Chaitra Navratri 2024: चैत्र शुद्ध अष्टमीला देवीची ओटी भरा आणि 'हा' पारंपरिक जोगवा मागा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 01:08 PM2024-04-15T13:08:48+5:302024-04-15T13:09:14+5:30

Chaitra Navratri 2024: अष्टमी ही देवीची जन्मतिथी मानली जाते, सध्या चैत्र नवरात्र सुरु असल्याने १६ एप्रिल रोजी चैत्र अष्टमीला देवीची ओटी भरून जोगवा मागा!

Chaitra Navratri 2024: Take blessings of Goddess on Chaitra Shuddha Ashtami and sing this traditional Jogava! | Chaitra Navratri 2024: चैत्र शुद्ध अष्टमीला देवीची ओटी भरा आणि 'हा' पारंपरिक जोगवा मागा!

Chaitra Navratri 2024: चैत्र शुद्ध अष्टमीला देवीची ओटी भरा आणि 'हा' पारंपरिक जोगवा मागा!

आई जगदंबेच्या विविध रूपांचा आणि शक्तीचा गौरव आपण नवरात्रीच्या निमित्ताने करतो. वर्षभरात तीन नवरात्री केल्या जातात. चैत्र, शारदीय आणि शाकंभरी नवरात्र. सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे आणि त्यात १६ एप्रिल रोजी अष्टमीचा दिवस आहे. ही तिथी चैत्र गौरीची जन्मतिथी म्हणून ओळखली जाते. त्यानिमित्त देवीचा जागर आपण करतोच, त्याबरोबरीने आज देवीची खणा नारळाने ओटी भरा आणि देवीची पूजा करून जोगवा सुद्धा मागा. 

पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे, हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संततीप्राप्त व्हावी, म्हणून तिची ओेटी भरली जाते. 'संततीप्राप्ती'च्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते. एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगलप्रसंगी खणा नारळाने देवीची ओटी भरली जाते. ती कशी भरतात ते पाहू. 

देवीची ओटी भरताना पाळावयाचे शास्त्र :

देवीची ओटी भरताना सहावारी साडी ऐवजी नऊवारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो. देवीला सहावारी ऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहे की ही देवीच्या नऊ रूपांची पूजा असते. तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते. देवीला अर्पण करावयाची साडी रेशमी असावी. देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशीम वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात. त्यावर खण व ओटीचे साहित्य ठेवावे. श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असे सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्याप्रती देवीचे आभार मानावेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी प्रार्थना करावी.

आईचा जोगवा अर्थात आईचा आशीर्वाद : 

अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह
महिषासूर मर्दना लागुनी ।
त्रिविध तापाची कराया झाडणी ।
भक्तांलागोनी पावसी निर्वाणी ॥१॥
आईचा जोगवा जोगवा मागेन । 
द्वैत सारुनी माळ मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन । 
भेदरहित वारीसी जाईन ॥२॥
नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा ।
करुनी पोटी मागेन ज्ञानपात्रा।
धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा । 
दंभ संसार सांडिन कुपात्रा ॥३॥
पूर्ण बोधाची घेईन परडी ।
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कुर्वंडी । 
अद्भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥
आता साजणी जाले मी नि:संग । 
विकल्प नवऱ्याचा सोडियला संग ।
कामक्रोध हे झोडियेले मांग ।
केला मोकळा मारग सुरंग ॥५॥
ऐसा जोगवा मागुनी ठेविला ।
जाउनी महाद्वारी नवस फेडिला ।
एकपणे जनार्दन देखिला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥

 

Web Title: Chaitra Navratri 2024: Take blessings of Goddess on Chaitra Shuddha Ashtami and sing this traditional Jogava!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.