गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
By देवेश फडके | Updated: November 23, 2025 22:03 IST2025-11-23T22:01:21+5:302025-11-23T22:03:48+5:30
Datta Jayanti 2025 Shree Swami Samarth Seva: दत्त जयंती निमित्ताने ११ दिवसांचा स्वामी सेवेचा संकल्प करा. मनापासून सेवा करा. स्वामींवर विश्वास ठेवा. जे शुभ तेच घडेल.

गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
Datta Jayanti 2025 Shree Swami Samarth Seva: मार्गशीर्ष महिन्यातील अनेक दिवसांपैकी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे पौर्णिमा. म र्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्त जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते, असे म्हटले जाते. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचे अवतार मानले जातात. त्यामुळे दत्त जयंतीच्या निमित्ताने ११ दिवसांचा स्वामी सेवेचा संकल्प घ्यावा अन् मनापासून सेवा करावी, असे सांगितले जाते.
मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तगुरूंची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते. प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी दत्त जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदा गुरुवारी दत्त जयंती येणे अनेकार्थाने शुभ मानले जाते. ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंती आहे. स्वामीभक्त विविध प्रकारची सेवा मनोभावे करतात. या सेवेचे शुभ फळ निश्चित मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे. इच्छापूर्तीसाठी दत्त जयंतीच्या निमित्ताने स्वामींची सेवा अवश्य करावी, असे सांगितले जाते. निर्मळ भक्ती आणि मनातील प्रामाणिक भाव स्वामींना हवे असते. पूर्ण समर्पणाने विश्वासाने व श्रद्धेने स्वामी सेवा करावी, असे म्हटले जाते.
११ दिवस कशी सेवा करावी?
- अखंड नामस्मरण किंवा संकल्पित नामस्मरण
- श्री स्वामी कृपा तारक मंत्र (रोज ११, २१, ५१, १०८ जमेल तसा)
- श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण
- श्री आनंदनाथ महाराज ह्यांचे श्री गुरुस्तवन स्तोत्र पठण
- दत्त बावन्नी
- मानसपूजा
- स्वामी महाराजाच्या देवघरातील मूर्ती किंवा पादुकांना पूजा अभिषेक आरती नेवेद्य
वरील पैकी किंवा आपल्याला जे सुचेल त्याप्रमाणे आपण एखादी साधना ११ दिवस संकल्प करून करू शकतो. त्याचसोबत रोज अन्नदान करू शकतो. संकल्प करून केलेली स्वामी सेवा महाराजांच्या ठायी विश्वास द्विगुणित करते, असे म्हटले जाते. साधनेतून तावून सुलाखून निघालेला भक्त महाराजांच्या समीप जातो, त्याला गुरु चरणांच्या शिवाय काहीही दिसत नाही. आपल्याकडून महाराजांना नेमके काय अभिप्रेत आहे ते समोर येते. स्वामी म्हणजे स्वाः मी... ह्या साधनेतून आपण आपल्यातील मी ला म्हणजेच अहंकाराला कायमची तिलांजली देण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले जाते.
जितकी शक्य असेल, तितकी सेवा करावी
११ दिवस स्वामी सेवा करायची असेल, तर अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा. मनातील इच्छा, भाव सांगावा. नेमकी काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे, हे मनाशी पक्के करावे. ही सेवा ही सुरुवात आहे, असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे ही सेवा सुरू ठेवावी. अनेकदा धकाधकीच्या काळात अशी सेवा करणे शक्य होत नाही. अशा वेळी जितकी शक्य असेल, तितकी सेवा करावी. या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्रांचे जप, स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करावे. एकदा संकल्प केला की, त्यात खंड पडू देऊ नये. अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते. त्यासाठी सातत्य हवे. मनापासून सेवा करावी. एकदा संकल्प केला की, तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे. शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे. जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. तुम्ही आता करत असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी.
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