दत्त जयंती २०२५: गुरुलीलामृत ग्रंथ पठण करा, स्वामी सदैव साथ देतील; पाहा, कसे करावे पारायण?

By देवेश फडके | Updated: November 27, 2025 15:05 IST2025-11-27T14:58:24+5:302025-11-27T15:05:35+5:30

Datta Jayanti 2025 Gurulilamrut Parayan: दत्त जयंतीच्या निमित्ताने स्वामींच्या गुरुलीलामृत ग्रंथाचे पारायण अनेक ठिकाणी केले जाते.

datta jayanti 2025 recite shree swami samarth gurulilamrut granth swami will always support and you will get immense timeless prosperity | दत्त जयंती २०२५: गुरुलीलामृत ग्रंथ पठण करा, स्वामी सदैव साथ देतील; पाहा, कसे करावे पारायण?

दत्त जयंती २०२५: गुरुलीलामृत ग्रंथ पठण करा, स्वामी सदैव साथ देतील; पाहा, कसे करावे पारायण?

Datta Jayanti 2025 Gurulilamrut Parayan: मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्त जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते, असे म्हटले जाते. गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. दत्त जयंतीला दत्तप्रभू आणि दत्तावतारांचे विशेष पूजन, नामस्मरण केले जाते. अनेक ठिकाणी गुरुचरित्र वाचले जाते. दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज यांच्या गुरुलीलामृत या ग्रंथांचे पारायण करणे शुभ मानले गेले आहे. जाणून घेऊया...

दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत

यंदा गुरुवारी दत्त जयंती येणे अनेकार्थाने शुभ मानले जाते. ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तगुरूंची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते. दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज असंख्यांचे श्रद्धास्थान आहेत. स्वामींची महती सांगावी तेवढी कमीच आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी या कालातीत शुभाशिर्वादावर विश्वास असणारे लाखो भाविक स्वामी चरणी लीन होत असतात. निर्मळ भक्ती आणि मनातील प्रामाणिक भाव स्वामींना हवे असते. पूर्ण समर्पणाने विश्वासाने व श्रद्धेने स्वामी सेवा करावी, असे म्हटले जाते. 

दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी

गुरुलीलामृत ग्रंथ पठण करा ॥ How To Do Recite Shree Swami Samarth Gurulilamrut On Datta Jayanti 2025 ॥

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथसंपदा, स्तोत्रे, श्लोक, मंत्र असून, भाविक याचा लाभ घेत असतात. श्री गुरुलीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत. याचे नित्यनेमाने पारायण केल्यास तत्काळ फळ मिळू शकते, अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे तसे अनुभवही आहेत. स्वामींच्या लीलांचे वर्णन ज्या ग्रंथात आले आहे, तो म्हणजे श्री गुरुलीलामृत.

श्री स्वामी समर्थ महाराजांचा गुरुलीलामृत पारायणाची योग्य पद्धत ॥ Shree Swami Samarth Gurulilamrut Significance॥

श्रीगुरुलीलामृत या पोथीत जसे सांगितले असेल, तसे अध्याय पठणास प्रारंभ करावा. तत्पूर्वी, एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षता, फुले वाहावीत. पोथीला धूप, दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी. दुपारच्या भोजनापूर्वी गुरुलीलामृताचे पारायण करावे. श्रीगुरुलीलामृत पारायण शक्यतो सकाळी करावे. सकाळीच, स्नानादि कार्ये झाल्यावर नित्याची देवपूजा करावी. गुरुलीलामृत पारायणाची वेळ निश्चित करावी.

गुरुलीलामृत पारायणाची तयारी कशी कराल? 

शुद्ध वस्त्रे नेसावी. मस्तकी गंध लावावे. श्रीगुरुलीलामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावे. त्यावर श्री स्वामींची तसबीर, मूर्ती ठेवावी. रांगोळी काढावी. समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी.  कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. नमस्कार करावा आणि पारायणाची सुरुवात करावी. आसनावर बसून श्री स्वामींचे स्मरण करून पोथीला वंदन करावे. पारायण सुरू करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. 

गुरुलीलामृत पारायणासाठी संकल्प अवश्य करावा ॥ Shree Swami Samarth Gurulilamrut Parayan Proper Method॥

उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी किंवा कोणत्या कारणास्तव हे पारायण करीत आहोत, हे स्वामींना सांगून संकल्प करावा. तो उद्देश सफल व्हावा, म्हणून श्रींची प्रार्थना करावी. पारायण करताना कोणतीही समस्या, अडचण येऊ नये, सप्ताह निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी स्वामींना मनापासून प्रार्थना करावी. हे झाल्यावर पळीभर हातात घेतलेले पाणी ताम्हनात सोडावे. निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावे.

