When you want to end everything ...; bamboo seed to will teach you, don't give up | जेव्हा सगळं संपवून टाकावंसं वाटतं तेव्हा...; बांबू बियाणाची गोष्ट दाखवेल वाट

जेव्हा सगळं संपवून टाकावंसं वाटतं तेव्हा...; बांबू बियाणाची गोष्ट दाखवेल वाट

ठळक मुद्देतुमच्या मनात निराशात्मक विचार येत असतील, तर थांबा. स्वत:ला आणखी एक संधी द्या.प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतच राहतात आणि ते आलेही पाहिजेत. नाहीतर जगण्याला कारणच उरणार नाही.यश एका रात्रीत मिळत नाही आणि मिळालेच, तर टिकत नाही. 

ज्योत्स्ना गाडगीळ. 

एक क्षण असा येतो, जेव्हा वाटते, सगळे काही संपवून टाकावे, अगदी स्वत:लासुद्धा! 
एक क्षण असा येतो, जेव्हा वाटते, सगळ्या जबाबदाऱ्या झटकून दूर कुठेतरी निघून जावे!
एक क्षण असा येतो, जेव्हा वाटते, आयुष्यात जगण्यासाठी काहीच कारण उरलेले नाही!
हे आणि असे आणखीही निराशात्मक विचार तुमच्या मनात येत असतील, तर थांबा. स्वत:ला आणखी एक संधी द्या. आणखी थोडे प्रयत्न करा, पण अपयश स्वीकारून गर्भगळीत होऊ नका, सांगत आहेत, साधू गौर गोपाल दास.

प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतच राहतात आणि ते आलेही पाहिजेत. नाहीतर जगण्याला कारणच उरणार नाही. त्यामुळे, ही वेळ जर तुमच्या आयुष्यात अपयश घेऊन आली असेल, तर वाईट वाटून घेऊ नका, कारण अपयशातूनच यशाकडे जाणारा मार्ग दिसणार आहे. फक्त संयम ठेवा. योग्य वेळेची वाट बघा. यश एका रात्रीत मिळत नाही आणि मिळालेच, तर टिकत नाही. 

हेही वाचा: अर्जुनाने श्रीकृष्णावर दाखवला तसा आपला देवावर खरा विश्वास आहे का?... वाचा, एका छोट्या मुलीची गोष्ट

बीज अंकुरे अंकुरे 

एका व्यक्तीने आपल्या मोकळ्या खाजगी जागेत मोठी बाग फुलवायची, असे ठरवले. त्याने वेगवेगळे बियाणे आणले. जमिनीची उत्तम मशागत केली. पेरणी केली. सिंचन केले. रोज देखरेख केली. हळू हळू त्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. काही रोपट्यांची, काही झाडांची दिसामासाने वाढ होऊ लागली. त्याला फार आनंद झाला. 

प्रत्येक झुडुपाची व्यक्तीगत तपासणी करताना त्याच्या लक्षात आले, अजून 'बांबू'चे बियाणे रूजलेले दिसत नाही. ते वगळता, अन्य फळा-फुलांनी, वेलींनी बहरायला सुरुवात केली होती. मात्र, बांबूची जागा अद्याप मोकळी होती. त्या व्यक्तीला वाईट वाटले, परंतु त्याने प्रयत्न सोडले नाही. वर्षभरात बागेने छान आकार घेतला होता. 

दुसरे वर्ष उजाडले. बागेतील फुला-फळांनी तग धरली होती. वेलींनी सारा परिसर छान नटवला होता. विविधरंगी फुलांनी आणि त्यांच्या सुगंधाने बाग डवरली होती. फुलपाखरे, पक्षी, खारूताई बागेत बागडू लागली होती. मात्र, बांबूची अजूनही प्रगती नव्हती. 

तिसरे वर्ष गेले, चौथे वर्ष गेले. त्या सुंदर बागेकडे लोकही आकर्षित होऊ लागली. फुले-मुले आनंदात दिसत होती. ज्येष्ठ-श्रेष्ठ मोकळ्या वातावरणात फेरफटका मारत होते. निसर्गाच्या साक्षीने मित्र-मैत्रिणींच्या गप्पा रंगत होत्या. हे सर्व पाहताना त्या व्यक्तीचे मन भरून आले. मोकळ्या माळरानावर बगिचा फुलवून एवढ्या लोकांना आनंद देता आला, याचे त्याला समाधान वाटले. मात्र, अजूनही त्याचा व्यक्तीगत आनंद बांबूच्या बियाणात अडकला होता. 

पाचवे वर्ष आले. एक दिवस बागेची मशागत करताना, बांबूच्या बियाणातून छोटे छोटे अंकुर फुटलेले दिसले. बागेतील इतर फुल-झाडांच्या तुलनेत ते अतिशय लहान होते. परंतु, आपली मेहनत वाया गेली नाही, याचे त्या व्यक्तीला समाधान वाटले. रोजची मशागत सुरू होती. पाहता पाहता अवघ्या सहा महिन्यात बांबूच्या झाडांनी ६० फूट उंच झेप घेत, आकाशाच्या दिशेने वाटचाल केली आणि त्याच बांबूच्या झाडांसमोर बाकीची फुल-झाडे खुजी वाटू लागली. ते दृष्य पाहून ती व्यक्ती आनंदून गेली. तिची तपश्चर्या फळाला आली. 

कदाचित आपलीही अवस्था आता बांबूच्या बियाणासारखी असेल. जे रुजायला, वाढायला, झेपावायला वेळ घेत आहे. त्यासाठी लागणारा योग्य कालावधी पूर्ण झाला, की आपल्यालाही आकाशात उंच झेप घेता येईल. फक्त तोवर स्वत:ला पूर्णपणे विकसित करायला हवे, संयम बाळगायला हवा, दुसऱ्यांशी तुलना थांबवून स्वत:ला सिद्ध करायला हवे. 

लक्षात घ्या, लंडन हे शहर न्यूयॉर्कपेक्षा पाच तास पुढे आहे. याचा अर्थ लंडन प्रगतिपथावर आहे आणि न्यूयॉर्क मागे आहे असे नाही. तर, हा केवळ वेळेचा फरक आहे. दोघेही आपापल्या जागी प्रगतीपथावरच आहेत. त्याचप्रमाणे, प्रत्येक जण आपापल्या मार्गाने प्रगती करत असतो, प्रयत्न करत असतो. फक्त प्रत्येकाचा बहरण्याचा काळ वेगळा असतो. मात्र, प्रत्येकाची वेळ येते, हे नक्की!

हेही वाचा: Adhik Maas 2020: विष्णुसहस्रनामाची महतीः चोच दिली, तो चारा देतोच!
 

 

Web Title: When you want to end everything ...; bamboo seed to will teach you, don't give up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.