ज्ञानेश्वरीचा 'कठीण' गाभा सोप्या भाषेत उलगडणारे मामासाहेब देशपांडे यांची पुण्यतिथी; वाचा त्यांचे कार्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:45 IST2026-03-11T15:42:54+5:302026-03-11T15:45:45+5:30

श्रीज्ञानेश्वरीचे मर्म उलगडणारे अद्वितीय भाष्यकार प.पू. मामासाहेब देशपांडे महाराज यांची १२ मार्च रोजी पुण्यतिथि, घेऊया त्यांच्या कार्याचा आढावा. 

Death anniversary of Mamasaheb Deshpande, who revealed the 'difficult' core of Dnyaneshwari in the language of experience; Read his work | ज्ञानेश्वरीचा 'कठीण' गाभा सोप्या भाषेत उलगडणारे मामासाहेब देशपांडे यांची पुण्यतिथी; वाचा त्यांचे कार्य 

ज्ञानेश्वरीचा 'कठीण' गाभा सोप्या भाषेत उलगडणारे मामासाहेब देशपांडे यांची पुण्यतिथी; वाचा त्यांचे कार्य 

>> रोहन विजय उपळेकर 

मराठी सारस्वताची अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून निःसंशय भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या श्रीज्ञानेश्वरीचेच नाव घ्यावे लागेल. असा ग्रंथ पूर्वी कधी झाला नाही आणि पुढे कधीच होणार पण नाही. श्री ज्ञानेश्वरी हा या सहस्रकातील तत्त्वज्ञान क्षेत्रातला अत्यंत मोठा चमत्कार आहे !

श्री ज्ञानेश्वर माउलींच्या ‘शब्दकळे’विषयी संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक पूजनीय प्रा.शिरीषदादा कवडे यथार्थपणे लिहितात की, “सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांची अमृतवाणी वेदांनाही फिके पाडणारी आहे, परब्रह्माची अनुभूती प्रकटतेने इंद्रियगोचर करविणारी आहे. श्रीभगवंतांची नित्यानंदवर्षिणी प्रेमशक्तीच या वाणीच्या रूपाने प्रसन्न होऊन सगुण साकार झालेली आहे. माउलींच्या वाणीला भगवती गंगेचा अवखळ ओघ आहे, यमुनेचे प्रेमातुर गांभीर्य आहे, हिमालयाची गूढरम्य शांतता आणि सकलतीर्थांचे अम्लान पावित्र्य आहे. या भौतिकतेतही, अलौकिकाची दीपावली साधक हृदयात उजळविणारी ही चित्कला केवळ अनुपमेय आहे. आमच्या मायमराठीचे केवढे हे भाग्य की या वाणीने तिची वस्त्रभूषा स्वीकारून धन्य केली !”

श्री माउलींची साहित्यसंपदा त्यांच्याच शब्दात सांगायचे तर निष्कामांसाठी निर्माण झालेली आहे. त्यांच्या अलौकिक वाक्चातुर्याने लोक सुखी होतात हे जरी सत्य असले तरी, या साहित्यसागरात सखोल बुडी मात्र आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झालेले आणि विचक्षण बुद्धिवैभवाने मंडित झालेले विरळे जनच देऊ शकतात, हेही तितकेच खरे आहे. म्हणूनच हे दैवी वाङ्मय मोहक, मधुर असले तरी तुम्हां-आम्हां सर्वसामान्यांच्या आकलनासाठी मात्र काहीसे दुर्बोध ठरते. यास्तव कोणा ‘जाणत्या’च्या माध्यमातूनच आपल्याला त्यात प्रवेश करावा लागतो. आजवर होऊन गेलेल्या अशा श्रीज्ञानेशकृपांकित 'जाणत्यां'मध्ये निःसंशय सद्गुरु योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचे नाव अग्रक्रमावर आहे !

