Chaitra Purnima 2025: इंग्रजी माध्यमातल्या मुलांना मराठी महिने आणि सण यांची ओळख करून देण्याची सोपी पद्धत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:27 IST2025-04-09T12:23:30+5:302025-04-09T12:27:23+5:30
Chaitra Purnima 2025: चैत्र पौर्णिमाच नाही, तर बाराही पौर्णिमांची आहे विशेष ओळख; तुम्ही वाचा आणि मुलांनाही शिकवा!

Chaitra Purnima 2025: इंग्रजी माध्यमातल्या मुलांना मराठी महिने आणि सण यांची ओळख करून देण्याची सोपी पद्धत!
सध्या सरसकट सगळी मुलं इंग्रजी माध्यामात शिकत आहेत. जागतिक स्पर्धा पाहता पालकांनी तसा निर्णय घेतला असेलही, मात्र मुलांवर मराठी भाषेचे, सणाचे, धर्माचे संस्कार कसे घालावेत, हा पालकांसमोर प्रश्न असतो. त्यासाठी घोकमपट्टी हा उपाय नाही, तर मुलांना सण-उत्सव, खाद्यपदार्थ अशा माध्यमातून या सर्व गोष्टींचा परिचय करून देता येईल. १२ एप्रिल २०२५ रोजी चैत्र पौर्णिमा(Chaitra Purnima 2025) आहे आणि त्याच तिथीला हनुमान जयंतीचा(Hanuman Jayanti 2025) उत्सवही साजरा केला जातो. तसेच येत्या ३० एप्रिल २०२५ रोजी अक्षय्य तृतीया(Akshaya Tritiya 2025) आहे. हे पाठोपाठ येणारे सण आणि त्यांची माहिती पुढच्या पिढीला देण्यासाठी पुढील माहिती उपयुक्त ठरेल!
अलीकडेच चैत्र गौरीचा एक व्हिडीओ पाहिला. ज्यात चैत्र गौरीसमोर बारा महिन्याच्या बारा पौर्णिमांचे वैशिष्ट्य सांगणारी चित्राकृती त्यात केलली होती. ती पाहता आपल्या मराठी महिन्यांचा आणि सणांचा मागोवा घेणे सोपे जाईल अशी ती रचना होती. त्यात महिन्याचे नाव आणि त्यासमोर त्या सणाचे प्रतीकात्मक रूप तयार केले होते. जसे की चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती असल्याने हनुमानाची गदाधारी मूर्ती, वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असल्याने भगवान बुद्ध यांची प्रतिमा अशा प्रकारे बारा महिन्यांचे सण प्रतीकात्मक रूपात तयार केले होते. मुलांना देखील पुढीलप्रमाणे सणांची यादी देऊन त्या त्या महिन्याचा सण चित्रातून रेखाटायला सांगितला, तयार आपोआप त्यांना सण, मराठी महिना आणि त्यानिमित्ताने केले जाणारे वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ यांची माहिती मिळेल आणि ती कायमस्वरूपी लक्षात राहील.
मराठी बारा महिने आणि बारा पौर्णिमेला येणारे सण :
चैत्र - हनुमान जयंती
वैशाख - बुद्ध पौर्णिमा
ज्येष्ठ - वट पौर्णिमा
आषाढ - गुरु पौर्णिमा
श्रावण - राखी पौर्णिमा
भाद्रपद - विष्णू पूजन
अश्विन - कोजागिरी पौर्णिमा
कार्तिक - त्रिपुरी पौर्णिमा
मार्गशीर्ष - दत्त जयंती
पौष - शाकंभरी पौर्णिमा
माघ - गंगास्नान
फाल्गुन - होळी
आहे की नाही शिकवणं आणि लक्षात ठेवणं सोपं?