Astrology: केतूच्या कृपेने रावाचा रंक आणि रंकाचा राव होणे शक्य; त्यासाठी उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:17 IST2025-08-06T17:17:19+5:302025-08-06T17:17:57+5:30
Astrology: केतू हा केवळ कुंडलीतील ग्रह नाही तर मनुष्य जीवनावर प्रभाव टाकणारा आणि आत्मचिंतन करायला लावणारा ग्रह आहे, त्याचे पाठबळ मिळवण्याचे उपाय...

Astrology: केतूच्या कृपेने रावाचा रंक आणि रंकाचा राव होणे शक्य; त्यासाठी उपाय!
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
आपल्या सद्गुरूंवर आपली नितांत श्रद्धा तर हवीच, पण त्याहीपेक्षा अधिक हवा तो विश्वास! गुरु आपले कधी वाईट करतील का? विचारा प्रश्न स्वतःच्याच मनाला! आई आपली गुरु आहे, ती जेवणात विष कालवून देईल का? नाही! अगदी तसेच जे जे होत आहे ते त्यांच्या इच्छेने, ह्याची खुणगाठ एकदा मनात पक्की झाली, की आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे उत्तर आपले आपल्यालाच मिळत जाते. आत्मचिंतन हाही एक अध्यात्माचा भाग आहे. स्वतःच्या मनात डोकावले तरी सुद्धा अनेक प्रश्नांची उकल होते.
आज चंद्र केतुच्याच नक्षत्रात आहे. केतूला दिसत नाही, पण त्याच्याकडे मन आहे आणि स्पर्शज्ञान सुद्धा आहे. बाह्य जगातील कुठल्याच गोष्टीचा आस्वाद दृष्टी नसल्यामुळे घेता येत नाही, म्हणूनच मग स्वतःच्या आतमधील सुंदर जग आणि स्वतःच्या असीम व्यक्तिमत्वाची ओळख करून घेण्याचा केतू प्रयत्न करतो. ज्यांचा केतू चांगला असतो, त्यांना चांगले फळ मिळते.
स्वतःच्या आत पाहायला शिकवणारा हा केतू असामान्य ताकदीचा आहे. माणूस सगळ्यात दुर्लक्षित करतो ते आपला श्वास आणि आपल्या आतील आवाज. आपला आवाज सतत आपल्याला काहीतरी सांगू पाहत असतो, पण भौतिक सुखात मश्गुल झालेल्या आपल्यापर्यंत तो आवाज पोहोचतच नाही. कुठल्याही अगदी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर कोण देऊ शकते? तर आपले मन, पण त्याला न विचारता जगभर आपण विचारत बसतो. दहा लोक हजार गोष्टी सांगतात आणि आपण अजूनच बुचकळ्यात पडतो. पण आपल्या आतला आवाज आपल्याला नेहमीच वास्तव दाखवतो, आपल्या मनाने दिलेला कौल माणसाने नेहमीच ऐकावा कारण तो सौ टक्का खराच असतो.
केतू म्हणजे आंतरिक प्रेरणा, आंतरिक शक्ती, गूढता, अध्यात्मिक ज्ञान आणि अध्यात्मिक ज्ञानाचे दालन. शुभ केतू ध्यान धारणा, योग ह्याकडे आपले लक्ष्य केंद्रित करायला मदत करतो. ध्यानात आपल्या सद्गुरूंची गाठभेट करून देणारा हा केतूच तर आहे.
ज्यांचे मन सदैव अशांत किंवा बेचैन असते किंवा एखाद्या अनामिक भीतीने ग्रासलेले असते त्यांनी योग, साधना केली तर मन स्थिर होण्यास मदत होते. पत्रिकेत केतू बिघडलेला असेल तर भ्रमात राहणे, मन अशांत, उदास, भीती, निर्णयक्षमता नसणे, एकलकोंडेपणा, मानसिक तणाव आणि त्यातून निर्माण होणारे मनाचे आजार ह्या गोष्टीना व्यक्तीला सामोरे जावे लागते. केतू अध्यात्मिक प्रगतीचे मार्ग खुले करून देतो, पण त्या मार्गावर चालणे सोपे नसते. दुर्दम्य इच्छाशक्ती लागते. केतूचा परिणाम अनेकदा पायातील नसा आणि नर्व्हस सिस्टीम वर होताना दिसतो. केतू म्हणजे मंदिरावरील कळस! त्यामुळे शुभ असेल तर कीर्ती यश शिखरापर्यंत करिअर जाऊ शकते अन्यथा मानसिक ताणताणाव आणि आजार मागे लागतात.
केतूचा मुख्य गुण म्हणजे विरक्ती, धन भावात केतू असेल तर अश्या व्यक्ती विरक्त किंवा एकट्या एकट्या राहतात . कुटुंबाबद्दल फारश्या आसक्त नसतात . केतू आपल्याला अंतर्मुख होवून स्वतःच्याच आयुष्याकडे त्रयस्थाच्या नजरेतून पाहायला शिकवतो . शेवटी हे आपले आयुष्य आहे आणि आपल्या प्रश्नांची उकल शेवटी आपली आपल्यालाच करावी लागते ..
आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्यामध्येच आहेत, बाहेर शोधायची गरजच नाही. अंतर्मुख होऊन पाहिले, तर आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळेल आणि आपली स्वतःचीही नव्याने ओळख होईल. प्रयत्न करा आणि अभिप्राय सुद्धा कळवा.
संपर्क : 8104639230