सज्जनगडावर अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात अशा पद्धतीने केली जाते 'दासनवमी!'

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: March 7, 2021 08:00 AM2021-03-07T08:00:00+5:302021-03-07T02:30:06+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये समर्थांनी केलेले जनजागृतीचे कार्य अनन्यसाधारण आहे. दासनवमीच्या दिवशीच नव्हे तर रोज निदान एक तरी श्रीदासबोधाचा समास प्रत्येकाने वेळात वेळ काढून अवश्य वाचावा. 

'Dasanavami!' Is performed in a very devotional atmosphere at Sajjangad. | सज्जनगडावर अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात अशा पद्धतीने केली जाते 'दासनवमी!'

सज्जनगडावर अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात अशा पद्धतीने केली जाते 'दासनवमी!'

googlenewsNext

माघ कृष्ण नवमीला 'दासनवमी' असे म्हणतात. यंदा तारखेनुसार ७ मार्च आणि तिथीनुसार आजचाच तो दिवस! सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर या तिथीला श्रीसमर्थ रामदासस्वामींची पुण्यतिथी अतिशय भक्तिपूर्वक साजरी केली जाते. 'सज्जनगडवारी' म्हणून प्रतिवर्षी वारी करणारे महाराष्ट्रातील असंख्य समर्थभक्त या दिवशी गडावर येतात. मोठ्या श्रद्धेने समर्थांच्या समाधीचे दर्शन घेतात. त्यांचे स्मरण करतात. याबाबत सविस्तर माहिती ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी धर्मबोध ग्रंथात दिली आहे.

मुळात वारीचा हा सोहळा माघ कृष्ण प्रतिपदेपासून दशीपर्यंत एकूण दहा दिवस चालतो. ह्यामध्ये ज्याला जेव्हा शक्य होईल, त्याप्रमाणे मंडळी गडवार दर्शनासाठी येतात. माघ कृष्ण पंचमीला समर्थांच्या सर्व शिष्यांच्या परंपरेतील शिष्य, महंत, अनुयायी आपापल्या मठांच्या पालख्यांसह साताऱ्यात येऊन दाखल होतात. त्यांची शहरातून मिरवणूक निघते. राजवाड्यासमोर या मिरवणुकीवर फुले गुलाल उधळून स्वागत केले जाते. नवमीच्या दिवशी गडावरील रामदासी मठाधीश भिक्षा मागतात. त्यांना भक्तमंडळींकडून भक्तिप्रेमपूर्वक भिक्षा घातली जाते. याच दिवशी म्हणजे नवमीला निर्वाणाचे कीर्तन केले जाते. दहा दिवस गडावर येणाऱ्या सर्व दर्शनार्थींसाठी महाप्रसादाची चोख व्यवस्था केली जाते. 

समर्थ रामदास स्वामींविषयीची सर्व विश्वसनीय माहिती आज आपल्याला त्यांच्या विविध चरित्रग्रंथरूपात उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये समर्थांनी केलेले जनजागृतीचे कार्य अनन्यसाधारण आहे. जीवनात पावलोपावली दक्ष राहून स्वत:ची आणि समाजाची उन्नती कशी साधता येईल, प्रपंचाबरोबर परमार्थ कसा करता येईल, हे विचारधन समर्थांनी श्रीदासबोधातून आपल्या पुढील पिढ्यांसाठी भरभरून राखून ठेवले आहे, हे आपले केवढे महाभाग्य! म्हणूनच केवळ दासनवमीच्या दिवशीच नव्हे तर रोज निदान एक तरी श्रीदासबोधाचा समास प्रत्येकाने वेळात वेळ काढून अवश्य वाचावा. 

श्रीमनाचे श्लोकही सतत मनन पठनात असले, तर तेही उत्तमच. हल्ली या ग्रंथाच्या ध्वनिफिती उपलब्ध आहेत. त्यादेखील ऐकता येतील. रोज अकरा श्लोक म्हणून मनाला बोध घ्यावा. तसेच फुल ना फुलाची पाकळी म्हणून सज्जनगडावर यथाशक्ती दान करावे. 

Web Title: 'Dasanavami!' Is performed in a very devotional atmosphere at Sajjangad.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.