Datta Jayanti 2023: राजा रवी वर्मा प्रेसचे हे दुर्मिळ चित्र, ज्यात सामावली आहे संपूर्ण दत्त जन्म कथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 10:12 AM2023-12-25T10:12:28+5:302023-12-25T10:12:40+5:30

Datta Jayanti 2023: कलाकार आपल्या प्रतिभेतून व्यक्त होत असतो, हे साधेसे वाटणारे चित्र, पण त्यात दडलाय फार मोठा गर्भितार्थ!

Datta Jayanti 2023: A rare picture from Raja Ravi Verma Press, containing the entire Datta birth story! | Datta Jayanti 2023: राजा रवी वर्मा प्रेसचे हे दुर्मिळ चित्र, ज्यात सामावली आहे संपूर्ण दत्त जन्म कथा!

Datta Jayanti 2023: राजा रवी वर्मा प्रेसचे हे दुर्मिळ चित्र, ज्यात सामावली आहे संपूर्ण दत्त जन्म कथा!

>> ज्योत्स्ना गाडगीळ 

राजा रवी वर्मा प्रेसचे श्री दत्त जन्माचे दुर्मिळ चित्र सकाळीच नजरेस पडले. एका चित्रात संपूर्ण दत्त जन्माची कथा सामावली आहे. 

अनसूयेच्या सत्त्वाची परीक्षा पाहायला त्रिदेवींनी आपले नवरे पाठवले, तिने आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यावर तीनही देवांना बाळं करून इच्छाभोजन दिले. त्यामुळे अनसूयेचे सत्त्व राखले गेले, अतिथी धर्म पाळला गेला आणि मातृत्त्व लाभले. मात्र आपली खेळी आपल्यावर उलटल्याचे पाहून त्रिदेवी अनसूयेला शरण आल्या आणि आमचे पती आम्हाला परत कर म्हणाल्या. तेव्हा घेऊन जा तुम्ही तुमचा पती, हे अनसूया माता सांगत असतानाचा हा चितारलेला क्षण!

असूया शून्य अनसूया, अशी सत्त्वशील अनसूयेचे देहबोली. ऋषीपत्नी म्हणून श्वेत वस्त्र नेसलेल्या अनुसूयेच्या चेहऱ्यावर तीनही बाळांना जोजवून झाल्यानंतरचा मातृत्त्वाचा संतुष्ट भाव खुलून दिसतोय. जगाचा ताप हरण करणारे त्रिदेव बाल रुपात आल्यावर निश्चिन्तपणे झोपी गेलेत. आई जवळ असताना कसली काळजी! बरीच वर्षं वाट पाहूनही जे सुख हुलकावणी देत होते, ते सुख तिपटीने पदरात पडल्याचा सोहळा अनसूयेने सुंदर पाळणा बांधून आणि सजावट करून साजरा केला आहे. अत्री ऋषींचा आश्रम असल्याने पायाशी व्याघ्रजीन अंथरले आहे. आणि या तीन विश्वसुंदऱ्या आपल्या फजितीने खजील होऊन आपला नवरा कोणता हे ओळखण्यात मग्न आहेत.

पाठमोरी उभी असलेली भरजरीत वस्त्र परिधान केलेली अलंकारमंडित लक्ष्मी असावी. बाजूने डोकावणारी लाल साडीतली सावित्री आणि हात दुमडून कुतूहलाने पाहणारी पार्वती असावी. सुखी संसाराचे तेज, सौष्ठव तिघींच्या हातावरून आणि गौरवर्णावरून दिसतेय. एवढे सगळे सुख असूनही अनसूया मातेसमोर तिघी निस्तेज झाल्या आहेत.

तिघी आपापल्या जागी श्रेष्ठ, तरी त्यांना आपल्यापेक्षा कोणी वरचढ असेल ही कल्पना सहन न झाल्याने त्यांनी पतीला तिचे शीलहरण करण्यासाठी पाठवले. त्रिदेवांना अनसूयेचे सामर्थ्य माहीत होते, पण या तिघींचा गर्वहरण करण्यासाठी तिघांनी जोखीम पत्करली आणि अत्री ऋषी स्नानाला गेल्याची वेळ साधून, वेषांतर करून 'आई, इच्छाभोजन  दे, पण विवस्त्र होऊन!' अशी मागणी केली. 'आई' अशी हाक ऐकल्याने अनसूयेला वात्सल्याचा पान्हा फुटला. तिघांना बालरूप केले. भोजन दिले आणि पाळण्यात जोजवले. 

बाळं सगळीच गोड, गोंडस आणि एकसारखी. आपला पती नक्की कोणता, हे ओळखता न आल्याने तिघींनी शरणागती पत्करली आणि अनसूया मातेने तीनही देवांना पूर्ववत केले. तिचा पाळणा मात्र रिकामा झाला. अत्री ऋषी परत आल्यावर त्यांना हकीकत कळली. त्रिदेवांनी सपत्नीक उभयतांची क्षमा मागितली आणि आम्ही तुमच्याच पोटी जन्माला येऊ असे आश्वासन दिले. तो आशीर्वाद फळास आला आणि मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला म्हणजे आजच्याच दिवशी हे त्रिदेव दुर्वास ऋषी, दत्त गुरु आणि  चंद्र अशा त्रिगुणात्मक रुपात प्रगट झाले. 

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!

सौजन्य : Dinanath Dalal (In Marathi: दीनानाथ दलाल)

Web Title: Datta Jayanti 2023: A rare picture from Raja Ravi Verma Press, containing the entire Datta birth story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.