अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे...

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: September 29, 2020 07:00 AM2020-09-29T07:00:00+5:302020-09-29T07:00:09+5:30

बाप्पा जेव्हा हिशोबाला बसतो, तेव्हा तो कोणालाही, कसलीच कमतरता पडू देत नाही. कशी, ते पहा.

Avaghya Deenanchya Natha, Bappa Morya Re ... | अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे...

अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे...

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ. 

एका गावात एक शिवमंदिर होते. मंदिराच्या गाभाऱ्यात शंकर-पार्वती आणि गाभाऱ्याबाहेरील सभागृहात गणपती बाप्पा. ते मंदिर एवढे सुरेख बांधले होते, की तिथल्या प्रसन्न वातावरणात देवदर्शनासाठी सदानकदा भक्तांची रिघ लागलेली असे. त्यामुळे साहजिकच भिकऱ्यांचीही संख्या जास्त असे. सर्व काही छान चालले होते. मात्र, मंदिराबाहेरील शेवटचा भिकारी नेहमी उपेक्षित राहत असे. त्याच्यापर्यंत दक्षिणा, दान पोहोचत नसे. 

पार्वती मातेला त्या एका भिकाऱ्याची दया आली. तिने महादेवांना विचारले, `तुम्ही सर्वांकडे कृपादृष्टीने पाहता, मग तो शेवटचा भिकारी उपेक्षित का? त्याच्या चरितार्थाची काहीतरी तजवीज करा ना.' 

हेही वाचा : गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा... शक्तीपेक्षा युक्ती वापरून जिंकायला शिकवणारा बाप्पा!

महादेव म्हणाले, 'अगं, त्याच्या नशीबात जेवढे आहे, तेवढेच त्याला मिळणार. त्याच्या भाग्योदयाचा काळ आला, की त्याचीही भरभराट होईल. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले-वाईट दिवस येत जात असतात.'

माता म्हणाली, 'तुम्हाला काय अशक्य आहे? तुम्ही ठरवलं, तर आताही त्याचे दिवस पालटतील. घ्या ना मनावर.'

पार्वती मातेने हट्टच धरला म्हटल्यावर महादेवांचा नाईलाज झाला. त्यांनी बाहेर पाटावर बसलेल्या गणूला बोलावून घेतले. हाकेसरशी गणोबा हात जोडून हजर झाले. महादेव म्हणाले, 

'गणोबा, अवघ्या दीनांच्या नाथा, अशी तुझी ख्याती आहे. तुझ्या आईचा हट्ट आता तूच पुरव. मंदिराबाहेर बसलेला शेवटचा भिकारी लखपती व्हावा अशी तिची इच्छा आहे. उद्या तू ती पूर्ण कर.' बाप्पाने होकार दिला आणि लगेचच कामाला लागले. 

हेही वाचा: देवाकडे काय मागितलं, तर सगळे प्रश्न सुटतील?... सांगताहेत सद्गुरू वामनराव पै

या त्रयींमधला संवाद दर्शनाला आलेल्या एका धनिकाच्या कानावर पडला. एक भिकारी रातोरात लखपती होणार कळल्यावर त्याने ताबडतोब भिकाऱ्याला गाठले आणि त्याच्याशी सौदा केला. `उद्या तुला मिळणारी सगळी भीक माझी. त्या मोबदल्यात मी तुला पाच हजार रुपए देतो.'

भिकारी पण वस्ताद. काही न करता पाच हजार मिळणार होते, ते निमूटपणे घ्यायचे सोडून त्याने धनिकाला अडवले आणि पाच ऐवजी पंचवीस हजार दिले, तर सौदा पक्का करतो म्हणाला. धनिकाने वीस हजारावर भिकाऱ्याची बोळवण केली. 

दुसऱ्या दिवशी धनिक, भिकाऱ्याच्या बाजूला फक्त कटोरा घेऊन बसायचा बाकी होता. एवढी त्याच्यावर पाळत ठेवून होता. भिकारी, वीस हजार मिळाल्याच्या आनंदात मनापासून देवाला आळवत होता. 

दिवस संपत आला, तरी कटोरीत शे-दीडशेच्या वर रक्कम गेली नाही. धनिकाने येऊन बाप्पाची भेट घेतली. म्हणाला, `बाप्पा, तुम्ही आई-बाबांना दिलेला शब्द विसरलात तर नाही ना? त्या भिकाऱ्याला लखपती करणार होतात, त्याचे काय झाले?'

एवढे शब्द कानावर पडताच, बाप्पाने सोंडेने धनिकाचे जोडलेले हात घट्ट धरले आणि बाप्पा म्हणाले, `मी दिलेला शब्द नेहमी पाळतो. तो भिकारी नक्की लखपती होणार. मी कुठून त्याला लखपती करणार? मी बुद्धीचा दाता आहे. परंतु, व्यवहारातही चोख आहे. काल रात्री मी तुम्हा दोघांच्या पाप-पुण्याचा हिशोब काढला आणि तुला वीस हजार रुपये देण्याची बुद्धी दिली. आता उर्वरित ऐंशी हजार रुपये ताबडतोब देऊ कर. तू गेल्या जन्मात त्याच्याकडून कर्ज घेतले होतेस. त्याची परतफेड करण्याची आज वेळ आली आहे. शब्द पूर्ण करणार असलास, तर हात सोडतो. 

धनिकाने घाबरून शब्द दिला आणि तासाभराच्या आत उर्वरित पैसे भिकाऱ्याला दिले. भिकारी एका रात्रीत लखपती झाला. म्हणून तर बाप्पाला म्हणतात ना,

तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता,
अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा।।

जेव्हा सगळं संपवून टाकावंसं वाटतं तेव्हा...; बांबू बियाणाची गोष्ट दाखवेल वाट

Web Title: Avaghya Deenanchya Natha, Bappa Morya Re ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.