२४ जुलै रोजी दीप अमावस्या(Deep Amavasya 2025) आहे आणि त्याच दिवशी गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्याने गुरु पुष्यामृत(Guru Pushyamrut 2025) योग जुळून आला आहे. हा योग सोनेखरेदीसाठी शुभ मानला जातो. या मुहूर्तावर केलेली सोने खरेदी ही वृद्धिंगत होणारी असते, म्हणजे त्यात वाढ होत जाते. मात्र अनेकांनी असाही प्रश्न उपस्थित केला आहे, की अमावास्येच्या मुहूर्तावर सोनेखरेदीसारखे शुभ कार्य करावे का? याबाबत रवी क्षीरसागर गुरुजी यांनी दिलेले स्पष्टीकरण जाणून घेऊ.
अमावास्या अशुभ की शुभ? सर्वप्रथम अमावस्या ही तिथी अशुभ नाही. उलट दिवाळीत आश्विन अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन करतो. त्यामुळे पौर्णिमा, अमावस्या या लक्ष्मी मातेच्या प्रिय तिथी आहेत आणि मंगळवार, शुक्रवार हे आवडते वार आहेत. त्यामुळे इतर वेळीही अमावस्या अशुभ ठरवण्याचे काहीच कारण नाही. अशातच आषाढ अमावस्या जिला आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस असे म्हणतो, ती तर दिव्यांचे पूजन करून अज्ञान, आळस, अंधश्रद्धेचा अंधार घालवणारी आहे. त्यामुळे तीदेखील वर्ज्य ठरत नाही.
गुरु पुष्यामृत नक्षत्राबद्दल :
पुष्य नक्षत्राबाबत सांगायचे तर या मुहूर्तावर केलेले कोणतेही कार्य वर्धिष्णू ठरते, म्हणजेच वाढत जाते. या मुहूर्तावर विद्यादान केले जाते, सोने, घर, जमीन खरेदी केली जाते. मात्र विवाह, साखरपुडा केला जात नाही. कारण अशा गोष्टी वारंवार होणे शुभ लक्षण नाही. म्हणून मंगलकार्य वगळता इतर कोणतीही शुभ कार्य या मुहूर्तावर केली जातात. भारतात प्राचीन काळापासून सोन्याला महत्त्व आहे. हा शुद्ध आणि शुभ धातूसुद्धा आहे. त्यामुळे त्याची किंमत कधीही कमी होत नाही, उलट वाढतच जाते. म्हणून लोक सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
मग प्रश्न राहिला अमावस्येच्या मुहूर्तावर आलेल्या गुरु पुष्यामृत योगाचा आणि सोने खरेदीचा, तर जाणून घ्या, २४ जुलै रोजी जुळून आलेला हा दुर्मिळ योग आहे. एवढेच नाही तर तो सुवर्ण वृद्धी योग आहे. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहता हा योग अक्षय्य तृतीयेइतकाच महत्त्वाचा ठरेल. या मुहूर्तावर केलेली सुवर्ण खरेदी लाभदायी ठरेल. त्यात वाढच होत राहील. तसेच या मुहूर्तावर खरेदी केलेले सोने कधीही विकावे लागण्याची वेळ येणार नाही!
२४ जुलै रोजी अमृत मुहूर्तावरच करा सोनेखरेदी, जाणून घ्या शुभ काळ :
गुरुपुष्यामृत सायंकाळी ४.४३ ते दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी ६.१५ पर्यंत आहे आणि अमावस्यां तिथी २४ तारखेला रात्री १२.४० मिनिटांनी समाप्त होणार आहे. अशातच अमृत योगावर सोने खरेदी शुभ ठरणार आहे.
सोने खरेदीसाठी अमृत काळ : दुपारी ३.०५ मिनिटांपासून ते सायंकाळी ५.३ मिनिटांपर्यंत.