चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:30 IST2025-08-05T11:22:31+5:302025-08-05T11:30:13+5:30

Chaturmas First Budh Pradosh August 2025: बुध प्रदोष म्हणजे नेमके काय? सोपा व्रत विधी, मान्यता, प्रभावी मंत्र आणि महत्त्व जाणून घ्या...

chaturmas first budh pradosh august 2025 know about date significance vrat puja vidhi lord shiva and budh mantra | चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!

चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!

Chaturmas First Budh Pradosh August 2025: प्रत्येक महिन्यात त्रयोदशीला प्रदोष तिथी असते. या तिथीला शंकराच्या पूजनासाठी प्रदोष व्रत केले जाते. श्रावण महिन्यातील प्रदोष व्रत ०६ ऑगस्ट २०२५ रोजी आहे. देवशयनी एकादशीला श्रीविष्णू योगनिद्रेत जातात. त्यानंतर कार्तिकी एकादशीपर्यंत या सृष्टीचे पालन करण्याची जबाबदारी महादेव शिवशंकरांवर असते, असे मानले जाते. त्यामुळे श्रावण महिन्यात केलेले शिवपूजन अतिशय पुण्यदायी मानले जाते. बुध प्रदोष म्हणजे काय? या दिवशी व्रत कसे करावे? जाणून घ्या...

व्रत-वैकल्यांची रेलचेल असणारा चातुर्मासाचा काळ सुरू आहे. बुधवारी प्रदोष आला की, त्याला बुध प्रदोष म्हटले जाते. प्रदोष हे शंकराला समर्पित व्रत असून, यामुळे मनोकामना पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात सुख, समृद्धी वृद्धी होऊ शकते. यासह अनेकविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. तसेच या दिवशी केलेल्या व्रतामुळे कुंडलीतील बुध ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, असे म्हटले जाते.

बुध प्रदोष व्रत कसे कराल?

प्रदोष व्रत हे प्रदोष काळी म्हणजेच सायंकाळी दिवेलागणीला केले जाते. प्रदोष तिथीला शंकराचे पूजन केले जाते. काही पौराणिक उल्लेखानुसार, प्रदोष काळात शिव आणि पार्वतीची पूजा केल्याने संकटे दूर होऊ शकतात. प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला, दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. मनोभावे प्रसाद ग्रहण करावा. यानंतर महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जात आहे.

बुध प्रदोष व्रत दिनी म्हणायचे प्रभावी मंत्र

बुध हा सौम्य व कलाप्रेमी ग्रह आहे. बुद्धी, ज्ञान, शिक्षण, तत्वज्ञान, अध्यात्मिक ज्ञान, धार्मिक अभ्यास आणि शिक्षण यांचा कारक मानल्या गेलेल्या बुधाचे मंत्र लाभदायक ठरतात. ॥ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः॥, ॥ ॐ बुं बुधाय नम:॥, हे बुधाचे बीज मंत्र आहेत. तर, ॥ प्रियंगु कलिका श्यामं रूपेणाप्रतिमं बुधम। सौम्यं सौम्य गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्॥, हा बुधाचा नवग्रह स्तोत्रामधील मंत्र आहे. याशिवाय, ॥ॐ सौम्य-रूपाय विद्महे वाणेशाय धीमहि तन्नो सौम्यः प्रचोदयात् ॥, हा बुधाचा गायत्री मंत्र आहे. कुंडलीत बुध कमकुवत असेल तर प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. बुधवार हा गणपतीशी संबंधित वारदेखील मानला जातो. त्यामुळे या दिवशी गणपती मंदिरात जाऊन विशेष पूजा, बुधवारचे व्रत करावे. हिरव्या रंगांचा समावेश असलेल्या वस्तू तसेच बुधाशी संबंधित असलेल्या वस्तूंचे दान करावे. याशिवाय शंकराचे पूजन लाभदायक मानले गेले आहे. तज्ज्ञांच्या योग्य मार्गदर्शनानंतर बुधाचे रत्न पाचू परिधान केले जाऊ शकते. 

महादेवांचे मंत्र 

प्रदोष व्रत काळात महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदायी ठरू शकते, असे म्हटले जाते.  'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. 

॥ ॐ नमः शिवाय ॥

॥ हर हर महादेव ॥

 

Web Title: chaturmas first budh pradosh august 2025 know about date significance vrat puja vidhi lord shiva and budh mantra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.