Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार आदर्श पत्नी कोण? वाचा 'हा' श्लोक आणि जाणून घ्या लक्षणं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:29 IST2025-04-16T15:28:50+5:302025-04-16T15:29:11+5:30
Chanakyaniti: संसार सुखाचा व्हावा यासाठी स्त्री आदर्श पत्नी, आदर्श आई, आदर्श सून व्हावी लागते, त्यासाठी तिला आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या कसोट्या पार कराव्या लागतात.

Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार आदर्श पत्नी कोण? वाचा 'हा' श्लोक आणि जाणून घ्या लक्षणं!
नवरा बायकोचे परस्परांशी नाते कसे आहे, यावर त्यांची पुढची पिढी कशी निपजणार हे कळते. त्यांचे आपापसात वैर असेल तर मुलं तापट, उद्धट, स्वार्थी होतात. त्यांच्या पालनपोषणात दोघांची सारखीच जबाबदारी असते. मात्र जगाच्या तुलनेत बाळाचे आईशी नाते नऊ महिने अधिक दृढ असते. म्हणून मुलांच्या प्रति तिची जबाबदारीही काकणभर अधिक असते. आई चांगली असेल तर मुलांचे संगोपन यथोचित होते आणि घराला घरपण येते, अर्थात त्यात नवऱ्याची साथ तेवढीच महत्त्वाची आहे!.
याच विषयाला धरून आचार्य चाणक्य यांनी आदर्श पत्नी कशी असावी याची व्याख्या एका श्लोकातून मांडली आहे. त्यानुसार वागणारी स्त्री आदर्श स्त्री म्हटली जाते आणि भारताच्या इतिहासात डोकावले तर अशा अनेक आदर्श आणि कर्तृत्त्ववान स्त्रिया आपल्याला आढळतील. तूर्तास आपण आचार्य चाणक्य यांनी दिलेला श्लोक जाणून घेऊ.
आदर्श पत्नीचा श्लोक
“साभार्या या शुचिदक्षा सा भार्या या पतिव्रता।
सा भार्या या पतिप्रीता सा भार्या सत्यवादिनी।।”
या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात की आदर्श पत्नी ती असते जी विचार, वाणी आणि कृतीने शुद्ध असते. जिचे वर्तन चांगले असतेच पण ती तिच्या सासरच्या घरालाही स्वतःचे घर मानते, कुटुंबाला माहेरच्या घरासारखे सांधून ठेवते. अशा महिलांना आदर्श पत्नी, आदर्श सून, आदर्श आई म्हटले जाते. अशी स्त्री प्रत्येक नात्यात आदर्शवत वागते.
मनाने शुद्ध स्त्री कोणाला म्हणावे?
अशी स्त्री, जिला दुसऱ्याला फसवणे, खोटे बोलणे जमत नाही. ती नेहमी जे असेल ते प्रामाणिकपणे सांगते. ती आदराने बोलते. घरातल्या प्रत्येक सदस्याला आपले मानून नात्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करते.
वाचेने शुद्ध स्त्री कोणाला म्हणावे?
चाणक्य नीतिनुसार, ज्या पत्नीचे बोलणे कडू आहे पण त्यामागील भावना चांगली आहे. अशी स्त्री कठोर शब्दप्रयोग करत असेल तर चालेल पण अश्लील अश्लाघ्य बोलत नसेल तर, घरात वाद विवाद टाळत असेल, कोणाला उलट बोलत नसेल तर ती स्त्री वाचेने शुद्ध आहे असे मानावे.
कृतीने शुद्ध स्त्री कोणाला म्हणावे?
आचार्य चाणक्य यांच्या मते, राग नेहमीच काम बिघडवतो. रागाच्या भरात माणसाला बरोबर आणि चूक यातील फरकही समजत नाही. अशा परिस्थितीत तो फक्त इतरांचे नुकसान करतो. पत्नी सुद्धा क्षुल्लक कारणावरून रागवत असेल आणि घराची शांतता भंग करत असेल तर ती कधीही आदर्श पत्नी ठरू शकत नाही, याउलट जी स्त्री आपल्या नवऱ्याजवळ राग व्यक्त करते मात्र घरच्यांच्या चुका पदरात घेऊन माफ करते, तिला कृतीनेही शुद्ध म्हणता येईल.
आचार्य चाणक्य यांनी इथे आदर्श पत्नी बद्दल जरी वक्तव्य केले असले तरी हेच नियम पुरुषांनाही लागू होतात असे म्हटले आहे. कारण स्त्री आणि पुरुष हे दोघेही संसार रथाची दोन चाकं आहेत, त्यांचे वर्तन चांगले असेल तरच संसार रथ सुरळीत चालेल आणि कुटुंबात आनंद आणि सौख्य नांदेल.