गुरुलीलामृत पारायण झाल्यावर काय करावे?

गुरुलीलामृत पारायण झाल्यावर पोथीला धूप, दीप दाखवावे. त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. वाचन झाल्यावर स्वामींना गंध, हळद-कुंकू आणि फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. प्रसाद मनोभावे ग्रहण करावा. पारायण झाल्यावर तारक मंत्र म्हणावा.

गुरुलीलामृत पारायण नेमके कोणत्या गोष्टींचे भान ठेवावे? ॥ Shree Swami Samarth Gurulilamrut Parayan Rules॥

सात दिवस अखंड दीप तेवत ठेवावा. एकभुक्त राहावे. ब्रह्मचर्य व्रत पाळावे. पारायण सांगतेप्रित्यर्थ यथाशक्ति दान करावे. श्रीगुरुलीलामृत पारायण करताना वाचन करताना मन एकाग्र ठेवावे. इतर विचारांना दूर ठेवावे. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. पारायण काळात सदाचाराने राहावे. स्वामींचे नामस्मरण करावे. त्यांच्या चरित्रकथांचा आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. वरील नियम हे सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यात बदल करू शकता.

श्रीगुरुलीलामृत पारायण केल्यावर काय लाभ होतो? ॥ Shree Swami Samarth Gurulilamrut Parayan Falshruti॥

श्रीगुरुलीलामृत पारायणामुळे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळते. सकारात्मक विचारसरणी विकसित होते. भक्ती, श्रद्धा, आत्मविश्वास वाढतो. उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. संकटांवर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात. कुटुंबात सुख-समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो. समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता विकसित होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होते, असे म्हटले जाते. 

- श्री स्वामी समर्थ यांच्या गुरुलीलामृत ग्रंथात ज्या पद्धतीने सप्ताह पारायणाची पद्धत सांगितली आहे, त्या पद्धतीने सप्ताह पारायण करावे. सात दिवस शक्य नसेल, तर तीन दिवसीय पद्धतीने पारायण करावे. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

श्रीगुरुलीलामृत सप्ताह पारायण पद्धती 

पहिला दिवस: १ ते ३ अध्याय (३८१ ओव्या)

दुसरा दिवस: ४ ते ६ अध्याय (४२९ ओव्या)

तिसरा दिवस: ७ ते १० अध्याय (३५१ ओव्या)

चौथा दिवस: ११ ते १३ अध्याय (३५० ओव्या)

पाचवा दिवस: १४ ते १६ अध्याय (३५३ ओव्या) 

सहावा दिवस: १७ ते १९ अध्याय (३१४ ओव्या)

सातवा दिवस: २० व २१ अध्याय (३५८ ओव्या) या प्रमाणे प्रत्येक दिवशी अध्याय वाचावेत.

श्रीगुरुलीलामृत त्रि-दिवसीय पारायण पद्धती

पहिला दिवस: १ ते ७ अध्याय (९०५ ओव्या) 

दुसरा दिवस: ८ ते १५ अध्याय (८८३ ओव्या) 

तिसरा दिवस: १६ ते २१ अध्याय (७४८ ओव्या) या प्रमाणे प्रत्येक दिवशी अध्याय वाचावेत.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

॥ श्री स्वामी समर्थ ॥

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

 

Web Title : दत्त जयंती २०२५: स्वामी के आशीर्वाद के लिए गुरुलीलामृत पारायण कैसे करें।

Web Summary : दत्त जयंती पर, भक्त श्री स्वामी समर्थ गुरुलीलामृत का पाठ करके आशीर्वाद प्राप्त कर सकते हैं। भक्तिपूर्वक पाठ करने से शांति मिलती है, इच्छाएं पूरी होती हैं और बाधाएं दूर होती हैं, जिससे आध्यात्मिक विकास और खुशी बढ़ती है। अधिकतम लाभ के लिए निर्धारित विधियों का पालन करें।

Web Title : Datta Jayanti 2025: How to do Gurulilamrut Parayan for Swami's blessings.

Web Summary : On Datta Jayanti, devotees can gain blessings by reciting Shree Swami Samarth Gurulilamrut. Reciting with devotion brings peace, fulfills wishes, and removes obstacles, fostering spiritual growth and happiness. Follow prescribed methods for maximum benefit.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.