श्री ज्ञानेश्वरी हा अनुभवाचा ग्रंथ आहे, कितीही मोठे झाले तरी नुसते शब्दपांडित्य तिथे कामाचे नसते. त्यामुळेच श्रीज्ञानेश्वरीच्या गाभ्यात प्रवेश करणाराही तसाच तयारीचा व अनुभवाच्या अंगाने पक्का असावा लागतो. पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराज हे या अर्थाने अधिकारसंपन्न होते. त्यांची उपलब्ध ग्रंथसंपदा निगुतीने पाहिल्यास आपल्याला त्यांचा निकोप दृष्टिकोन आणि त्यांच्या सांगण्यातला स्वानुभूतीचा सच्चेपणा, जाणत्याचा परखडपणा व प्रेमाचा ओलावा जाणवल्याशिवाय राहात नाही. नवल असे की, एवढी अनुभवाची खोली असूनही सद्गुरु श्री मामासाहेब स्वतःला मात्र ‘श्रीज्ञानेश्वरीचा तुच्छ दास’च मानीत असत. त्यांनी आपली ती ‘दास्यत्वाची मिराशी’ आणि ‘विनम्र विद्यार्थीवृत्ती’ कधीच सोडली नाही; आणि म्हणूनच प्रेमळ मायमाउली असणाऱ्या श्री ज्ञानेश्वरीने आपल्या ब्रीदाला जागत त्यांना स्वानंदसाम्राज्याच्या चक्रवर्तीपदावर आरूढ केले होते !

महात्मे सांगतात की माउलींच्या दैवी शब्दांचे कवच फोडून आतल्या सिद्धान्तगाभ्याचा आस्वाद घेण्यासाठी नुसते पांडित्य किंवा रसिकता पुरेशी नसते, तर अपरंपार गुरुकृपा, मनाचे हळुवारपण आणि सप्रेम साधनाभ्यासही लागतो. कारण हे वाङ्मय ‘मनाचेनि निजांगे’ भोगावे लागते. ही सिद्धी माउलीकृपेने पूजनीय श्री.मामांना पुरेपूर आकळलेली होती. त्यामुळेच त्यांनी जेवढ्या खोलवर जाऊन श्री माउलींच्या शब्दांचे स्वर्गीय सौंदर्य सर्वसामान्यांना दाखवले, तेवढे इतर क्वचितच कोणी दाखवले असेल. म्हणूनच श्री ज्ञानेश्वरीचा समग्र अभ्यास करण्याची मनीषा असणार्‍यांना पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराजांचे समग्र वाङ्मय अभ्यासणे क्रमप्राप्तच आहे !

श्री माउली स्वमुखाने सांगतात की ‘संप्रदाय पांघरूनच अभ्यास करून अनुभव घ्यायचा असतो !’ संप्रदाय पांघरून म्हणजे नेमके कसे ? या मूलभूत प्रश्नाचे उत्तर आहे, पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराजांसारखे ! ते सांगत की, 'माउलींची ओवी ही माउलींच्याच ग्रंथांच्या आधाराने सोडवावी. कारण माउली जे काही बोलतात त्याचे स्पष्टीकरणही त्यांनीच कुठे ना कुठे संकेताने किंवा स्पष्टपणे देऊन ठेवलेले असते. ते आपल्याला बरोबर शोधता आले की चमत्कार झाल्यासारखे ह्या दैवी सारस्वताचे निगूढ रत्नदालन उघडते. सद्गुरु श्री माउलींची शब्दयोजना अनेक अर्थ प्रकट करणारी आणि अचूक असते. त्यातला सूक्ष्म बारकावा आपल्या ध्यानात आला तरच त्या शब्दयोजनेचे खरे सौंदर्य आणि प्रभाव आस्वादता येतो. पण यासाठी फार तयारीचा अभ्यास लागतो. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे असेच श्रेष्ठ अभ्यासक होते !

प.पू.श्री.मामांचे सांगणे श्री माउलींच्या कृपेने कसे अचूक आणि चपखल होते पाहा. 'एकांत' हा आपल्या अगदी ओळखीचा शब्द आहे. पण त्याचा अर्थ आपल्याला खरंच माहीत आहे का ? तर नाही. आपण म्हणू की, घरदार सोडून हिमालयाच्या गुहेत जाऊन बसणे म्हणजे एकांत. पण हा काही खरा अर्थ नाही. प.पू.श्री.मामा या शब्दाचा अर्थ नेमकेपणाने सांगतात की, " 'एक' म्हणजे 'मन'. त्या मनाचे अनेक विकल्प असतात. त्या सगळ्या विकल्पांचा आणि मनाचा अंत म्हणजे एकांत. तो कुठे असतो ? तर परमेश्वरापाशी, अन्य कुठेच नाही !"

