिपूर्ण आरोग्याने मिळावे आणि शक्य असल्यास त्यापलीकडे सक्रिय आणि क्रियाशील इंद्रियांनी जगावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
प्रत्येकाला शंभर वर्षांचे आयुष्य मिळेल असे नाही. म्हणूनच शंभर वर्षांचे वय प्रमाण मानून वैदिक विचारवंतांनी शंभरीचा टप्पा गृहीत धरून त्याचे चार समान आश्रमांमध्ये (ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास) विभाजन केले असावे. पौराणिक कथांमध्ये शेकडो, हजारो वर्षे मनुष्य जगल्याचा उल्लेख आढळतो. आणि तसे असूही शकते. कारण आपल्यासमोरच शंभरी गाठलेली उदाहरणं सापडतील. मात्र ढासळत्या जीवनशैलीमुळे, निकृष्ट आहारामुळे, तणावग्रस्त जीवनामुळे आयुर्मान घटत चालले आहे. तरीसुद्धा आपण आपल्या आप्तजनांनी दीर्घायुषी व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि हॅप्पी बड्डे म्हणून न थांबता आपल्या संस्कृतीने दिलेले आशीर्वचन अर्थात 'जीवेत शरद: शतम' या शुभेच्छा देतो!