Diwali 2025: दिवाळी आणि किल्लेबांधणीचा खेळ; खुद्द महाराजांनाही आवडत होता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 07:00 IST2025-10-13T07:00:00+5:302025-10-13T07:00:02+5:30
Diwali 2025: दिवाळीत मातीत मनसोक्त खेळून किल्लेबांधणीची मजा रेडिमेड किल्ला विकत घेण्यात नाही, महाराजांची याबाबत ऐतिहासिक आठवण जाणून घेऊ.

Diwali 2025: दिवाळी आणि किल्लेबांधणीचा खेळ; खुद्द महाराजांनाही आवडत होता!
>> कौस्तुभ कस्तुरे
दिवाळी प्रत्येकासाठी वेगवेगळे वैशिष्ट्य घेऊन येते. मोठ्यांना वेध लागतात बोनसचे, नवीन घर, वाहन खरेदीचे, गृहिणींना वेध लागतात आवराआवर, नातेवाईकांची उठबस तसेच फराळ बनवण्याचे, ज्येष्ठांना वेध लागतात घर सजावटीचे तर बाळ गोपाळांना वेध लागतात फटाके उडवणे तसेच किल्ला उभारणीचे. अगदी शहरातसुद्धा या परंपरेत आजतागायत खंड पडलेला नाही. एवढेच काय तर परदेशातही दिवाळीत किल्ला बनवण्याची परंपरा भारतीयांनी जपली आहे. पण हे किल्लेउभारणीचे काम नेमके कधीपासून सुरु झाले, त्याचा आढावा घेऊया.
स्वतः शिवाजी महाराज लहानपणी लुटुपुटुचे किल्ले बनवत असत, असे शिवभारताच्या सातव्या अध्यायात नमूद आहे. अर्थात हे दिवाळीशी निगडित आहे असे कुठेही नमूद नसले तरी नंतरच्या काळात कदाचित महाराष्ट्रात हळूहळू, सुरुवातीला पुण्याच्या आसपास अन नंतर पसरत जाऊन घराघरात ही किल्लेबांधणी सुरू झाली असावी. आपल्या घरातील लहान मुलांना या निमित्ताने शौर्याचे धडे, किंवा किमान आठवण देण्याचा यामागे हेतू असावा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
दिवाळीच का? तर आपल्याकडे दसऱ्याला नव्या मोहिमा सुरू होत, शिलंगण असे. त्यानंतर येणारा पहिला मोठा सण म्हणजे दीपावली. याला ऐतिहासिक काही आधार नाही, पण हे जास्त सयुक्तिक आहे असे वाटते. महाराजांनी लहानपणी मातीच्या ढिगाऱ्यांना "किल्ले" म्हणणे याला मात्र कागदोपत्री पुरावा आहे.
हल्ली अनेक ठिकाणी किल्ले बांधणीच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यात मुलांना अवश्य भाग घ्यायला लावा. त्यानिमित्ताने त्यांचे कुतूहल चाळवेल, इतिहास वाचला जाईल आणि नवनिर्मितीचा आनंद मिळेल. फार खर्चिक नसलेला हा खेळ इतिहासाशी, महाराजांशी आणि आपल्या मातृभूमीशी नाळ जोडणारा आहे.
बाकी, किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती पहायच्या आहेत का? श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतील, पुण्याच्या आंबेगाव येथील शिवसृष्टीला दिवाळीपूर्वी किमान एकदा तरी भेट द्या, आणि आपल्या पाल्याला घेऊन जायला मात्र विसरू नका!! का? निरनिराळ्या प्रमुख किल्ल्यांची "स्केल मॉडेल्स" आपल्याला तिथे पाहायला मिळतील, अन मुलांनाही नवा हुरूप येईल..