देवाधिदेव महादेवांनादेखील 'राम'नामाचीच मात्रा लागू झाली होती.

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 9, 2020 02:08 PM2020-11-09T14:08:02+5:302020-11-09T14:10:55+5:30

आपणही रोजच्या रोज अपमानाचे, अन्यायाचे, अत्याचाराचे विष प्याले पित असतो, त्यामुळे आपल्या शरीराचा दाह होत असतो. तर आपणही राम नाम घेतले, तर आयुष्यात येणाऱ्या कठोर, कडवट विषसमान प्यालांना अमृतस्वरूप नक्कीच प्राप्त होऊ शकेल.

Devadhideva Mahadev was also affected by the name 'Ram'. | देवाधिदेव महादेवांनादेखील 'राम'नामाचीच मात्रा लागू झाली होती.

देवाधिदेव महादेवांनादेखील 'राम'नामाचीच मात्रा लागू झाली होती.

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ 

आपण सगळेच जण आनंद असो नाहीतर दु:खं, अशा क्षणी लता, आशा, किशोर, रफी यांची गाणी गातो. परंतु, त्यांच्या आयुष्यातील भावनिक क्षणी, ते लोक कोणाची गाणी गात असतील, हा प्रश्न एकाने उपस्थित केला होता. त्यावर लता दीदींनी उत्तर दिले होते, आम्हीसुद्धा तुमच्यासारखेच आम्ही गायलेली गाणी सोडून इतर गायकांची गाणी ऐकतो आणि मन रमवतो. 

या प्रश्नावरून एक पौराणक कथा आठवली.  माता पार्वतीने एकदा भगवान शंकरांना असाच एक प्रश्न विचारला होता. गाण्यासंदर्भात नाही, तर नाम:स्मरणासंदर्भात! महादेवांची मूर्ती पहा. नेहमी ध्यानस्थ असलेली दिसते. दिवस-रात्र असे ध्यानधारणेत बुडालेले पाहून पार्वती मातेने न राहवून महादेवांना विचारले, `देवाधिदेव महादेव, सगळे भक्त त्यांच्या आयुष्यातील ताप नष्ट व्हावेत म्हणून तुमची प्रार्थना करतात, मग तुम्ही कोणाचे स्मरण करत असता? कोणत्या नाम: स्मरणात एवढे दंग असता? कोणात एवढे रममाण होता?'

हेही वाचा : 'मेडिटेशन' सोपं नक्कीच नाही, पण एकदा जमलं की त्याला तोड नाही; सोप्या अन् उपयोगी टिप्स

यावर महादेव स्मित करत म्हणाले, `देवी, तुझ्या प्रश्नातच तुझे उत्तर आहे. जो सकल विश्वाला रमवतो, तो राम. त्याचेच मी सदैव नाम घेतो. त्याच्यात रमतो आणि मन एकाग्र करतो.'

पार्वती मातेने पुढचा प्रश्न विचारला, `परंतु, भगवंत तुम्ही तिघेही समान शक्तीचे आहात, तुम्हाला नाम:स्मरणाची काय गरज?' 

त्यावेळी महादेवांनी पार्वती मातेला समुद्र मंथनाची कथा सांगितली. ते म्हणाले, `देवी, समुद्र मंथनाचे वेळी देव आणि दानवांमध्ये नुसती चढाओढ लागली होती. अस्र, शस्र, रत्न, हिरे, माणिक, मोती, कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी आणि अमृतसुद्धा! ते मिळवण्यासाठी सगळे धडपडत होते. असूरांच्या हाती अमृतकलश लागू नये, म्हणून भगवान महाविष्णूंनी मोहिनी अवतार घेऊन केवळ देवांना अमृतप्राशन करवले, हे तुम्हाला माहित आहेच. परंतु, अमृत मिळवण्याची चढाओढ संपल्यावर सर्वात शेवटी समुद्रमंथनातून हलाहल अर्थात विष निघाले. ते घेण्यासाठी कोणीच पुढाकार घेईना. 

विष पृथ्वीवर सांडले असते, तर विश्व संपले असते. कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे होते. मात्र, कोणीच पुढे जात नाही पाहून, विश्वकल्याणार्थ ते हलाहल प्राशन करण्यासाठी मी पुढे सरसावलो. कारण, ब्रह्ना, विष्णू आणि मी आम्ही तिघांनी वाटून घेतलेल्या कामानुसार ब्रह्माने सृष्टी निर्मिती करायची, विष्णुंनी पालन पोषण करायचे आणि मी दुष्ट वृत्तीचा नायनाट करायचा. त्यामुळे जगावर आलेले संकट दूर करणे माझे कर्तव्यच होते. मी तो विषप्याला ओठाला लावला आणि घटाघटा ते विष कुठेही सांडू न देता प्राशन केले. विष प्यायल्याने माझा गळा काळा-निळा पडला, त्यावरून मला नीळवंâठ अशी ओळख मिळाली. परंतु, जसससे विष अंगात भिनू लागले, तसतसा माझ्या अंगाचा दाह होऊ लागला. 

सर्वांगाला भस्म लावले, गळ्याभोवती सर्प गुंडाळलेस, सर्वांची तहान भागवणारी गंगा मस्तकावर धारण केली, शीतल चंद्रमा भाळी लावला. एवढे नानाविध पर्याय निवडूनही अंगाचा दाह शांत झाला नाही, त्यावेळेस महर्षी नारदांनी राम नामाचा उतारा सांगितला. त्यांच्या सांगण्यानुसार राम नाम सुरू केले आणि काही काळातच मी पूर्णपणे बरा झालो. तेव्हापासून मला राम नामाची गोडीच लागली. या राम नामाने अनेक जण या भवसागरातून तरून गेले आहेत. रामनाम आध्यात्मिक तहान-भूक भागवणारे आहे, म्हणून माझाच अंश असलेले हनुमंत, यांनी भगवान विष्णुंच्या राम अवतारात मारुतीचे रूप घेऊन अखंड रामनामाचा वसा घेतला.'

भगवान महादेवांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार रामनामाने त्यांच्या अंगाचा दाह शांत केला. मग विचार करा, आपणही रोजच्या रोज अपमानाचे, अन्यायाचे, अत्याचाराचे विष प्याले पित असतो, त्यामुळे आपल्या शरीराचा दाह होत असतो. तर आपणही राम नाम घेतले, तर आयुष्यात येणाऱ्या कठोर, कडवट विषसमान प्यालांना अमृतस्वरूप नक्कीच प्राप्त होऊ शकेल.

जय श्री राम!

हेही वाचा : कोणतीही गोष्ट अशक्य नसते, ती प्रयत्नपूर्वक शक्य करावी लागते - गौर गोपाल दास

Web Title: Devadhideva Mahadev was also affected by the name 'Ram'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.