Diwali 2022 : 'तुझं माझं पटेना, तुझ्यावाचून करमेना' असं गोडं नातं असतं भाऊ बहिणीचं; त्याच नात्याचा हा उत्सव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 17:45 IST2022-10-25T17:43:49+5:302022-10-25T17:45:28+5:30
Diwali 2022: आपल्या संस्कृतीने प्रत्येक नात्याला मान दिला आहे आणि त्याचा उत्सवही साजरा केला आहे. हे अव्यक्त प्रेम व्यक्त करण्याचा दिवस भाऊबीज!

Diwali 2022 : 'तुझं माझं पटेना, तुझ्यावाचून करमेना' असं गोडं नातं असतं भाऊ बहिणीचं; त्याच नात्याचा हा उत्सव!
भाऊ बहिणीचे नाते, स्वार्थापलीकडचे असते. या नात्यात रुसवे, फुगवे कितीही असले, तरी परस्पर प्रेम आणि ओढ शेवट्पर्यंत कमी होत नाही. हे नाते रक्ताचे असो, नाहीतर मानलेले, या नात्यात आपसुक खडीसाखरेचा गोडवा उतरतो. अशाच सुमधुर नात्याची एक सुमधुर गोष्ट!
महर्षी नारदांनी एकदा भगवान श्रीकृष्णाला विचारले, 'भगवंत, सुभद्रा तुमची धाकटी बहीण, तरी तिच्यापेक्षा द्रौपदी तुमची लाडकी, असे का?'
श्रीकृष्ण म्हणाले, 'सांगतो. त्याआधी तू जाऊन दोघींना आळीपाळीने सांग, कृष्णाचे बोट कापले गेले आहे, रक्ताची धार लागली आहे, पण वेळेला छोटीशी चिंधीसुद्धा मिळत नाहीये. एवढे कर, तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल.'
महर्षी आधी सुभद्रेकडे गेले. तिला निरोप दिला. ती हळहळली. परंतु, आपल्या सगळ्या जरी काठाच्या, नक्षीदार साड्या पाहता, चिंधी कुठून आणायची, असा तिलाही प्रश्न पडला. ती सगळीकडे चिंधीचा शोध घेऊ लागली. तिचा शोध होईस्तोवर महर्षी द्रौपदीकडे पोहोचले आणि तिलाही तोच निरोप दिला. वृत्त ऐकून द्रौपदीच्या काळजात चर्रर्र झाले. मागचा, पुढचा विचार न करता, तिने लगेच आपलया भरजरी साडीचा तुकडा फाडून महर्षींना दिला आणि म्हणाली, 'आधी जाऊन माझ्या भावाचे रक्षण करा.'
चिंधीचा तुकडा घेऊन श्रीकृष्णाकडे परत येत असता महर्षी मनात म्हणतात, 'मी तुझ्या भावाचा रक्षण करणारा कोण, तोच साऱ्या विश्वाचे रक्षण करतो.' असे म्हणत महर्षींनी द्रौपदीने दिलेली चिंधी कृष्णाच्या हाती सोपवली. ती चिंधी हातात घेत श्रीकृष्णांनी जे उत्तर दिले, त्या प्रसंगाचे कथन प्रा. आचार्य अत्रे यांनी श्यामची आई चित्रपटातील गाण्यात केले आहे.
प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण,
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खूण,
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण, प्रीती जी करिती लाभाविण
द्रौपदीसी बंधू शोभे, नारायण...!
याच निर्व्याज प्रेमाची, छोट्याच्या चिंधीची परतफेड श्रीकृष्णांनी द्रौपदीच्या लज्जारक्षणाच्या वेळी केली आहे. तिला एवढ्या साड्या पुरवल्या, की त्या फेडता फेडता दु:शासन दमला. दरबार वरमला. उपस्थित प्रत्येक जण द्रौपदीची कृष्णभक्ती पाहून खजील झाला.
अलीकडच्या काळात बहीण भावाचे नाते व्यवहारी झाले आहे. संसार व्यापात बालपणीचे जीवाला जीव देणारे छोटेसे बहीण भाऊ हरवले आहेत. नाती रक्ताची नसली, तरी चालेल, परंतु जोडलेले नाते प्राणापलीकडे जाऊन जपता यायला हवे. हा आदर्श कृष्ण-द्रौपदीच्या नात्याने घालून दिला आहे. कृष्णावर आलेला बांका प्रसंग, द्रौपदीला सहन झाला नाही आणि कृष्णाने आपल्या बहिणीच्या सन्मानाला धक्का लागू दिला नाही. हे आदर्श नाते, प्रत्येक बहीण भावाने मनापासून जपले, तर द्रौपदी वस्त्रहरणासारखा मानहानीचा प्रसंग पुन्हा उद्भवणार नाही आणि उदभवलाच, तर कृष्णासारखा प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीच्या मदतीला धावून जाईल.
भाऊबीजेच्या निमित्ताने या गोड नात्याचे बंध पुनश्च घट्ट व्हावेत, अशी कृष्णचरणी प्रार्थना करूया.