Chaitra Amavasya 2022 : चैत्र अमावस्येला करा पितरांची पूजा आणि मिळवा अधिकाधिक पुण्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 12:00 IST2022-04-29T12:00:28+5:302022-04-29T12:00:49+5:30
Chaitra Amavasya 2022: दर्श अमावस्येला मात्र केवळ पितृ, मातृ आणि मातामह म्हणजे आईचे वडील यांचे श्राद्ध केले जाते. हे श्राद्ध एरव्ही तिथीप्रमाणे केल्या जाणाऱ्या श्राद्धासारखेच करावे.

Chaitra Amavasya 2022 : चैत्र अमावस्येला करा पितरांची पूजा आणि मिळवा अधिकाधिक पुण्य!
पाहता पाहता, इंग्रजी वर्षातील चार महिने आणि हिंदू नव वर्षातील पहिला महिना संपलासुद्धा! ३० एप्रिल रोजी चैत्र अमावस्या आहे. या तिथीला पर्वतिथी असेही म्हणतात. या तिथीवर कुठलेही धार्मिक कृत्य जसे की, विशिष्ट जप, तपाचरण, दान केले असता त्याचे अधिक फल मिळते, अशी श्रद्धा आहे. प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तिथीचा हा विशेष आहे. चैत्रासह सर्व महिन्यांच्या अमावस्येला श्राद्धकर्म करण्याची प्रथा आहे. त्यामुळे पितर तृप्त होतात अशी परंपरागत श्रद्धा आहे.
दर्श अमावस्येला मात्र केवळ पितृ, मातृ आणि मातामह म्हणजे आईचे वडील यांचे श्राद्ध केले जाते. हे श्राद्ध एरव्ही तिथीप्रमाणे केल्या जाणाऱ्या श्राद्धासारखेच करावे.
आपल्या वाडवडिलांचे कृतज्ञतेने स्मरण करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या वंशाची परंपरा ज्यांच्यामुळे सुरू झाली, त्यांना विस्मरणाच्या अडगळीत टाकणे हे असंस्कृतपणाचे द्योतक आहे. केवळ करायचे म्हणून उरकून टाकणे, ही श्राद्धाची कृती नाही. तर श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध!
खरोखरच श्रद्धापूर्वक, विधीवत होणे गरजेचे आहे. परंतु आजकाल घरी श्राद्धकर्मे होणे सर्वांनाच शक्य होत नाही. त्यांनी एखाद्या संस्थेला त्या व्यक्तीच्या नावे देणगी द्यावी. एखाद्या अडल्या नडल्या व्यक्तीला मदत करावी. अनाथाश्रम, वृद्धाश्रमातील मंडळींना आवश्यक बाबी पुरवाव्यात. तसेच कोणाची सेवा सुश्रुषा करावी. पूर्वजांना स्मरून असे कर्म करणे, हा देखील श्राद्धविधीच आहे. सद्यस्थितीत त्याच विधीची सर्वांना नितांत गरज आहे. म्हणून चैत्र अमावस्येचे औचित्य साधून आपणही `एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!'