दत्त जयंती: गुरुचरित्राचे पारायण करता? आवर्जून म्हणा ‘आरती श्रीगुरुचरित्राची’; लाभेल मनःशांती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 15:10 IST2024-12-03T15:10:01+5:302024-12-03T15:10:56+5:30

Shree Guru Charitra Aarti: दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी आवर्जून गुरुचरित्राचे पारायण केले जाते. पारायण झाल्यानंतर गुरुचरित्राची आरती म्हणावी.

datta jayanti 2024 should recite the shri guru charitra aarti after gurucharitra parayan | दत्त जयंती: गुरुचरित्राचे पारायण करता? आवर्जून म्हणा ‘आरती श्रीगुरुचरित्राची’; लाभेल मनःशांती!

दत्त जयंती: गुरुचरित्राचे पारायण करता? आवर्जून म्हणा ‘आरती श्रीगुरुचरित्राची’; लाभेल मनःशांती!

Shree Guru Charitra Aarti: मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. १४ डिसेंबर २०२४ रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी ०४ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होत असून, १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०२ वाजून ३१ मिनिटांनी समाप्त होत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक संप्रदायांतील साधक उपास्य दैवत मानतात. भक्तीभावाला, परमार्थाला, आत्मचिंतनाला पुरक अशा मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीचा उत्सव हे मुख्य आकर्षण असते. 

दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे पारायण केले जाते. श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने  आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. गुरुचरित्र पारायण करताना काही नियम पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. 

श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलाला आहे. या गुरुचरित्र ग्रंथाची महती आणि महात्म्य सर्वोच्च आहे. तसेच गुरुचरित्राच्या पारायणामुळे अनेकांना अद्भूत अनुभव आल्याचे सांगितले जाते. गुरुचरित्र पारायण करताना त्या दिवसाचे अध्याय वाचून झाल्यावर आरती करावी, असे सांगितले जाते. गुरुचरित्र पारायण झाल्यावर दत्तगुरूंची आरती म्हटली जाते. परंतु, त्याबरोबरच श्रीगुरुचरित्राची म्हणावी, असे म्हटले जाते.

आरती दत्तगुरुंची

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैची कळेल ही मात ॥
पराही परतली तेथे कैचा हा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगे प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

आरती श्रीगुरुचरित्राची

मूर्तित्रयगुणसारं निर्गुणविस्तारं ।
षड्गुणपारावारं दुर्जनसंहारं ।
भक्तिप्रियदातारं कल्पितपरिपारं ।
मुनिजनमानसहारं निगमागमसारं ॥ १ ॥ 
जय देव जय देव वंदे गुरुचरितं । 
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥

श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यं ।
नरहरि भारति लीला ब्रह्मादिस्तुत्यं ।
कलिमलदाहक मंगलदायक  फलनित्यं ।
पारायण देहि मे पुस्तकमपि चित्यं ॥ २ ॥ 
जय देव जय देव वंदे गुरुचरितं । 
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥

त्वद्रतलीलासारं श्रृतिसकलाकारं ।
कांडत्रयविस्तारं प्रत्ययलघुकारं ।
कल्पद्रुमफलभारं कल्पित्तदातारं ।
पठणामृतरसधारं भवभयपरिहारं ॥ ३ ॥
जय देव जय देव वंदे गुरुचरितं । 
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥

अगाध श्रीगुरुकरुणं भूइच्छातरणं ।
ज्ञानामृतरसभरणं जडजीवोद्धारणं ।
भक्त्या कृतमपि स्मरणं तापत्रयहरणं ।
नियमाराधित महिमा मोक्षश्रीवर्णं ॥ ४ ॥
जय देव जय देव वंदे गुरुचरितं । 
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥

श्रीगुरुकरुणाकृत्यं सिद्धेश्र्वरगीतं ।
शारदगंगाधरसुतमथितं नवनीतं ।
भाविकभक्तप्रियकर कृतलोककदतं ।
तद्रेतशेषं वांछित सखा हरिहरचित्तं ॥ ५ ॥
जय देव जय देव वंदे गुरुचरितं । 
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥

|| श्री गुरुदेव दत्त ||

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
 

Web Title: datta jayanti 2024 should recite the shri guru charitra aarti after gurucharitra parayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.