प.पू.श्री.मामा अतिशय सोप्या, घरगुती उदाहरणांनी कठीण विषय समजावून सांगत असत. ही हातोटी त्यांच्या प.पू.मातु:श्रींकडूनच त्यांना मिळालेली होती. सद्गुरु श्री माउली 'हरिपाठा'त म्हणतात, भावेवीण देव नकळे नि:संदेह. याचे स्पष्टीकरण प.पू.श्री.मामा असे करतात की, "भाव निर्माण होण्यासाठी अंतःकरण शुद्ध व्हावे लागते. एका बाईने नऊ महिने पोटी भार वाहून मुलाला जन्म दिला. त्याच्या हिताचा भाव तिच्या मनात असणे स्वाभाविक होते. मूल नसलेल्या दुसऱ्या एका बाईने हिचे मूल पळवून नेले. दोघी मुलावर हक्क सांगू लागल्या. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायाधीशांनी एक युक्ती केली. त्यांनी पट्टेवाल्याला सांगून एक तलवार आणून मुलाचे दोन सारखे भाग करून दोघींना द्यायला सांगितले. हे ऐकताच खऱ्या आईला दुःख सहन न होऊन ती म्हणाली, "माझा मुलगा कुठेही असला तरी चालेल पण तो सुखी असो. कृपा करून त्याचे तुकडे करू नका !" हे ऐकल्यावर त्या खोट्या आईला आपल्याला मूल मिळणार याचा आनंद झाला. पण न्यायाधीशांनी भाव जाणून योग्य निवडा करून ते मूल खऱ्या आईला देऊन टाकले आणि दुसरीला शिक्षा केली. सारांश असा की, अंत:करणाच्या शुद्धीशिवाय भाव येत नाही आणि भावाशिवाय देव कळत नाही.

नुसता भाव असून चालत नाही, तर अंत:करणाची पूर्ण शुद्धी झाल्याशिवाय देव नि:संदेह कळत नाही. आणि त्यासाठी श्रीगुरूंच्या कृपेची नितांत आवश्यकता असते !"

इंद्रियांचे विषय आत असतात की बाहेर ? या प्रश्नांचे पूर्ण समाधानकारक उत्तर देण्याचा अनेक अभ्यासकांचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. पण प.पू.श्री.मामा यासाठी पुराणातले एक उदाहरण देऊन सुरेख समजावतात की, "विषय बाहेर आहेत ही कल्पना निखालस चुकीची आहे. कशी ? तर, विश्वामित्रांना भुलवण्यासाठी इंद्राने मेनका अप्सरेला पाठवले. तसेच श्री शुकदेवांना भुलवण्यासाठी रंभेची योजना केली. विश्वामित्रांच्या आत विषय जागृत होता म्हणून ते भुलले आणि मूल होईपर्यंत त्यांनी मेनकेबरोबर संसार केला. परंतु शुकदेवांचे तसे नव्हते, त्यांच्या आत विषय नसल्याने रंभेकडे, तिच्या कामुक हावभावांकडे पाहूनही ते तिच्याशी लिप्त झाले नाहीत. या दृष्टांतावरून स्पष्ट होते की, विषय आत आहेत, बाहेर नाहीत. ज्या प्रमाणे दोन वायर्स एकत्र आल्यावरच दिवा लागतो, त्या प्रमाणे आत असलेला विषय बाहेरच्या विषयाशी जोडला जातो तेव्हाच भोग घडतो. परंतु शरीरातील विषयांचा जर विसर पडला तर बाहेरच्या विषयांशी तदाकारता येतच नाही. हीच प्रक्रिया साधनेने आपोआप होते !"

