भारत देश वैविध्यतेने नटलेला आहे. अनेक प्रथा परंपरा, विविध जाती जमाती, धर्म, पंथ गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. इथल्या चालीरीतींबद्दल समजून घेता घेता एक जन्मदेखील अपुरा पडेल. इथले वैविध्य हेच भारतीयांचे वैशिष्ट्य आणि विविधतेत एकता हीच भारताची ओळख आहे.
अशा परंपरेतला एक अनोखा प्रकार वाचण्यात आला. तो पुढीलप्रमाणे-
सहसा लोक देवाची पूजा करण्यासाठी किंवा मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून मंदिरात देवदर्शनाला जातात. नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाल्यावर पुन्हा देवाला दिलेले वचन पूर्ण करतात. नवसाचे अनेक प्रकार आहेत. काही जण शरीराला यातना देऊन नवस पूर्ण करण्याची तयारी दर्शवतात. इथंवरही ठीक आहे. पण देवीचे एक मंदिर देखील आहे जिथे भक्त त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बूट आणि चपलांच्या माळा देवीच्या नावे अर्पण करतात. हे नेमके का आणि कशासाठी केले जाते? तिथली परंपरा काय आहे ते जाणून घेऊ.
कर्नाटकातील गुलबर्ग जिल्ह्यात लकम्मा देवीचे मंदिर आहे. दरवर्षी या मंदिरात पादुका महोत्सव आयोजित केला जातो. ज्यामध्ये दूरदूरच्या गावातील लोक देवीला चप्पल अर्पण करण्यासाठी येतात. या उत्सवात प्रामुख्याने गोला-बी नावाच्या गावातील लोक उत्साहाने सहभागी होतात. या प्रथेमुळे हे देवीचे मंदिर प्रसिद्ध असल्याचे सांगितले जाते. पण तिथे नेमके कोणते नवस पूर्ण होतात तेही जाणून घेऊ.
दरवर्षी दिवाळीच्या सहाव्या दिवशी लकमा देवीच्या मंदिरात पादत्राणे महोत्सवाचे आयोजन केले जाते. लोक आपला नवस पूर्ण करण्यासाठी मंदिराच्या परिसरात असलेल्या झाडावर बूट आणि चप्पल टांगतात. असेही मानले जाते की हा नवस पूर्ण केल्याने गुडघ्यांशी संबंधित समस्या दूर होतात. तसेच वाईट शक्ती नेहमी दूर राहतात. याशिवाय या मंदिरात मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थ अर्पण केले जातात. या मंदिरात केवळ हिंदूच नाही तर मुस्लिम समाजातील लोकही आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात हे विशेष!