कोणतीही गोष्ट अशक्य नसते, ती प्रयत्नपूर्वक शक्य करावी लागते - गौर गोपाल दास

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: September 25, 2020 09:49 PM2020-09-25T21:49:03+5:302020-09-25T22:19:11+5:30

सामान्य लोक आव्हानाला घाबरतात, तर असमान्य लोक आव्हाने स्वीकारतात.

Nothing is impossible, it has to be done with effort - Gaur Gopal Das | कोणतीही गोष्ट अशक्य नसते, ती प्रयत्नपूर्वक शक्य करावी लागते - गौर गोपाल दास

कोणतीही गोष्ट अशक्य नसते, ती प्रयत्नपूर्वक शक्य करावी लागते - गौर गोपाल दास

googlenewsNext
ठळक मुद्देयश आपोआप मिळत नाही, ते मिळवावे लागते.नाते आपोआप यशस्वी बनत नाही, ते प्रयत्नपूर्वक यशस्वी बनवावे लागते. आध्यात्मिक शक्ती सहज मिळत नाही, ती मिळवावी लागते.

ज्योत्स्ना गाडगीळ 

एका महामार्गावर एक भला मोठा फलक लावला होता. त्यावर लिहिले होते, `जर सगळे करू शकतात, तर मीदेखील करू शकतो. मात्र, जर सगळ्यांना जमत नसेल, तर मला ते जमवायलाच हवे.' हे उद्गार आहेत, त्या प्रत्येक यशस्वी माणसाचे, ज्याने अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवल्या. 

याउलट, सामान्य माणसाचे उद्गार काय असते? 'जर सगळे करू शकतात, तर त्यांना करू द्या, मला ते करायचे नाही आणि सगळ्यांना जमत नसेल, तर मी तरी कशाला प्रयत्न करून पाहायचे?' 

सामान्य आणि असामान्य यांच्यातला हाच मुख्य फरक आहे. सामान्य लोक आव्हानाला घाबरतात, तर असमान्य लोक आव्हाने स्वीकारतात आणि यशस्वी होतात. पण मग, ही असामान्य लोक  यशाची गुरुकिल्ली घेऊनच जन्माला येतात का? नाही? तर ते स्वत: यशाचा मार्ग तयार करतात. 

हेही वाचा: 'बँक ऑफ कर्मा'चे पासबुक रोज तपासा; पुण्य कमवा अन् त्याचं 'सेव्हिंग'ही करा!

यश आपोआप मिळत नाही, ते मिळवावे लागते. उत्तम महाविद्यालयात किंवा विश्वविद्यालयात प्रवेश मिळाला, म्हणून कोणी यशस्वी होत नाही. महाविद्यालयाचे यश, हे तुमचे व्यक्तिगत यश नाही. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, तर तासन् तास अभ्यास करून, विविध विषयांचे ग्रंथ वाचून, जास्तीत जास्त मेहनत घेऊन तुम्ही परीक्षेला सामोरे गेलात, तर यश तुमचेच असेल. 

जसे, यश आपोआप मिळत नाही, तसे यशस्वी लोकही आपोआप घडत नाहीत. मोठ्या हुद्द्याची, मोठ्या पगाराची नोकरी मिळाली, म्हणजे तुम्ही यशस्वी झालात असे नाही. तर, तुमची कामाची पद्धत, सहकाऱ्यांशी वागणुक, कंपनीला यशस्वी होण्यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत तुम्हाला यशस्वी ठरवते. 

कोणतेही नाते आपोआप यशस्वी बनत नाही, ते प्रयत्नपूर्वक यशस्वी बनवावे लागते. कुंडल्या जुळल्या, व्यक्तिमत्त्व जुळली, राहणीमान जुळले, म्हणून लग्न यशस्वी होत नसते. तर, लग्न यशस्वी करण्यासाठी दोघांना सुसंवाद साधावा लागतो, समजून घ्यावे लागते, एकमेकांचा आदर करावा लागतो, तडजोड करावी लागते, तेव्हाच नाते यशस्वी बनते, टिकते आणि रुजते.

आध्यात्मिक शक्ती सहज मिळत नाही, ती मिळवावी लागते. नामांकित संस्थेत किंवा आध्यात्मिक गुरुंकडे शिकवणी लावली, म्हणजे तुम्हाला अध्यात्मिक शक्ती प्राप्त होत नाही. त्यासाठी तुम्हाला आत्मशक्ती वाढवावी लागते. संयम वाढवावा लागतो. मन केंद्रित करावे लागते. आध्यात्ममार्ग अनुसरावा लागतो. तेव्हा आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते.

थोडक्यात, कोणतीही गोष्ट आपसुख मिळत नसते, ती मिळवावी लागते आणि मिळाली, की ती टिकवून ठेवावी लागते. यासाठी प्रयत्न, अभ्यास, चिकाटी आणि प्रचंड सकारात्मकता असावी लागते. या गोष्टी आत्मसात केल्या, की तुम्हीच आत्मविश्वासाने म्हणाल, 'अशक्य काहीच नाही!'

हेही वाचा: गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा... शक्तीपेक्षा युक्ती वापरून जिंकायला शिकवणारा बाप्पा!

Web Title: Nothing is impossible, it has to be done with effort - Gaur Gopal Das

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.