सद्गुरु श्री माउली हे अत्यंत अद्भुत भाष्यकार आहेत. त्यांचे निसर्गाचे, भोवतालाचे निरीक्षण आणि त्या निरीक्षणाचे त्यांनी आपल्या वाङ्मयातून केलेले अप्रतिम उपयोजन हा खरोखर असंख्य प्रबंधांचाच विषय ठरावा. सद्गुरु श्री माउलींच्या आणि त्यांच्या  वाङ्मयाच्या सततच्या अनुसंधानामुळे प.पू.श्री.मामांचे निरीक्षण देखील अगदी तसेच अद्भुत झालेले होते. याचे एक विलक्षण उदाहरण सांगतो. आपल्या 'मुद्रेची प्रौढी ऐसी' या पुस्तकातील 'मग कंठनाळ आटे । (ज्ञाने.६.१३.२०७)' या ओवीवरील प्रवचनात ते आटण्याची प्रक्रिया समजावून सांगतात. त्यासाठी त्यांनी चितेवर जळणाऱ्या प्रेताचे उदाहरण देऊन सांगतात की, प्रेताला जसजशी आगीची धग लागायला लागते, तसतसे त्याचे दोन्ही हात, पाय आणि मुंडके आक्रसते, आत ओढले जाऊ लागते. त्याला 'शव आटणे' म्हणतात. साधनेने कंठनाळ आटते तेव्हा साधकाच्या शरीरात अशीच प्रक्रिया घडत असते. यावरून आपल्याला जाणवते की, प.पू.श्री.मामा अक्षरशः प्रत्येक क्षणी ज्ञानेश्वरीचेच चिंतन करत असेल पाहिजेत. समोर प्रेताचे अग्निसंस्कार चालू असतानाही त्यांच्या अंतरात मात्र श्री माउलींच्याच ओव्या अखंड रुंजी घालत होत्या. श्री ज्ञानेश्वरीच्या अभ्यासातली अशी अनन्यता, सातत्य आणि विचारांची खोली खरोखर अद्वितीयच नाही का ?

बायबल जर घराघरात पोहोचवले जाऊ शकते तर श्री ज्ञानेश्वरी का नाही जाणार ? या विचाराने प्रेरित होऊन पूजनीय मामासाहेबांनी जगभरातील सर्व भाषांमध्ये भाषांतरित करून श्रीज्ञानेश्वरी संपूर्ण जगात घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प केला. आपल्या हयातीतच मराठीसोबत कानडी भाषेतही श्री ज्ञानेश्वरी प्रकाशित केली. या दृष्टीने आता त्यांनी स्थापन केलेले श्रीवामनराज प्रकाशन हिरिरीने कार्यरत आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून बव्हंशी अभ्यासकांनी मान्यता दिलेली श्रीज्ञानेश्वरीची 'कुंटे प्रत' नुकतीच तीन सर्वांगसुंदर प्रकारांमध्ये पुनःप्रकाशित करण्यात आली.

श्री ज्ञानेश्वरीचे विवरण करण्याची पूजनीय मामासाहेबांची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत होती. कारण त्यांनी माउलींचा शब्दन् शब्द प्रत्यक्ष अनुभवलेला होता‌. पूजनीय श्री.मामा आणि त्यांचे दोन्ही उत्तराधिकारी, पूजनीय सौ.शकुंतलाताई आगटे आणि पूजनीय प्रा.शिरीषदादा कवडे अशा तिघांची अडीचशेपेक्षा जास्त ग्रंथांची आणि हजारो पृष्ठांची वाङ्मयसंपदा आजमितीस श्रीज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांना बहुमोल मार्गदर्शन करत आहे. या ग्रंथांच्या अभ्यासाशिवाय श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास अपूर्णच ठरेल, एवढे श्रीवामनराज प्रकाशनाचे ग्रंथ मौल्यवान असल्याचे अनेक अभ्यासकांनी एकमताने मान्य केले आहे.

दि.१२ मार्च रोजी पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराजांची ३६ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त श्री ज्ञानेश्वरीच्या या अद्वितीय अभ्यासकाच्या, श्री माउलींचे नेमके हृद्गत जाणणार्‍या अपूर्व उपासकाच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक दंडवत असोत !    

Web Title : मामासाहेब देशपांडे स्मृति: ज्ञानेश्वरी के अनुभवजन्य रहस्योद्घाटन

Web Summary : मामासाहेब देशपांडे, ज्ञानेश्वरी के विद्वान, ने अनुभवात्मक समझ के माध्यम से इसके गहन सार को उजागर किया, जिससे यह सभी के लिए सुलभ हो गया। उनकी शिक्षाओं ने भक्ति, आंतरिक पवित्रता और गुरु की कृपा पर बल दिया।

Web Title : Remembering Mamasahab Deshpande: Unveiling Dnyaneshwari's Depth Through Experience.

Web Summary : Mamasahab Deshpande, a Dnyaneshwari scholar, unlocked its profound essence through experiential understanding, making it accessible to all. His teachings emphasized devotion, inner purity, and Guru's grace for realizing the divine, leaving a legacy of spiritual wisdom.