समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!

By देवेश फडके | Updated: September 24, 2025 16:50 IST2025-09-24T16:45:17+5:302025-09-24T16:50:29+5:30

Shree Swami Samarth 9 Guruvar Vrat: स्वामींच्या उपासनांपैकी अत्यंत प्रभावी ९ गुरुवारचे व्रत सांगितले गेले आहे. जाणून घ्या...

do shree swami samarth 9 guruvar vrat problems will end swami to be always with you changes definitely seen and impossible become possible know rules | समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!

समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!

Shree Swami Samarth 9 Guruvar Vrat: आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. अनेकदा समस्या, अडचणी, संकटे काही केल्या पाठ सोडत नाहीत. एक संपली की दुसरी समोर उभी असते. अशा वेळेस किंवा स्वामींची कायम कृपा पाठीशी राहावी, यासाठी स्वामींचे ९ गुरुवाचे व्रत सांगितले आहे. 

अक्कलकोट तर स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते. लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. परंतु, रोजच्या धकाधकीच्या जीवनात बरे वाईट अनुभव येत असतात. मात्र, काही वेळेस अशा काही घटना घडतात, तेव्हा मन उद्विग्न होते. बेचैन व्हायला होते. अनेक दिवस अशाच अशांत मानसिकतेत जात असतात. आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो, चाचपडत असतो. परंतु, केवळ अंधारच डोळ्यासमोर दिसत असतो. सगळे दिवस सारखे नसतात, सुख दुःखाचा ससेमिरा सुरूच राहतो. चांगले दिवस दाखवण्याआधी स्वामी परीक्षा घेतात. 

आयुष्यातील बहुतांश क्षेत्रात यश मिळावे, प्रगती व्हावी, मनातील इच्छा, आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, सुख असावे, कल्याण व्हावे, कुटुंब, मुलांची प्रगती व्हावी, यासाठी माणून आयुष्यभर झटत असतो. प्रयत्न करत असतो. मेहनत घेत असतो. परंतु, अनेकदा समस्या, अडचणी, संकटे एकामागून एक येतच राहतात. प्रारब्धातील भोगाच्या चक्रातून मार्गक्रमण करताना जीव मेटाकुटीला येतो. प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही अडीअडचणी थांबत नाहीत. स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात. भक्तांच्या हाकेला धावून जातात. अडचणींतून सोडवतात. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, या आश्वासनाची प्रचिती देतात. स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. 

९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील

श्री स्वामी समर्थांचे भक्त ९ गुरुवारचे व्रत सांगितले गेले आहे. हे व्रत अतिशय शुभ लाभदायी, पुण्य फलदायी आहे. कोणत्याही गुरुवारपासून हे व्रत करता येऊ शकते. व्रत करताना सकाळी नित्यकर्मे आटोपल्यानंतर एका चौरंगावर घरातील स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवावी. सोबत स्वामींच्या पादुका असतील, तरी त्याही ठेवाव्यात. व्रताचा संकल्प करावा. ज्यासाठी व्रत केले जाणार आहे, ती इच्छा बोलून दाखवावी. स्वामींची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. अभिषेक करावा. स्वामींची आवडती फूले, आवडीचे पदार्थ यांचा नैवेद्य दाखवावा. आरती करून घ्यावी. स्वामींच्या या व्रताची कथा वाचावी. सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. स्वामींना मनोभावे नमस्कार करावा. या व्रताची माहिती असणारी पोथी उपलब्ध असून, त्यात दिलेल्या पद्धतीप्रमाणे ९ गुरुवार स्वामी व्रत करावे. गुरुवार असल्यामुळे पिवळी फूले, पिवळ्या रंगाची मिठाई आवर्जून अर्पण करावी.

श्री स्वामी समर्थ ९ गुरुवार व्रत महती, फलश्रुती

श्री स्वामी समर्थांचे भक्त ९ गुरुवारचे व्रत करत असतात. स्वामींचे हे नऊ गुरुवारचे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी, यासाठी भाविक गुरुवारचे हे व्रत आचरले जाते, असे म्हटले जाते. या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करता येते. नवव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करुन व्रताला आरंभ करावा. पहिल्या गुरुवारी व्रत संकल्प करावा.

श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवार व्रत नियम

- हे व्रत कोणालाही करता येते. मुला-मुलींनाही करता येते. सपत्निक केल्यास अधिक उत्तम, असे मानले जाते.

- व्रत संकल्प केल्यानंतर प्रत्येक ९ गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत व्हावे. दिवसभर उपवास करावा. संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा.

- घरात मासिक धर्म, सोयर वा सुतक आल्यास व्रताचरण करु नये. उपवास मात्र करावा. जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून ९ गुरुवारची संख्या पूर्ण करावी. त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे.

- काही महत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये. दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करावा. मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे. 

- व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्री, अमावस्या आल्यास फक्त उपवास करावा. तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार एक गुरुवार अधिक करून त्यानंर उद्यापन करावे.

- व्रत करताना शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरिता बोलवावे. 

- रात्री भजन, गायन, किर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे. 

- व्रताचे दिवशी तसेच उद्यापनाचे दिवशी दर्शनार्थ येणार्‍या प्रत्येकाला स्वामी ९ गुरुवार व्रत पोथीची एक-एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी.

- स्वामी ९ गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दहीभात ठेवावा. मुंग्यांना चिमूठभर साखर ठेवावी. गाईला चारा घालावा. श्वानाला पोळी द्यावी. गरीबाला शिजलेले अन्न द्यावे. 

- स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. 

- स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. 

॥ श्री स्वामी समर्थ ॥

॥ श्री स्वामी समर्थ ॥

॥ श्री स्वामी समर्थ ॥

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

English summary :
Devotees believe Shree Swami Samarth's nine Thursday Vrat fulfills desires and removes obstacles. Performing this vrat with faith, following prescribed rituals, brings blessings and positive life changes. This vrat can be started any Thursday.

Web Title: do shree swami samarth 9 guruvar vrat problems will end swami to be always with you changes definitely seen and impossible become possible know rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.